उंब्रज येथे सेगमेंटल उड्डाण पुलासाठी ना. नितीन गडकरींकडे मागणी

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण उंब्रज पारदर्शक पुलासाठी आग्रही

उंब्रज येथे सेगमेंटल उड्डाण पुलासाठी ना. नितीन गडकरींकडे  मागणी

कराड तालुक्यातील उंब्रज या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या भराव पूल असून त्याठिकाणी सेगमेंटल उड्डाण पूल होणे अत्यावश्यक असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या भागातील जनतेच्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. 

उंब्रज हे कराड तालुक्यातील वेगाने विकसित होत असलेली बाजारपेठ असून एक विकसित गाव आहे. या गावाची लोकसंख्या २५ हजार च्या आसपास आहे. तसेच आसपासच्या ७० ते ८० गावांच्या मध्यवर्ती असलेले हे गाव आहे. उंब्रज येथे मुख्य बाजारपेठ असून विविध सोयी सुविधा या गावात आहेत. या गावातून राष्ट्रीय महामार्ग गेला असून सद्या भराव पूल येथे आहे. हा भराव पूल गावाच्या मधोमध झाल्याने गावाचे दोन भाग झाले आहेत. यामुळे येथील बाजारपेठेचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच याच रस्त्यावर असलेला बस स्थानक वापरा अभावी पडून आहे. येथील नागरिक बस साठी राष्ट्रीय महामार्गावर उभा राहतात त्यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत तसेच भराव पुलाखालील व आसपास वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन उंब्रज येथे राष्ट्रीय महामार्गावरील जुना भराव पूल काढून त्याठिकाणी नवीन सेगमेंटल उड्डाण पूल उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली असून या उड्डाण पुलासाठी आग्रही राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.