spot_img
spot_img
spot_img
spot_img

दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी घोटाळा; तक्रारदारालाच चौकशी समितीची दमदाटी!

“तक्रार करायची असेल तर राजीनामा दे” चौकशी अधिकाऱ्यांचे धक्कादायक वक्तव्य?
फलटण : फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये दहावीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका चक्क सहावीतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या घोटाळ्याची तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच चौकशी समितीकडून दमदाटी करण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.
काही दिवसांपूर्वी शिक्षक वैभव बबन शेंडे हे इयत्ता सहावीतील दोन विद्यार्थिनींकडून दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासून घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकाराची दखल घेत दैनिक प्रीतीसंगमने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.
या बातमीची गंभीर दखल घेत कोल्हापूर एसएससी बोर्डाचे मुख्य सचिव राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले होते.त्याअनुषंगाने शुक्रवारी (१३ मार्च २०२६) निवृत्त शिक्षण अधिकारी जे. डी. साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दाखल झाली. समितीने काही शिक्षकांचे जबाब नोंदवले.
मात्र या प्रकरणातील मूळ तक्रारदार असलेले शाळेचे शिपाई मंगेश हरिभाऊ अभंग यांनी धक्कादायक आरोप केला आहे. अभंग यांनी या प्रकाराची तक्रार कोल्हापूर बोर्डाकडे ई-मेलद्वारे केली होती. चौकशीदरम्यान जबाब नोंदवताना चौकशी अधिकारी जे. डी. साळुंखे यांनी त्यांना उलट दमदाटी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अभंग यांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान साळुंखे यांनी त्यांना “तू ही बाब मुख्याध्यापकांना का सांगितली नाही? तुला खूप तक्रारी करायच्या असतील तर शाळेतून राजीनामा दे,” असे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या घटनेमुळे चौकशी समितीच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यालाच दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे.
दरम्यान, चौकशी समिती कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का? असा सवालही उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
यामुळे आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. चौकशी समिती कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का? तसेच या प्रकरणात आर्थिक तडजोड करून संबंधित शिक्षकाला कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे.
दरम्यान, या संदर्भात चौकशी अधिकारी जे. डी. साळुंखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केल्याचे समजते.
या संपूर्ण प्रकरणात अखेर सत्य समोर येणार की पुन्हा एकदा नवी चौकशी समिती नेमून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार, याकडे आता पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या