बेलवडेत कोव्हिड तपासणी कॅम्पमध्ये 134 जणांची तपासणी

बेलवडे बुद्रुक ता. कराड येथे ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये ग्रामपंचायत सदस्य, विविध व्यावसायिक, किरकोळ दुकानदार व संस्थात्मक कर्मचारी अशा 134 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील सर्वच्या सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

बेलवडेत कोव्हिड तपासणी कॅम्पमध्ये 134 जणांची तपासणी
कोव्हिड कॅम्पमध्ये तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी

बेलवडेत कोव्हिड तपासणी कॅम्पमध्ये 134 जणांची तपासणी 

ग्रामपंचायतीतर्फे आयोजन : सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह, ग्रा.प. सदस्य, विविध व्यावसायिक, संस्थात्मक कर्मचाऱ्यांची तपासणी 

कराड/प्रतिनिधी :
          बेलवडे बुद्रुक ता. कराड येथे ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये ग्रामपंचायत सदस्य, विविध व्यावसायिक, किरकोळ दुकानदार व संस्थात्मक कर्मचारी अशा 134 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील सर्वच्या सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी दिली. 
          येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मंगळवारी 3 रोजी सकाळी 11.00 वाजता सदर कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी सरपंच दौलतराव मोहिते (पापा), ग्रामसेवक व्ही. पी. देसाई, ग्रामविकास अधिकारी विजय पवार, रोहित मंडले, संजय मोहिते, सीएचओ डॉ. नूतन पाटील, सीएचओ डॉ. स्मिता देसाई, आरोग्य सेविका पी. एम. बनसोडे, आरोग्य सेवक अनिस मुल्ला, सुदाम कांबळे, आशा कार्यकर्त्या आदींची उपस्थिती होती. 
          सदर कॅम्पमध्ये गावातील ग्रामपंचायत सदस्य, विविध व्यावसायिक, किरकोळ दुकानदार, विविध संस्थांचे कर्मचारी, पानपट्टी धारक, औषध विक्री व्यवसायिक, चप्पल विक्री दुकानदार, खत-औषधे व बि-बियाणे विक्री व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, स्वस्त धान्य दुकानदार, दूध व्यावसायिक व कर्मचारी आदींचा समावेश होता. 
            दिवाळी सणामध्ये या लोकांचा गावातील जास्तीत-जास्त ग्रामस्थांशी संपर्क येणार आहे. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून सदर कोव्हिड तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आले होते. तसेच सदर कॅम्पमध्ये सर्व ग्रा.प. सदस्य, व्यावसायिक, कर्मचाऱ्यांनी आपापली कोव्हिड तपासणी सक्तीने करून घेण्याचे आवाहनही ग्रामपंचायतीकडून करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या या आवाहनाला सर्व ग्रा. प. सदस्य, व्यावसायिक, दुकानदार व संस्थात्मक कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 
          दरम्यान, गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. यावेळी लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याकाळात बेलवडे बुद्रुक गावामध्येही कोरोनाचे काही बाधित रुग्ण आढळले होते. यातील काही रुग्णांना उपचारासाठी कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर अनेक रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने होम आयसोलेट होत उपचार घेतले. तसेच या रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मातही केली होती. 
          तसेच कोरोना प्रदुर्भावाच्या काळात गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्जंतुकीकारण करण्यात आले होते. त्याचबरोबर गावातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण, युवकांनीही पुढाकार घेत  निर्जंतुकीकरण औषध फवारणी केली होती. शिवाय, भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाच्या माध्यमातूनही या गटाच्या सदस्यांनी गावामध्ये एचटीपीव्दारे निर्जंतुकीकरण औषध फवारणी केली होती.  
          त्याचबरोबर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात ऑक्सिजन मशीनकची आवश्यकता पाहता गावातील काही युवकांनी एकत्र येत लोकवर्गणीतून एक ऑक्सिजन सपोर्ट मशीन खरेदी केले होते. त्याचाही चांगला उपयोग संकटकाळात ग्रामस्थांना झाला होता. या सर्वांनी कोरोना प्रादुर्भाव काळात आपापल्या परीने मोलाचे योगदान देऊन तालुका पातळीवर एकप्रकारे आदर्श निर्माण केला होता. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे गावात कोरोना संसर्ग रोखण्यास मदत झाली होती. 
          सध्या गावामध्ये एकाही बाधित वा संशयित रुग्ण नसल्याने बेलवडे बुद्रुक पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. तरीही येत्या काळात अशाच प्रकारे गावाला कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी आपापले बहुमूल्य योगदान द्यावे. त्याचबरोबर सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरीही लोकांनी निष्काळजीपणा न दाखवता गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, वारंवार साबणाने हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, गरम पाणी प्यावे, कोणत्याही प्रकारे लोकांनी अंगावर दुखणे काढू नये, काही प्राथमिक लक्षणे आढळल्यास तात्काळ कोव्हिड तपासणी करून योग्य औषधोपचार घ्यावेत, स्वतःसह आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहनही वेळोवेळी ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे.