उंब्रजच्या विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी उर्मट

वीज ग्राहकांना हीन वागणुकीने नागरीक संतप्त

उंब्रजच्या विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी उर्मट

उंब्रजच्या विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी उर्मट

वीज ग्राहकांना हीन वागणुकीने नागरीक संतप्त

प्रतिनिधी/उंब्रज

    उंब्रज ता. कराड येथील वीज वितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्यांकडून विज बिलासंदर्भात तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना उद्धटपणाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे उंब्रजसह परिसरातील नागरीकांची या अधिकाऱ्याविषयी तीव्र नाराजी असून या अधिकार्‍याची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे  कोरोना काळातील वीज बिलांमध्ये नागरिकांना सवलत मिळाली नाही.  त्यामुळे ग्राहक संतप्त आहेत त्यातच अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तरे न देता अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. त्यामुळे या कार्यालयातील कामकाजाविषयी नागरिकांचा रोष वाढला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष घालावे अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटू शकतात.
    याबाबत अधिक माहिती अशी की, विद्युत वितरण कंपणीचे उंब्रज येथील कार्यालय कामातील दिरंगाई, वीज दुरुस्ती टाळाटाळ, ग्राहकांशी उध्दट वर्तणूक, संबंधित ठेकेदारांशी आर्थिक हितसंबंध ठेवून त्यांना सन्मानाची वागणूक व सर्वसामान्य ग्राहकांस अपमानास्पद वागणूक अशा अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्यातच मार्च २०२० मध्ये सर्वत्र कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले. त्यामुळे बहुतांश लोकांचे व्यवसाय, नोकरी व उद्योगधंदे सहा ते आठ महिने पूर्णपणे बंद होते. या काळात नागरिकांनी विजेचा केलेला वापर व त्याचे आलेले बील वारेमाप आहे. किमान लाँकडाऊनच्या काळातील बीलांमध्ये सवलत मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र विद्युत कंपनीच्या धोरणाने सर्वांचाच भ्रमनिरास झाला आहे. त्यातच मागील पंधरा दिवसापूर्वी उंब्रजच्या वीज कार्यालयाने ग्राहकांना वीज बीले न भरल्यास कनेक्शन  तोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.  त्यामुळे वीज ग्राहकांची मोठी पंचायत निर्माण झाली आहे.  त्यातच अनेक ग्राहकांना वारेमाप पद्धतीने वीज बिलांची आकारणी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारे अधिकचे कर वीज बिलात लावण्यात आले आहेत.  तसेच विज बिलात  झालेली वाढ विविध आकारणी करण्यात आलेल्या रक्कमा याचा थांगपत्ता ग्राहकांना लागत नसल्याने ग्राहक वीज वितरण कार्यालयात वीज बिले समजून घेण्यासाठी व ती कमी करून घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र उंब्रजच्या वीज कार्यालयाचे कार्यकारी उपअभियंता कुंभार हे भलत्याच तोऱ्यात राहुन नागरिकांना उत्तरे देत आहेत.  त्यांच्या कडून ग्राहकांना समाधान कारक उत्तर मिळण्याऐवजी आपण कोणीतरी मंत्री असल्याचा आव दाखवला जात आहे.  बिल कमी करून मिळणार नाही, काय काम आहे, परत येऊ नका अशा प्रकारची उत्तरे देऊन ग्राहकांना धुडकावून लावले जाते.  ग्राहकांची मूळ समस्या ऐकून घेण्याऐवजी अधिकारी त्यांच्याच प्रश्नांची सरबत्ती करत आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या या वागणुकीने उंब्रज परिसरातील नागरिक त्रस्त आहे. वरिष्ठांनी या अधिकाऱ्याची तातडीने बदली करावी. अशी मागणी होत आहे. 
    दरम्यान उंब्रजच्या विद्युत कार्यालयात दहा वर्षांपूर्वी असणाऱ्या कुंभार नावाच्या एका अधिकाऱ्यास उंब्रज ग्रामस्थांची चांगलीच प्रचिती आली होती. या अधिकाऱ्याला चुकीच्या वागणुकीमुळे एका ग्रामस्थाची चपराक ही खावी लागली होती. तसेच अनेक प्रश्नावरून ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करून निषेध केला होता. तसेच अनेक चुकीच्या कामांची चर्चा येथे होती. शिवाय लाचलुचपतच्या एका कारवाईत हा अधिकारी रंगेहात सापडला होता. तीन वर्षापासून येथे चार्ज घेतलेल्या दुसऱ्या कुंभार साहेबांने यातून बोध घ्यावा अन्यथा पुन्हा उंब्रज करांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. याबाबत नागरिकांच्यात उलटसुलट चर्चा आहे. दरम्यान ज्या ग्राहकांना वाढीव वीज बिले आली आहेत. त्यांना ती तातडीने कमी करून द्यावीत,अनेक महिन्यांपासून ग्राहकांनी वीज बिले भरले नाहीत, त्यामुळे वीज बिलांच्या रकमा आवाक्याच्या बाहेर गेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीनुसार त्यांना हप्ते करून देणे अधिक गरजेचे आहे. यासंदर्भात वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालावे अन्यथा जनक्षोभ उसळल्या शिवाय राहणार नाही.

 

ठेकेदार उशाला सर्वसामान्य पायाला

गत तीन वर्षांपासून उंब्रज येथे नेमणुकीस असणारे वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता कुंभार यांची कार्यालयीन कामात दिरंगाई चालू असून ग्राहकांशी उद्धट वर्तन नित्याचीच बाब झाली आहे.ठेकेदारांशी अर्थपूर्ण हितसंबंध ठेवणारे कुंभार सामान्य नागरिकांना हीन दर्जाची वागणूक देत असल्याने ग्राहकांच्या जीवावर पगार मिळवणारे अधिकारी मुजोर झाल्याने ठेकेदारांना नमस्कार घालणारे व सर्वसामान्य नागरिकांना दारोदार भटकायला लावणारे कुंभार यांना वरिष्ठांनी योग्य शब्दात समज देणे गरजेचे आहे.

एक संतप्त वीज ग्राहक