वारीला बंदी घालून शासनाने मोठा अपराध केला : संभाजीराव भिडे

पंढरपूर पायी वारीला चाललेल्या ह.भ.प. बंडातात्या कराडकरांना स्थानबद्ध करून शासनाने हिंदू धर्मातील शेकडो वर्षांच्या धार्मिक परंपरेलाच एकप्रकारे विरोध केला आहे. या कृत्यातून शासनाने हिंदू धर्माची संस्कृती खंडित करण्याचे काम केले. तसेच पायी वारीला बंदी घालून शासनाने फार मोठा अपराध केला आहे.

वारीला बंदी घालून शासनाने मोठा अपराध केला : संभाजीराव भिडे

वारीला बंदी घालून शासनाने मोठा अपराध केला : संभाजीराव भिडे

कराडात शिवप्रतिष्ठानचा निषेध मोर्चा : तहसीलदारांना निवेदन, शासनाने बंडातात्या कराडकरांची माफी मागावी 

कराड/प्रतिनिधी :

      शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर पायी वारीला विरोध केला. तसेच पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये, वारीला चाललेल्या ह.भ.प. बंडातात्या कराडकरांना स्थानबद्ध केले आहे. परंतु, शासन जाहीर सभा, निवडणुका, राजकीय लोकांचे लग्न सोहळे व वाढदिवसांना परवानगी देते. मात्र, हिंदू धर्मातील पंढरपूर वारीला शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा असून धर्माची संस्कृती खंडित करण्याचे काम शासनाने केले आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून वारीला बंदी घालून शासनाने फार मोठा अपराध केला असल्याचा आरोप श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केला.

      कराडात श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदूस्थानच्या वतीने संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या प्रमुख उपस्थित मोर्चा काढून शासनाचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. सोमवारी ५ रोजी येथील दत्त चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीपासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर श्री. शिवप्रतिष्ठानतर्फे तहसिलदार अमरदीप वाकडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

      यावेळी इतिहास अभ्यासक प्रा. के. एन. देसाई, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदूस्थानचे जिल्हा कार्यवाह केदार डोईफोडे, कराड तालुका कार्यवाह सागर आमले, डॉ. प्रवीण माने, गणेश कापसे  यांच्यासह अनेक धारकरी उपस्थित होते. तहसिलदारांना निवेदन दिल्यानंतर संभाजीराव भिडे (गुरुजी) पोलिसांनी ह.भ.प. बंडातात्या करड्कारांना स्थानबद्ध केलेल्या करवडी ता. कराड येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्राकडे धारकऱ्यांसोबत रवाना झाले.

      श्री शिवप्रतिष्ठानने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे होरपळून गेलेल्या राज्याला व्यवस्था राखण्यासाठी व संसर्ग कमी करण्यासाठी सर्व जनता प्रशासनास सहकार्य करीत आहे. तसेच प्रशासनाचे सर्व निर्बंध सचोटीने पाळत आहे. मागील वर्षी आषाढी व कार्तिकीच्या पायी दिंडी सोहळ्याला शासनाने  बंधने घून सोहळा रद्द केला. त्यावेळची एकूण परिस्थिती पाहता  हिंदू बांधवांनी तो निर्णय मान्य केला होता. 

     परंतु, यावर्षी लसीकरण हा पर्याय आहे. तरीही उपलब्ध असतानाही शासनाने पायी वारीला विरोध केला आहे. मात्र, पायी वारीची परंपरा खंडीत होऊ नये, म्हणून प्रशासनाचे सर्व नियम, अटी व शर्ती पाळून ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी  काही निवडक वारकऱ्यांसह पायी वारी पूर्ण करण्याचे प्रयत्न असता प्रशासनाने त्यांना अटक करून  स्थानबद्ध केले आहे.

     मग, पंढरपुर निवडणुकीत प्रचंड संख्येने घेतलेल्या प्रचार सभा, पुण्यामध्ये एका राजकीय कार्यालयाचे प्रचंड संख्येत उद्घाटन, मुंबई मेट्रो रेल्वेचे उद्घाटन, अनेक साखर कारखान्याच्या प्रचंड संख्येने निवडणूका व प्रचार सभा, राजकीय लोकांच्या वाढदिवसाला व लग्न समारंभाला होणारी प्रचंड गर्दी, लोकांचे जीवन उध्वस्त करणाऱ्या बारला अनुमती हे प्रशासनास चालते काय? असा सवालही श्री शिवप्रतिष्ठानने प्रशासनास सदर निवेदनाद्वारे केला आहे.

     हे सर्व प्रशासनाला निमूटपणे चालत असले तर मग भक्तीभावाने चाललेल्या हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा खंडित करण्याचा शासनाला कोणताही अधिकार नाही. शासनाची प्रजेसाठी जी कामे आहे, ती शासन करतच नाही. परंतु, हिरीरीने हिंदू धर्मातील प्रथा, परंपरांचे पालन करण्याऱ्यां अटकाव करून त्यांच्यावर निर्बंध घालणे  हेच शासनाचे कार्य झाले असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच शासनाने पायी वारीला विरोध करून तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या असून हिंदू संस्कृती व परंपरांमध्ये ढवळाढवळ करणाऱ्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानकडून सदर निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनावर शिवप्रतिष्ठानचे केदार डोईफोडे, डॉ. प्रवीण माने व सागर आमले यांच्या सह्या आहेत. 

शासनाने बंडातात्या कराडकरांची माफी मागावी 

पंढरपूरच्या पायी वारीला शेकडो वर्षाची परंपरा असून ही अखंडित ठेवण्यासाठी बंडातात्यांना आंदोलन करावे लागले. ते मोडीत काढून शासनाने त्यांना स्थानबद्ध करणे ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. बंडातात्यांचा ही धडपड स्वतःच्या स्वार्थासाठी नसून समस्त वारकरी संप्रदाय आणि त्यांची परंपरा जोपासण्यासाठी आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालून केलेली चूक तात्काळ सुधारून शासनाने त्यांची माफी मागावी, असे मतही संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी व्यक्त केले.