काले-मसूर बससेवेसाठी ग्रामस्थ आक्रमक

काले-मसूर बससेवेसाठी ग्रामस्थ आक्रमक

कराड/प्रतिनिधी :

                         गेल्या काही वर्धन वर्षांपासून कराड आगाराकडून काले-कराड- मसूर ही शटल बस सुरु करण्यात आली होती. त्यामुळे काले गावासह भागातील विद्यार्थी, ग्रामस्थांच्या प्रवाशांची मोठी सोय झाली होती. मात्र, काही दिवसांपासून आगार व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे ही शटलसेवा बंद असल्याने लोकांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे गुरुवारी काले येथे ग्रामस्थांनी काले-मसूर बस अडवून ही बससेवा पूर्ववत करण्याची मागणी केली. 

                       कराड आगार व्यवस्थापकांच्या अनागोंदी कारभाराने ही शटल सेवा काही दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे येथील शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुरूवारी काले गावात आलेल्या सर्व बसेस येथील वीद्यार्थी व प्रवाशांनी रोखून धरल्या होत्या. तसेच आगार व्यवस्थापक आंदोलनाच्या ठिकाणी आल्याशिवाय रोखलेली बस न सोडण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

                         दरम्यान, सदर एसटी बसेसच्या चालक-वाहकांनी याबाबतची माहिती आगार प्रमुखांना दिली. परंतू, त्यांनी आंदोलक प्रवाशांना घेऊन कराड आगारात या, असे सांगितले. त्यामुळे आक्रमक झालेल्या प्रवाशांनी आगार प्रमुख येथे आल्याशिवाय बस न सोडण्यावर ठाम राहिले. त्यानंतर काले येथे आगरप्रमुख आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. 

                       काले-कराड-मसूर या शटल बस सेवेमुळे कालेभागासह अन्य गावातील शालेय विद्यार्थी, प्रवाशी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी तसेच अन्य कामाासाठी ये-जा करतात. पहाटेच्या पहिल्या बसपासून रात्रीच्या मुक्कामी बसमुळे गावासह भागातील लोकांची मोठी सोय होत होती. मात्र, गेल्या काही माहिन्यांपासून ही शटल सेवा विस्कळीत झाली होती. ही सेवा पूर्ववत सुरू ठेवावी म्हणून सातत्याने येथील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी कराड आगार प्रमुखांकडे मागणी करत होते. 

                        मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यामुळे सुमारे 400 ते 500 शालेय विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तसेच कराड आगार प्रमुखांच्या आडमुठेपणामुळे महामंडळाचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी गुरूवारी काले गावात आलेली सर्व एसटी बस आडवून ठेवल्या. सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आगार प्रमुख, पोलीस अधिकारी व कर्मचारी गावात दाखल झाले.

                         यावेळी प्रवाशांनी आगारप्रमुखांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच यावेळी उपस्थित विद्यार्थी व प्रवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. तर ग्रामपंचायत, विद्यार्थी, प्रवाशांच्यावतीने आगार व्यवस्थापनाला लेखी निवेदन देण्यात आले. दरम्यान, आगारप्रमुख जे. डी. पाटील यांनी उद्यापासून काले-कराड-मसूर ही शटल सेवा पूर्ववत सुरू होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी अडवलेल्या बसेस सोडून देण्यात आल्या.