कृष्णा’चा 'के बायो मास्क' कोरोना संसर्ग रोखण्यास प्रभावी ठरेल - डॉ. डी. के. अगरवाल

कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या वतीने बहुमूल्य अशा 'के बायो मास्क'ची निर्मिती करण्यात आली आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या संकल्पनेतून हा मास्क साकारण्यात आला असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा मास्क नक्कीच प्रभावी ठरेल, असे मत कृष्णा अभिमत विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधक संचालक डॉ. डी. के. अगरवाल यांनी व्यक्त केले.

कृष्णा’चा 'के बायो मास्क' कोरोना संसर्ग रोखण्यास प्रभावी ठरेल - डॉ. डी. के. अगरवाल
'के बायो मास्क'चे अनावरण करताना डॉ. डी. के. अगरवाल व उपस्थित मान्यवर
कृष्णा’चा 'के बायो मास्क' कोरोना संसर्ग रोखण्यास प्रभावी ठरेल - डॉ. डी. के. अगरवाल
 
संशोधनात विद्यापीठाचे मोठे योगदान : मास्कची विषाणूंना रोखण्यात महत्त्वाची भूमिका - डॉ. जयंत पवार 

कराड/प्रतिनिधी : 

     कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या वतीने बहुमूल्य अशा 'के बायो मास्क'ची निर्मिती करण्यात आली आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या संकल्पनेतून हा मास्क साकारण्यात आला असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा मास्क नक्कीच प्रभावी ठरेल, असे मत कृष्णा अभिमत विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधक संचालक डॉ. डी. के. अगरवाल यांनी व्यक्त केले.

       येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठात बुधवारी 21 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, कृष्णा हॉस्पिटलचे मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, संशोधकडॉ. जयंत पवार, डॉ. अरूण पाटील उपस्थित होते. 

       मास्कबाबत सविस्तर माहिती देताना डॉ. पवार म्हणाले, 'के बायो मास्क' हा पर्यावरणपूरक जिवाणूंसह विषाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा मास्क आहे. संरक्षणात्मक दृष्टीने यामध्ये 4 थर वापरण्यात आले असून मनमोहक सुगंध देणारे हर्बल आणि नॅनो कोटेड फिल्टरही बसविण्याची सोयही यामध्ये आहे. 100 टक्के सूती कापडापासून बनविण्यात आलेला हा मास्क रोज धुवून वापरल्यास तो नागरिकांना किमान 3 महिन्यांपर्यंत प्रभावीपणे वापरणे शक्य आहे. विषाणूंना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावनाऱ्या या मास्कच्या योग्य वापराने नागरिक कोरोना संसर्गापासून नक्कीच दूर राहू शकतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

      ते पुढे म्हणाले, 'के बायो मास्क'च्या संशोधनात कृष्णा अभिमत विद्यापीठातील संशोधकांनी मोठे योगदान दिले आहे. सध्या या मास्कची प्रायोगिक तत्वावर निर्मिती करण्यात येत असून, पुढील आठवड्यापासून तो माफक दरात बाजारपेठेतही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला किफायतशीर खर्चात अधिक प्रभावीपणे स्वत:चे आरोग्य जपता यावे, या उद्देशाने या मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. टिकाऊपणामुळे हा मास्क वापरण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन अवघा 1 रुपया खर्च येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने हा मास्क वरदान ठरणार असून आपण संशोधनातून बनवलेली एखादी वस्तू लोकांच्या उपयोगी पडेल, यासारखे दुसरे समाधान नसल्याचे मतही डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केले. 

     दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते 'के बायो मास्क'चे अनावरण करण्यात आले. कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी स्वागत केले. तर डॉ. श्रद्धा बहुलेकर यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले.