पवार गेम

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली महिनाभर अनेक उलथापालथी घडताना पाहायला मिळाल्या. सत्तेच्या सारीपाटावर अखेर महाविकास आघाडी विराजमान झाली. आज शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करणार आहेत. हा सोहळा दिमाखदार करण्यासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. पण हे सर्व घडत असतांना राज्याने किंबहुना देशाने पवार गेम अनुभवला.

पवार गेम
अर्कचित्र : अशोक

संपादकीय 

   पवार गेम ........

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली महिनाभर अनेक उलथापालथी घडताना पाहायला मिळाल्या. सत्तेच्या सारीपाटावर अखेर महाविकास आघाडी विराजमान झाली. आज शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करणार आहेत. हा सोहळा दिमाखदार करण्यासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. पण हे सर्व घडत असतांना राज्याने किंबहुना देशाने पवार गेम अनुभवला. याची खबर त्याला नाही आणि त्याची खबर त्याला नाही, असे चित्र तयार करण्यात आले. जे शरद पवार बोलत होते, त्याच्या उलट रणनीती रचली जात होती. याची प्रचीतीच काल स्पष्ट झाली. पवारांनी गेम केला की गनिमी कावा की अजित दादांचे फसलेले बंड मोडीत काढले, हे समजण्यासाठी बराच अवधी जाईल. मात्र यावर दिवसभर सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मेटकरी यांनी तर ट्विट करून राज्यात खळबळ उडवून दिली. दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते, त्यांना पाठवले होते, इतका इतिहास जरी समजून घेता... ! त्यांनी असे ट्विट केल्याने राज्यात खळबळ माजली.                           २४ ऑक्टोंबरला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. तेव्हापासून शरद पवार यांनी आम्हाला विरोधक म्हणून जनतेने कौल दिलेला आहे. त्याचा आदर करून आम्ही विरोधातच बसणार, असे वारंवार सांगितले. त्याचवेळी त्यांच्या मनात वेगळे आहे हे स्पष्ट झाले होते. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारदारम्यान जो उन्माद आणि दावा केला, ‘अबकी बार २२० पार.’ यामुळे विरोधकांच्यात बळच नाही अशी परीस्थिती दिसून आली होती. मात्र, ८० वर्षाच्या योद्ध्याने एकहाती लढा दिला व ही लढाई आपल्या शिरावर घेतली, राज्य पिंजून काढले. विरोधक नगण्य समजणाऱ्यांना निकालातूनच प्रत्युतर दिले. आघाडीने तब्बल ९८ जागा जिंकल्या. त्यांना इतरांची साथ मिळून हा आकडा १०५ वर नेला. याचवेळी सत्तेत असलेले आणि घमेंडीत भाषा करणारे भाजपलाही १०५ जागा मिळाल्या. ही निवडणूक त्यांनी युतीतून लढली होती. त्यामुळे शिवसेनेलाही ५६ जागा प्राप्त झाल्या. राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार असे स्पष्ट बहुमत जनतेने दिले होते. पण युद्धात तह करायचा आणि गनिमी कावा करून लढा जिंकायचा हा चंगच या योद्ध्याने आखला होता. त्यांनी पहिल्यांदा निकाल हाती आल्या आल्या रणनीती आखावयास सुरुवात केली. आपल्या साथीला कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तात्काळ मुंबईला बोलावून घेतले. युतीतली धुसफूस ध्यानी घेतली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. यासाठी संजय राऊत यांचा वापर करण्यात आला. पृथ्वीराज चव्हाणांनी काही झाले तरी राज्यात भाजपची सत्ता येणार नाही, असे निकालादिवशीच जाहीर केले. या रणनीतीत निवडणुकीपूर्वीचेच संधान असावे, असे वाटू लागले. निकालानंतर जे घडले ते संपूर्ण राज्याने पाहिले. राज्यपालांनी ज्यांना ज्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावले, त्यांनी नकारघंटा दिल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्राची कॅबिनेट एक दिवस अगोदर घेण्यात आली. याला कारण देताना पंतप्रधान परदेशी जाणार असल्याचे सांगण्यात आले. गृहमंत्रालयाने तातडीने शिफारस केली, राष्ट्रपतींची स्वाक्षरीही लगेच झाली. हे न कळण्याइतपत महाराष्ट्र आडाणी नाही. एकीकडे हे सुरु होते, दुसरीकडे महा विकास आघाडीचा जन्म घातला जात होता. यासाठी वारंवार बैठका पार पडत होत्या. भाजपनेही सत्ता नाही मिळाली तर चालेल पण शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही ही आखणी केली. आपल्या बरोबर गेले तीस वर्ष गुण्यागोविंदाने संसार करणाऱ्या शिवसेनेला अडीच वर्ष देण्यापेक्षा सत्तेतून बाहेर बसणे पसंत करू, अशी भूमिका भाजपने घेतल्यामुळेच महाविकास आघाडी जन्माला आली. कॉंग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना हे विचाराने व मनाने वेगळे असलेले पक्ष एकत्रित आणून सत्तेची घोषणा करण्याआधी दिलेरखानाच्या छावणीत संभाजीराजे गेले. रातोरात राष्ट्रपती राजवट उठली, लोक अंथरुणात असताना १२ कोटी लोकसंख्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सकाळी सकाळी शपथविधी सोहळा उरकून घेतला. मी पुन्हा येईन...असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस सकाळी सकाळी आले. त्याच्याबरोबर राष्ट्रवादीने गटनेते म्हणून नेमलेले अजितदादा पवार यांनी उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. संपूर्ण राज्य अवाक झाले. पवार घराण्यात फुट ...राष्ट्रवादीत फुट ..अशा ब्रेकिंग बातम्या टीव्हीवर झळकू लागल्या. नेमके काय होणार, आमदार फुटणार का असे अनेक प्रश्न राज्याला पडले. अनेक ठिकाणी अजितदादांच्या निषेधाची आंदोलने झाली. सलग पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कामकाज केलेले फडणवीस सरकार ७८ तासांतच कोसळले. कारण अजितदादांनीच राजीनामा दिला. मग राज्यात चर्चां सुरु झाली, हे अजित पवारांचे बंड होते की पवारांचा गनिमी कावा ?  म्हणजेच पुन्हा एकदा, चर्चेत पवारच !                                                                   अजितदादांचा राजीनामा, फडणविसांचा राजीनामा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यानंतर हे सर्व घडले. ७८ तासांत सरकार पाडण्याची किमया ऐशी वर्षाच्या योद्ध्याने केली. सरकार कोसळले की लगेचच महाविकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आणि राज्यात ठाकरेशाही आणली. आता प्रश्न पडतो, अजितदांचे बंड होते की शरद पवारांनी केलेला गनिमी कावा होता. काहीही असो, पवार मात्र भाजपला कळलेच नाहीत. पवारांनी भाजपला पुरते नामोहरम केले.