'कोरोना'विरोधात उंब्रज पोलीस युद्धपातळीवर तयारीत

उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड आणि  वैद्यकीय अधिकारी संजय कुंभार यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत कंबर कसली आहे.पोलीस कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांना जोडीला घेत कोरोना विषाणूंचा समूळ नायनाट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या जात असुन जनजागृती सह चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी अखंड वाहून घेतले आहे.यामुळे जनतेत असणारे भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत झाली आहे

'कोरोना'विरोधात उंब्रज पोलीस युद्धपातळीवर तयारीत

पोलीस आणि आरोग्य विभागाचे मिशन 'कोरोना'

अनिल कदम/उंब्रज

उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड आणि  वैद्यकीय अधिकारी संजय कुंभार यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत कंबर कसली आहे.पोलीस कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांना जोडीला घेत कोरोना विषाणूंचा समूळ नायनाट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या जात असुन जनजागृती सह चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी अखंड वाहून घेतले आहे.यामुळे जनतेत असणारे भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत झाली आहे.

उंब्रज पोलीस ठाण्याचा मोजका स्टाफ आणि १११ गावांचा कारभार तीन पोलीस औट पोस्ट असा अक्राळविक्राळ पसारा असणारा पोलीस ठाण्याचा कारभार पाहत असताना कायदासुव्यवस्था अबाधित राखताना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते.कोरोना महामारी बाबत कायद्याची अंमलबजावणी करताना उंब्रज पोलिसांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.जमावबंदी, संचारबंदी यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून  जनतेने पोलिसांना सहकार्य करण्याची गरज असून सर्वच गावातील पोलीस पाटील,ग्रामसेवक, गावकामगार तलाठी यांनी गावपातळीवर प्रामाणिक कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.

उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार हा अतिशय मोजक्या कर्मचारी यांच्यावर अवलंबून आहे. वैद्यकिय अधिकारी डॉ.संजय कुंभार यांनी उपलब्ध साधन सामग्रीचा अतिशय कल्पकतेने वापर करून जनतेला आरोग्यासाठी सेवा देण्याचा प्रामाणिक  प्रयत्न करीत आहेत.परिसरातील काही खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रसंगी असहकार केल्याने परिसराचा सर्व भार हा प्राथमिक आरोग्य केंद्रावर आला असून गर्दीने सरकारी दवाखाना हाऊसफुल्ल होत असून पुणे मुंबई येथून येणारे नागरिक यांची तपासणी परदेशातील आलेले स्थानिक नागरिक आणि इतर रुग्ण तपासणी साठी येत असल्याने आरोग्य विभागाची धावपळ होत आहे.

उंब्रज पोलीस ठाणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हातात हात घालून कोरोना विषाणूंचा सामना करीत असून महसूल,ग्रामविकास सह अन्य विभाग बघ्याच्या भूमिकेत असल्याने जनतेत चर्चेचा विषय झाला आहे.खायला पुढे आणि कामाला मागे अशी अवस्था इतर विभागांची झाली असून पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र जीवतोड मेहनत घेत असताना गावकामगार तलाठी आणि ग्रामसेवक कुठे आहेत असा सवाल सामान्य जनतेतून विचारला जात असुन जे कर्मचारी राष्ट्रीय संकटावेळी गैरहजर असतील त्याच्यावर कारवाई होऊन कडक शासन करण्याची मागणी होऊ लागली आहे.आपत्कालीन कर्मचारी यांना मुख्यालयात हजर राहणे बंधनकारक असताना स्थानिक प्रशासकीय कर्मचारी गैरहजर राहत असून वरिष्ठांना थातुरमातुर कारण सांगून कामावर यायचे टाळले जात आहे.अशा कर्मचारी यांना सक्तीने घरी बसवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे.यामुळे सामाजिक जबाबदारी चे भान ठेवून शासकीय नोकरी मध्ये येत असताना किमान  घेतलेली प्रतिज्ञा तरी आठवणीत ठेवावी अशी संतापजनक प्रतिक्रिया लोकांच्यातुन व्यक्त होत आहे.