महाराजांसाठी राजधानीत धडाडणार मोदींची तोफ 

महाराजांसाठी राजधानीत धडाडणार मोदींची तोफ 

 

 

विजयाचा एल्गार : मावळ्यांमध्ये हर्षोल्लास, सरदारांच्या आशा बळावल्या


कराड / राजेंद्र मोहिते

               सातारा पोट निवडणूक याठिकाणी होणारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया किंवा येथील निकालापेक्षाही ती विधानसभेसोबत होणार की स्वतंत्र याच मुद्द्यावरच जास्त गाजली होती. परंतु, ही निवडणूक स्वतंत्र होण्याची चिन्हे दिसू लागल्याने महाराजांसह त्यांच्या मावळ्यांमध्ये नाराजी पसरली. मात्र, त्यानंतर दिल्लीश्वरांनी विधानसभेसोबतच पोटनिवडणुकीचेही फर्मान काढल्याने  संपूर्ण राजधानीच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर दस्तरखुद्द महाराजांसह त्यांच्या सरदार, मावळ्यांनीही रान उठवायला सुरुवात केली आहे. सोमवारी राजधानीत महाराजांच्या प्रचारार्थ प्रत्यक्ष तख्ते हिंदुस्थान दिल्लीश्वरांचीच तोफ धडाडणार असल्याने त्यात आणखी भर पडणार आहे.                                                                                                                                         देशातील पहिलीवहिली लोकसभा पोटनिवडणुक सातारा मतदारसंघातून होत आहे. त्यात याठिकाणाहून राष्ट्रवादीमधून खासदार राहिलेले उदयनराजे भोसले हेच पुन्हा राजीनामा नाट्यानंतर भाजपमधून निवडणुक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक खास बनली असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचेच माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी तगडे आव्हान उभे केल्याने या पोटनिवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेना व मित्र पक्षांच्या महायुतीमधील सरदार, वतनदार, सुभेदार, मावळ्यांसह अगदी भालाईत, पहारेकरीही महाराजांच्या दैदिप्यमान विजयासाठी सरसावले आहेत.                                         नुकतेच कराडप्रांती दिल्लीश्वरांच्या वजीरांनी महाराजांसह महायुतील सर्व सरदारांच्या विजयाचे भाकीत केले. आतातर राजधानी साताऱ्यात प्रत्यक्ष दिल्लीश्वरच महाराजांच्या विजयासाठी राजकीय एल्गार करणार आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या साताऱ्यातील प्रचारसभेकडे विरोधकांनीही कान टवकारले आहेत.                                                                             काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, त्यासोबत सातारा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे उदयनमहाराज, त्यांच्या मावळ्यांसह राजधानीतील रयतेमध्येही कमालीचा संताप निर्माण झाला होता. त्यानंतर राज्यासह सातारा व जिल्ह्यातील आठही मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यात भाजपच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकरवी दिल्लीश्वरांकडे यशस्वी शिष्टाई केल्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगा सोबत चर्चेअंती सातारा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम विधानसभेसोबतच जाहीर झाला. त्यामुळे महाराजांच्या मावळ्यांमध्ये पुन्हा दहा हत्तींचे बळ संचारले असून त्यांच्यामध्ये हर्षोल्लास निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.                                                                                                         सातारा पोट निवडणूक विधानसभेचेसोबत झाल्यास महाराजांच्या ताकतीचा फायदा आपल्यालाही होणार असल्याच्या खात्रीने सर्व उमेदवारांनी सदर पोटनिवडणुक एकत्रितपणे व्हावी, यासाठी भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले होते. याउलट ही पोटनिवडणूक विधानसभेनंतर झाल्यास याचा सर्वाधिक फायदा आपल्यालाच होणार असल्याच्या आत्मविश्वासामुळे ही निवडणूक स्वतंत्रपणे व्हावी, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महाआघाडीच्या उमेदवारांनीही देव पाण्यात ठेवल्याची परिस्थिती होती. मात्र, पोटनिवडणुक विधानसभेसोबत लावून महाआघाडीच्या मनसुब्यांवर दिल्लीश्वरांनी पाणी फिरवले आहे. त्यामुळे आता आपला विजय सुकर झाल्याची भावना महायुतीच्या सर्व सरदारांमध्ये निर्माण झाल्याने त्यांच्यात आपापल्या विजयाच्या आशा चांगल्याच बनवल्याचे चित्र दिसून येत आहे.