युगंधराची सहचारिणी

वंचित समाजाला विकासाच्या पातळीवर आणणारे आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवणारे महामानव,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला. या संघर्षात त्यांना साथ देणारी काही ध्येयवेडी माणसे होती. त्यात त्यांच्या प्रथम पत्नी रमाबाई आंबेडकर, द्वितीय पत्नी सवितामाई आंबेडकर उर्फ माईसाहेब आंबेडकर यांचा वाटा होता. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर लोकनिंदेचा खूप त्रास सहन करावा लागला, त्यांच्यावर विविध आरोपही झाले. ‘ग्लोरी ऑफ द सन...डॉ. माईसाहेब आंबेडकर’ या पुस्तकात लेखिका वाल्मिका एलिंजे- अहिरे यांनी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे मनोगत मांडले आहे. हे पुस्तक म्हणजे एका त्यागी, सुशील   पत्नीच्या मनातील पतीबद्दल असलेली नीतिमान भावना स्पष्टपणे व्यक्त करणारी प्रेमकथा आहे, असे म्हटले तर कोणी आश्चर्य वाटून घेऊ नये.

युगंधराची सहचारिणी
Maisaheb Ambedkar- photo created by Ashok Sutar


‘ग्लोरी ऑफ द सन...डॉ. माईसाहेब आंबेडकर’ 

 कृष्णाकाठ / अशोक सुतार
         वंचित समाजाला विकासाच्या पातळीवर आणणारे आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवणारे महामानव,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला. या संघर्षात त्यांना साथ देणारी काही ध्येयवेडी माणसे होती. त्यात त्यांच्या प्रथम पत्नी रमाबाई आंबेडकर, द्वितीय पत्नी सवितामाई आंबेडकर उर्फ माईसाहेब आंबेडकर यांचा वाटा होता. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर लोकनिंदेचा खूप त्रास सहन करावा लागला, त्यांच्यावर विविध आरोपही झाले. ‘ग्लोरी ऑफ द सन...डॉ. माईसाहेब आंबेडकर’ या पुस्तकात लेखिका वाल्मिका एलिंजे- अहिरे यांनी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे मनोगत मांडले आहे. हे पुस्तक म्हणजे एका त्यागी, सुशील   पत्नीच्या मनातील पतीबद्दल असलेली नीतिमान भावना स्पष्टपणे व्यक्त करणारी प्रेमकथा आहे, असे म्हटले तर कोणी आश्चर्य वाटून घेऊ नये. स्त्री मुळातच संवेदनशील असते. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांना स्पष्ट कल्पना होती की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विविध व्याधींनी त्रस्त होते. तरीही डॉ. बाबासाहेबांबद्दल त्यांना असणारी आपुलकी, त्यांच्या अतुलनीय बुद्धिमत्तेचा प्रभाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या महान धम्मकार्यात किमान खारीचा वाटा उचलण्याची माईसाहेबांची मनीषा यांमुळे डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत विवाह करण्याचा निश्चय केला. स्वतः सवर्ण असूनही हा निर्णय घेताना त्यांचे मन कधीच दोलायमान झाले नाही. व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब सर्वश्रेष्ठ आहेत, याची माईसाहेबांना जाणीव होती. माईसाहेबांनी स्वतःचा विचार न करता त्यागी वृत्तीने महामानवाची साथ केली. लेखिका वाल्मिका एलिंजे- अहिरे यांनी आपल्या मनोगतात ‘युगंधराची सहचारिणी’ या कवितेत म्हटले आहे,
माहित होते मजला                                         

मी अंगिकारले होते प्रज्ञासूर्याला                                    

तेजात त्याच्या मी निघेन                              

 होरपळून अथवा उजळून.                                        

या कवितेतून डॉ. माईसाहेबांची जगण्यातील व्यथा लेखिकेने मांडली आहे. ‘ग्लोरी ऑफ द सन...डॉ. माईसाहेब आंबेडकर’ हे पुस्तक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत व त्यांच्या निर्वाणानंतर   माईसाहेबांच्या मनात उठलेले काहूर, जीवनातील सर्व प्रसंग आणि लोकनिंदेला त्यांनी दिलेली सडेतोड उत्तरे यांचा लेखाजोगा आहे. हे पुस्तक सर्वांनी मनापासून वाचण्याची गरज आहे. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचा संदर्भ असलेल्या सुमारे ३० पुस्तकांचा अभ्यास लेखिकेने केला आहे. तो अभ्यास या पुस्तकातून दिसत आहे. तसेच माईसाहेबांच्या संपर्कात असलेल्या अनेक लोकांशी चर्चा करून वाल्मिका एलिंजे- अहिरे यांनी एक मोठा दस्तावेज तयार केला आहे. जिज्ञासूंनी हे पुस्तक अभ्यासावे, त्यावर चर्चा व्हावी, हे लेखिकेला अपेक्षित आहे. माईसाहेबांवरील आरोप खोडण्याचाच विचार या पुस्तकात नाही तर प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न वाल्मिका एलिंजे- अहिरे या धाडसी लेखिकेने पोटतिडकीने केला आहे. त्यात एका त्यागी स्त्रीचे आक्रंदन, प्रेमभाव, माया, ममत्व, नीतिमत्ता, संघर्ष आहे.                                                ‘ग्लोरी ऑफ द सन...डॉ. माईसाहेब आंबेडकर’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ छान असून सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत सहकारी शामराव जाधव, बळवंत वराळे, वामनराव गोडबोले यांना सदर पुस्तक समर्पित केले आहे. या पुस्तकात एकूण २५ प्रकरणे आहेत. लेखिका वाल्मिका एलिंजे- अहिरे यांनी या पुस्तकाचे नाव ठेवले आहे, त्याबद्दल त्या आपल्या मनोगतात म्हणतात की, माईसाहेब प्रज्ञासूर्याची आभा होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात माईसाहेबांनी प्रवेश केल्यापासून बाबासाहेबांना प्रत्येक ऐतिहासिक कार्यात समर्थपणे साथ दिली व त्यांच्यानंतरही त्यांचे कार्य पुढे करीत राहिल्या म्हणून या पुस्तकाचे नाव ‘ग्लोरी ऑफ द सन...डॉ. माईसाहेब आंबेडकर’ असे ठेवण्यात आले. कारण बाबासाहेब हे प्रज्ञासूर्य तर माईसाहेब त्यांच्या आभा होत्या. डॉ. य. दि. फडके, विजय सुरवाडे, योगीराज बागुल, वामनराव गोडबोले, धनंजय कीर, आचार्य अत्रे इ. ३० ज्येष्ठ लेखकांच्या पुस्तकांतील संदर्भ घेत लेखिका वाल्मिका एलिंजे- अहिरे यांनी सदर पुस्तक अभ्यासपूर्ण केले आहे. हे पुस्तक वाचताना वाचकांना जाणवेल की, स्वतः माईसाहेब आंबेडकर वाचकांशी बोलत आहेत. कारण पुस्तकाची शैली प्रथमवाचक आहे. म्हणजे व्यक्ती मी आहे असे समजून लेखिकेने माईसाहेब यांच्या जीवनाचा पट यथार्थपणे मांडला आहे. त्यामुळे वाचकांना ही शैली भारावून टाकते, पुस्तकाचे सलग वाचन करण्यास भाग पाडते आणि पुस्तक लिहिण्याचा उद्देश सफल होतो. अशीच लेखनशैली वाल्मिका एलिंजे- अहिरे यांनी त्यांच्या यापूर्वीच्या ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ या पुस्तकात मांडली आहे. त्या पुस्तकाच्या दोन आवृत्ती वाचकांनी डोक्यावर उचलून घेतल्या. या पुस्तकालाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक व संशोधक विजय सुरवाडे यांची १४ पानांची दीर्घ, अभ्यासपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. ‘डॉ. बाबासाहेबांच्या सहवासात’ हे डॉ. माईसाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र १९९० साली साकार झाले. या माईसाहेबांच्या आत्मचरित्रासाठी विजय सुरवाडे यांनी लेखन सहाय्य, संशोधन व संपादन केले होते. माईसाहेबांनी ती जबाबदारी सुरवाडे यांच्यावर टाकली होती. म्हणूनच लेखिका वाल्मिका एलिंजे- अहिरे यांच्या ‘ग्लोरी ऑफ द सन...डॉ. माईसाहेब आंबेडकर’ या पुस्तकाला विजय सुरवाडे यांची प्रस्तावना मिळणे हे खास वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुरुवात माझ्या जीवनप्रवाहाची, भेट युगंधराची, भीमगर्जना, धर्मांतराकडे वाटचाल, धम्मसंदेश दूत वामनराव गोडबोले, महापरीनिर्वाणाकडे, माझ्या आयुष्यातील ती काळरात्र, आरोप- प्रत्यारोप, आम्ही जीवनसाथी, मी निरपराधी ही प्रकाराने महत्वपूर्ण आहेत. शेवटी रमाई ही बाजीराव कांबळे- मळगेकर यांनी लिहिलेली कविता उल्लेखनीय आहे. पुस्तकाच्या शेवटी संदर्भसूची जोडली आहे. हे पुस्तक २८८ पानांचे असून किंमत फक्त २७० रु. आहे. वाचकांनी आवर्जून वाचावे, असे हे पुस्तक आहे.