'वजा वाटोळे अन् डोईवर गाठोळे'इथे यायला बंधने नव्हती पण इथून जायला मात्र आज बंधने आहेत

'वजा वाटोळे अन् डोईवर गाठोळे'इथे यायला बंधने नव्हती पण इथून जायला मात्र आज बंधने आहेत

वजा वाटोळे अन् डोईवर गाठोळे
(coronal politics in corona crisis)

सज्जन यादव

१८ व्या शतकाच्या मध्याला ब्रिटीशांनी सात बेटे एकत्र करून मुंबई निर्माण केली.

 १९६० पर्यंत महाराष्ट्रसह गुजरात अशा द्विभाषिक राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची मुंबई इलाखा अशी आणखी एक स्वतंत्र ओळख होती.संयुक्त महाराष्ट्राच्या रक्तरंजित चळवळीनंतर अखेर मुंबई औपचारिक दृष्ट्या जरी महाराष्ट्राची झाली तरी मुंबईने देशासाठीही सदैव सर्वसमावेशकता जपली. मुंबई जगातील एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे. येईल त्याला रोजगार देण्याची क्षमता यामुळे मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच राहीली नाही तर सर्व भारतातीलच लोक मुंबईच्या पदराखाली आले. येथे कुशल तसेच अकुशल हातांनाही कसलेतरी काम मिळतेच. वाटखर्चीपुरते पैसे गाठीला बांधून कामाच्या शोधात अनवाणी आलेली काही माणसे पुढे या मायानगरीचे आयडाॕल बनून मुंबईच्या समाजमनावर राज्य केलेलीही अनेक उदाहरणे येथे सापडतात.देशात राज्यात जेव्हा जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा तेव्हा ही स्वप्ननगरी आणखी भव्य होत गेलेली आहे. 

 महाराष्ट्राच्या सर्व प्रांतातील लाखो करोडोंना मुंबईने कष्टाची संधी दिलीय. आत्मसन्मान दिलाय.पूर्वीच्या महाराष्ट्रातील बहुतांश वर्ग हा गोदीत माथाडी कामगार , रंगकाम किंवा कापड गिरणीत काम करणारा कामगार  होता. गांवाकडचा एखादा माणूस मुंबईत एकदा का स्थिरावला की त्याने आणखी चारचौघाना तेथे नेऊन रोजगाराला चिकटवायचे हा प्रघात शेकडो वर्षे चालला.वर्षभरात साठलेल्या पैशातून गांवाकडील घराच्या ,शेतीच्या काही सुधारणा करायच्या ही येथील शेकडो वर्षांची अव्याहत परंपरा. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचे योगदान मोठे आहे. 

हातावरील पोट असणाऱ्या श्रमिकांपासून पोटावरून हात फिरवणाऱ्या धनिकांपर्यंत सर्वांचीच काळजी वाहणारी ही धननगरी आहे.  पण याच नगरीवर आजवर अनेक जखमा देखील झाल्यात. स्वातंत्र्य चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंतच्या चळवळींचे मुंबई हेच केंद्र होते. ती महाराष्ट्राला मिळण्यासाठी १०५ जणांना बलिदान द्यावे लागलेले आहे. १९८० च्या दशकात येथील जवळजवळ सगळा कापड उद्योग कामगारांच्या संपामुळे बंद पडला तो कायमचाच. त्यामुळे राज्यातील लाखो श्रमिकांच्या चरितार्थाचे साधनच कायमचे ठप्प झाले. त्यामुळे मुंबईकर झालेले लोंढेच्या लोंढे हताश होवून पुन्हा गांवाकडे आले. श्रीमंत मुंबईच्या सामाजिक श्रीमंतीला आलेली ही सर्वात मोठी ओहोटी होती. खानावळीचे खावून पण ऐशमौज करून जिवाची मुंबई केलेल्या लाखो मुंबईकरांना संपामुळे गांवाकडे कायमचेच यावे लागले होते. 

केवळ एका संपाने मुंबईत तेव्हा मोठी वजाबाकी झाली. कसल्याही संकटात मुंबई कधी थांबली नाही ,थांबत नाही.  देशाच्या एकूण रोजगारात एकट्या मुंबईचा वाटा १०% आहे.राष्ट्रीय शेअर बाजारापासून रिझर्व्ह बँकेपर्यंतच्या देशातील सर्व आर्थिक शिखर संस्थांबरोबरच जागतिकीकरणामुळे विदेशातील बलाढ्य अर्थकेंद्रेही येथे कार्यरत झालेली आहेत. त्यामुळे जगातील पाच प्रमुख शहरात मुंबईचा समावेश होतो. देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या सरासरी तिप्पट दरडोई उत्पन्न मुंबईचे आहे. मुंबई देशाला विविध प्रकारचे १८०% महसूली करउत्पन्न देते. देशातील एकूण व्यवसाय करात ४० अब्जापेक्षा अधिक वाटा एकट्या मुंबईचा आहे.

महाराष्ट्रात सिंचनाच्या योजनांचे जाळे विणले गेल्याने ग्रामीण भागात शेती बागाईत झालेली आहे. विविध कारखाने , प्रक्रिया उद्योग , सहकारी संस्था यामुळे गांवपातळीपर्यंत रोजगार व विकासात वेगाने वृद्धी झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून मुंबईकडचे स्थलांतर आज जवळ जवळ थांबलेलेच आहे. पण इतर राज्यांमध्ये ही विकासक्रांती झालेली नाही. त्यामुळे एकेकाळी महाराष्ट्राची *जीवनजननी* असणारी मुंबई आज  सर्व राज्यांचीच *जीवनदायिनी* बनलेली आहे. त्यामुळे  विविध कारणांनी मुंबईतून महाराष्ट्र वजा झाला असला तरीही मुंबईचा  श्रमांक व क्रमांक नेहमीच वरचा राहीला आहे. बिहार, उत्तराखंड , मध्यप्रदेश, राजस्थान , गुजरात उत्तरप्रदेश, प.बंगाल अशा सर्वच राज्यांतून मोठा वर्ग येथे स्थिरावला आहे.येथे कष्टाची संधी आणि संधीला अपेक्षित दाम मिळत असलेने सहज जगणे होते. एकंदर मुंबई व महाराष्ट्र हे परराज्यांसाठी पालकाची भूमिका तर बजावत आहेतच पण सरकारच्या महसूलाचाही गाडा हाकत आहेत. 

स्वतः कधी न थांबता देशाचा गाडाही न थांबू देणाऱ्या अशा या वैभवशाली मुंबईच्या या लौकिकाला कोरोनाने मात्र थांबवल आणि तीच्या सामर्थ्याला काहीशी दृष्ट लागली. मुंबई थांबणं म्हणजे खरंतर जगाचाही श्वास थांबण्यासारखं आहे त्यामुळे देशाचे किती नुकसान होतयं हे सांगण्याची गरजच नाही. 

क्षणभर न थांबणाऱ्या व कसल्याही संकटातून क्षणात पूर्ववत उभी राहणाऱ्या मुंबईला कोरोनासारख्या एका सूक्ष्मकणाने मात्र गेले दोन महीने कैद करून ठेवलयं. त्यामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत व अस्वस्थ झालयं. लवकरच हे जागतीक दुष्टचक्र जाईल या आशेवर पाणी फिरलयं. थांबलेला रोजगार, पोटाची चिंता, बाधीतांचे वाढत चाललेले आकडे यातून जिथे प्रशासनाचाच धीर सुटत चाललाय तिथे आपले काय या चिंतेने शेवटी इथे असणाऱ्या लाखो परप्रांतियांना हजारो मैलावरील त्यांच्या गांवची आज ओढ लागली आहे. कारण मुंबई उद्या कधीतरी चालू होईलही पण तेव्हा मीच नसेन तर? ही आर्त भावना आहे. सरकार जावू देत नाही पण कोरोनाचे व त्यापुढचे भय त्यांना थांबूही देत नाही. *इथे यायला बंधने नव्हती पण इथून जायला मात्र आज बंधने आहेत*.कारण  हा आजारच तसला आहे. त्यामुळे आता जायचेच म्हटले तरी विविध नोंदण्या, तपासण्या , परवानग्या या साऱ्या चक्रातून गेल्यावरच मग जायचे हा दंडक. त्यातच तिकीटाचे पैसे  इथले सरकार देणार का जिथून आलोय ते सरकार देणार का केंद्र सरकार सोसणार यांवरही मध्येच काही प्रशासकीय समन्वयातील मतभेद  हलकटपणा चव्हाट्यावर येतो आहे. देशाला विसरून परदेशात लाखोंची पॕकेज घेऊन परदेशी स्थायिक झालेल्या भारतीयांची जेवढी काळजी सरकार व नेत्यांनी वाहिली तेवढी काळजी सरकारला नेहमी मायबाप म्हणणाऱ्या या गरीबांची का वाहिली नाही याचे आश्चर्य वाटते.? त्यातच काही राज्ये आपल्याच लोकांच्या परत येण्यावरही असंमत्ती दाखवून अमानवीय निर्देश देत आहेत. साहजिकच सहनशक्तीचा बांध फुटून अखेर हे माणसांचे लोंढेच्या लोंढे जनावरांच्या काफील्यासारखे पायीच गांवाकडे त्यामुळे जायला निघालेत. प्रचंड उन्हाळा , हजारो मैलांचा प्रवास , सोबत लहान लहान मुले, गरोदर महीला, वयस्कर माणसे हा प्रवास पूर्ण करतील का हा खूप वेदनादायी प्रश्न आहे. कारण या आजाराने अगोदरच माणूस व माणूसकीतील अंतर वाढवलयं, या अंतरातून त्यांना दूरचं अंतर पायी चालून जायचयं. किती मुक्काम होतील माहीत नाही? जिथे मुक्काम होईल तिथे माणूसकीचे चार हात चार घास घेवून पुढे येतील का माहीत नाही? तहान लागल्यानंतर जवळ कोठे पाणी तरी मिळेल का ? याचाही  पत्ता नाही. सगळे काही मिळाले नाही मिळाले तरी चालेल किंवा मेले तरी चालेल पण मला आता माझे गांव गाठायचयं एवढाच ध्यास घेऊन हे लोंढे एकेक पाऊलाने आपले घरापर्यंतचे अंतर कमी कमी करत चाललेत. उन्हातान्हाने व्याकूळ झालेल्या लहानग्या मूलांच्या चेहऱ्यावरील गोंडसपणा मावळून गेलाय. वाहने मिळत नाहीत कारण परवानगी नाही व मिळाली तर द्यायला पैसे नाहीत. एका अदृश्य सूक्ष्मजीवाने घातलेल्या धुमाकूळाने दाही दिशेला अशा मरणयात्रांचे काफीले निघालेत. 

आशा अपेक्षेने जगण्यासाठी, स्वप्नासाठी आलेले हे मुंबईचे पाहूणे या आकस्मिक संकटाने एवढे गांगरून गेलेत की एकेकाळी याचकभावे मुंबईच्या चरणी झुकलेले व तीच्या उपकारावर पोटपूजा चाललेले हे पाहुणे आज *''गड्या आपला गांव बरा''!* असे म्हणत परत मुंबईला यायचं नाही असे उद्विग्नपणे बोलत बोलत चालत आहेत.

मुंबई हरतेय का काळ जिंकतोय कुणासठावूक पण तसे झाले तर ही वजाबाकी मात्र भविष्यात भरून येणार नाही. मुंबईने लाखोंना जगवले पण त्या लाखो हातांनीही मुंबईला आपला मोठा श्रमांक दिलाय म्हणूनच आज मुंबईचा क्रमांक वर आहे हेही नाकारून चालणार नाही.काही कामे फक्त परप्रांतीयच करतात. ते परत आले नाहीत तर मुंबई परत त्या गतीने धावणार का? हा प्रश्न आहे. बांधकाम क्षेत्र , ठेकेदारांकरवी करून घेतली जाणारी स्वच्छतेपासून ते सार्वजनिक क्षेत्रातील कामे , हाॕटेल व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांत जिथे मराठी माणूस अभावानेही नसतो ती सर्व कामे हे परप्रांतीय मजूर पोटासाठी हातात घेत होते. अशा प्रकारचा मुंबईतला रोजगार कमी होणे म्हणजे मुंबईच्या सेवकांची संख्या कमी होणे असेच आहे. 

कोरोना मुंबईला गरीब करतोय का काय असेच हे संकेत आहेत. त्यातच नुकतेच केंद्र सरकारने मुंबईतून जागतीक दर्जाचे  I.F.S.C सेंटर नुकतेच गुजरातेत हलवल्याचे जाहीर झालेय. मुंबईसाठी हा दुष्काळात १३ वा महीना आहे. त्याचे परिणाम उद्याच्या मुंबईवर काय होतील त्याबाबत इतक्यातच काही सांगता येणार नाही. महाराष्ट्रातील नेते एकीकडे यामुळे मुंबईवर याचा काडीचा परिणाम होणार नाही असे सांगत आहेत पण त्यांत छातीठोकपणा दिसत नाही कारण दुसरीकडे त्याबाबतीत केंद्रावर ते तोंडसुखही घेत आहेत. याचा अर्थ इथेही काहीतरी अस्वस्थता आहे. उच्चसेवा क्षेत्रातील किमान दोन लाख रोजगार मुंबईतून वजा होईल हा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केलाय. नेमके काय होईल ? त्याचे काय परिणाम होतील? याची उत्तरे काळाच्या पोटातून कधीतरी बाहेर येतीलच पण जे काही नुकसान होईल ते केवळ मुंबईचे अथवा महाराष्ट्राचेच नसेल तर ते अखिल देशाचे असेल. कारण मुंबई ही केवळ महाराष्ट्राची कधीच झाली नाही तर ती उपेक्षित भारताचे एकमेव आश्रयस्थान आहे.ती जागा भारतातील दुसरे कोणतेही शहर घेवू शकत नाही. देशाला रोजगार देण्याचे सामर्थ्य जर मुंबईतच आहे तर त्या उद्योगांना सेवा देणारे आर्थिक क्षेत्रही तिथेच हवे.अन्यथा ज्या मुंबईने आजवर देशाच्या भारवाहनाचे अधिपत्य केले त्या मुंबईवरच आज *'वजा वाटोळे व डोईवर गाठोळे'* ही वेळ येणे ही शोकांतिका आहे. यांत काही राजकारण असो नसो पण यांत शहाणपणा नाही हेही मात्र तितकेच खरे आहे. कारण *रेड्याला चुनाला लावून त्याचा हौशा बैल करता येत नाही* 

मुंबईची भव्यदिव्यता नैसर्गिक आहे. कृत्रिम प्रयोगाने ती साध्य होणार नाही याची जाणीव ठेवून बाध्य होणार नाही याची दक्षता घेणेच देशहिताचे आहे.  कृतज्ञदृष्टीला अंधारी आल्यासारखे राज्यकर्त्यांनी वागू नये.