राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; आगरकरांचे विचार सामाजिक परिवर्तनासाठी दिशादर्शक – विजय चोरमारे 
कराड/प्रतिनिधी : – 
सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील यांना ‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. समाजप्रबोधनाची भूमिका जपत पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र आणि रोप देऊन सन्मान करण्यात आला.
येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ मार्गदर्शक व पत्रकार विजय चोरमारे यांनी, आगरकरांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. सामाजिक सुधारणा, विवेकवाद आणि मानवतेचा विचार आजच्या समाजासाठी अधिक आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी, आगरकरांच्या विचारांवर प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते आणि पत्रकार समाजाला नवी दिशा देत असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
अध्यक्षीय भाषणात विजय चोरमारे म्हणाले, आगरकरांनी आयुष्यभर सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतला. त्यांच्या जिवंतपणी प्रेतयात्रा काढण्यात आली, तरी त्यांनी सुधारणावादी भूमिका सोडली नाही. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीला प्राधान्य दिले, तर आगरकरांनी समाजसुधारणेचा मार्ग स्वीकारला. आज वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांसाठी काम करताना मानवतेचा विचार आणि आचार अधिक महत्त्वाचा ठरतो. समाजासाठी निष्ठेने काम करणाऱ्यांचा सन्मान हा नव्या प्रेरणेचा स्रोत ठरतो, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी पत्रकारिता, साहित्य, समाजकारण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील यांच्यासह पत्रकार विजय पाटील, पारधी मुक्ती आंदोलनाचे प्रणेते प्रकाश वायदंडे, ज्ञान व माहिती संकलक प्रवीण सरवदे, पत्रकार दुर्गा दळवी, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र आणि रोप देऊन सन्मान करण्यात आला.
रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी, समाजपरिवर्तनासाठी वास्तव स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. तसेच थोर महापुरुषांचे विचार आणि चरित्र समाजाने अभ्यासले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी, साहित्यिक, पत्रकार आणि समाजसेवकांनी सत्तेच्या चुकीच्या धोरणांविरोधात निर्भीडपणे आवाज उठविण्याची गरज व्यक्त केली. शब्दाची ताकद मोठी असून, भौतिकवादाच्या पलीकडे जाऊन समाजहितासाठी लेखणी चालविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश वायदंडे यांनी, १९९६ पासून भटके-विमुक्त समाजाच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेतला. पारधी समाजावरील गुन्हेगारीचा कलंक दूर करण्यासाठी शासन आणि लोकप्रतिनिधींनी अधिक सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार विजय जाधव यांनी, पत्रकारितेचे मूलभूत ध्येय समाजप्रबोधन असल्याचे सांगितले, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी, आगरकरांच्या विचारांचे जतन आणि व्यापक प्रसार करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात प्रमोद तोडकर यांनी, आगरकरांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समता, विवेक आणि सामाजिक प्रबोधनाची चळवळ उभी केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त प्रमोद तोडकर, विकास भोसले, अशोक मोहने, संदीप चेनगे आणि नितीन ढापरे यांनी केले. अशोक मोहने यांनी परिवर्तनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.