'जंटलमन' क्रिकेटर ....नरेंद्र पंडित उर्फ 'बबलू'

नकळत सारे घडून गेले न मागताच खूप काही मिळाले

'जंटलमन' क्रिकेटर ....नरेंद्र पंडित उर्फ 'बबलू'

अनिल कदम/उंब्रज

सुंदर,हँडसम बॉलिवूड मधील हिरोलाही लाजवेल असे व्यक्तिमत्त्व कमिटमेंटला तत्पर असणारा जनटलमेंट क्रिकेटर म्हणजे नरेंद्र पंडित उर्फ बबलू बघता क्षणी आपल्या काळात अनेकींना घायाळ करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे 'बबल्या' टोपणनाव परंतु सहकारी मित्रांच्यात प्रसिद्ध असणारा दिलखुलास क्रिकेटर आणि एव्हरग्रीन मित्र.

१९८० मध्ये सैनिकस्कुल सातारा येथून १० वी पर्यतचे शिक्षण पूर्ण करून,शालेय वयात ज्युनिअर आणि सिनिअर खेळाडू म्हणून फुटबॉल,क्रिकेट आणि बास्केटबॉलचा श्रीगणेशा केलेल्या नरेंद्र पंडित यांना सैनिकस्कुल मध्ये क्रिकेटला खूप कमी स्कोप मिळाला,परंतु शिस्त,काटेकोरपणा तसेच वरिष्ठांबद्दल आदर याची शिकवण व संस्कार बालवयातच सैनिकी शिस्तीत झाले होते.

शालेय वयातच अंडरआर्म क्रिकेट खेळणाऱ्या बबलूचे वडील माणिकचंद दालचंद पंडित हे कडक शिस्तीचे तसेच उत्तम खेळाडू होते स्वतः पुणे विद्यापीठाच्या क्रिकेट टीमचे तसेच महाराष्ट्र संघातील खेळाडू होते.आणि बबलूचे गुरूही होते त्यांनी सांगितलेलं एक वाक्य कायमच बबलुच्या मनावर कोरले गेले होते, खेळातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बचाव आहे.माणिकचंद पंडित,डॉ. शिरीष नांगरे आणि सुधाकर शानभाग हे नरेंद्र पंडित यांच्या बरोबर क्रिकेटच्या सरावात देखील भाग घेत असत.

सैनिक स्कुल मधून पास होऊन बाहेर पडल्यावर बबलुच्या क्रिकेटची खरी सुरुवात वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली त्यावेळी रमेश शानभाग,डॉ.शिरीष नांगरे,अफझल पठाण,सुनील गाडेकर,यांच्या बरोबर सिमेंट विकेटवरील मॅटवर खूप घाम गाळत सराव पार पडत होता,त्यावेळी सातारा जिल्हा संघातून १९/२२ वर्षाखालील तसेच वरिष्ठ जिल्हा संघात स्थान मिळाले होते.सैनिक स्कुलचे माजी विद्यार्थी रमेश शानभाग,सुधाकर शानभाग,डॉ.शिरीष नांगरे यांनी कायमच स्पोर्टिंग स्पिरिटने बबलूला मदत केली होती.ओपन क्रिकेट स्पर्धेत पुणे,कोल्हापूर,चिपळूण,अहमदनगर 
या ठिकाणी होणाऱ्या बहुतांश स्पर्धेत खेळायची संधी बबलूला मिळाली आणि त्याच बरोबर सातारा जिमखाना (पूर्वीचे नाव स्टेडियम क्लब) संघाकडून खेळताना एकनाथ सोलकर,के जयंतीलाल,शिशिर हट्टंगडी,नरेश चुरी,आणि ऑल टाइम ग्रेट फास्ट गोलंदाज अफजल पठाण यांनी त्या काळात मुंबई,महाराष्ट्र संघाकडून रणजी ट्रॉफी खेळली होती अशा खेळाडूच्या बरोबर दोन हात करण्याची संधी मिळाली होती.त्यावेळी वयाने सर्वात लहान खेळाडू म्हणून नरेंद्र पंडित यांचे सर्वांनाच कौतुक होते आणि सर्वच सिनिअर खेळाडूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळे बबलुचा क्रिकेटचा पाया मजबूत झाला होता.

१९८३,१९८५,आणि १९८७ साली शिवाजी विद्यापीठ संघातून खेळलेल्या नरेंद्र पंडित यांनी पहिल्याच एकदिवसीय सामन्यात नाबाद १२६ धावांची दणकेबाज खेळी करून लक्ष वेधले होते.यावेळी विद्यापीठ संघाचे नेतृत्व अनुक्रमे राहुल देसाई आणि नितीन देशमुख या खेळाडूंच्याकडे होते १९८४ साली सुद्धा बबलू ची निवड  विद्यापीठ संघात झाली परंतु दुर्दैवी ती अंतर विद्यापीठ स्पर्धा ठरली होती.

एका सामन्यात युनायटेड वेस्टर्न बँक ट्रॉफी खेळताना आर.सी.एफ मुंबई संघविरुद्ध खेळायची संधी मिळाली.त्यावेळी बलविंदरसिंग संधू हे विरोधी संघातील प्रमुख गोलंदाज होते.आणि त्यावेळी भारतीय संघातून खेळत होते,त्याच्या वेगवान माऱ्यासमोर 'त्या'वेळी ४० धावांची खेळी बबलूने केली होती,तर त्याच स्पर्धेत इनकम टॅक्स संघविरुद्ध नाबाद १२५ धावा केल्या होत्या आणि त्याही मॅटिंग विकेटवर समोर ग्रेगरी डिमोंती जो नुकताच भारतीय 'अ' संघातून झिम्बाब्वे संघाचा दौरा करून आला होता.तर सोबतीला अविनाश रानडे,विजय सगम असे नामांकित खेळाडू होते.त्यावेळेस अतिशय अटीतटीच्या सामन्यात बबलू ची टीम हरली होती.परंतु शतक आणि तीन बळी घेतल्याने बबलूने सर्वांचीच मने जिंकली होती.त्यानंतर इचलकरंजी येथे एका खुल्या स्पर्धेत दोन शतके केली होती,आणि सलग तीन शतके करण्याचा एक अनोखा विक्रम सातारा सारख्या ग्रामीण भागातील खेळाडूने केला होता.आणि त्यानंतर एक व्यावसायिक व निमंत्रित खेळाडू म्हणून इनकम टॅक्स पुणे संधी मिळाली आणि काही काळासाठी नरेंद्र पंडित यांनी ती स्वीकारली होती.

नरेंद पंडित यांनी कोल्हापूर येथील मराठा स्पोर्टिंग क्लब तर्फे खेळताना एका सामन्यात रियाझ पुनावाला,श्रीकांत कल्याणी,राहुल देसाई,नरेंद्र देसाई,रियाझ बागवान,सचिन उपाध्ये यांच्या सोबत खेळताना पहिल्याच सामन्यात मुंबई कर खेळाडूंचा भरणा असणाऱ्या होमगार्ड संघविरुद्ध ८७ धावा केल्या होत्या.नरेंद्र पंडित यांच्या नातेवाईकांचा असणारा शर्मा ११ या क्लब कडून बरेच क्रिकेट खेळले.
निमंत्रित लीगमध्ये कायमच भाग घेत होता.हा बबलुचा कौटुंबिक क्लब होता आणि याचे संस्थापक बबलूचे काका होते.या चमूमध्ये चुलत भाऊ विजय शर्मा, भूपेंद्र शर्मा (२२ वर्षाखालील भारतीय संघाचा उपकर्णधार), श्रीराम तोरवी या सर्वांनी महाराष्ट्र रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.पुणे येथील निमंत्रित स्पर्धेत तसेच जसदनवाला व रुंगठा सामन्यात खोऱ्याने धावा केल्यावर १९८३ मध्ये रणजी ट्रॉफी शिबिरासाठी नरेंद्र पंडित यांची निवड झाली. रुंगठा ट्रॉफीसाठी पश्चिम विभागातील जिल्हा एकत्रित संघ असायचा,या संघात अजित इंदुलकर कर्णधार, रमेश हजारे, राहुल देसाई, रमेश कदम यांचा समावेश होता. बबलूने २१ आणि ७५ धावा एका सामन्यात केल्या होत्या हा सामना दक्षिण झोन टीम बरोबर होता ज्यामध्ये राजू लेले, शेखर घोष असे दोन वेगवान गोलंदाज होते ज्यांनी यापूर्वी महाराष्ट्र रणजी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.तर शाम ओक,अरान्डॅल डॅनियल, सलील अंकोला, सुनील गुदगे, रमेश बोर्डे, ग्रेगरी डेमोंटे, बोर्डे, अनिल वाल्हेकर यांचा समावेश असलेल्या पुणे संघाविरुद्धच्या सामन्यात बबलूने ३५ आणि ८५ धावा तर सुधाकर शानभाग यांनी दुसर्‍या डावात नाबाद ८७ धावा केल्या होत्या.त्यावेळेस या सर्वांचे कौतुक मकरंद वायंगणकर यांनी "षटकार"या मासिकात जिल्हा पातळीवर असणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले होते.आणि ग्रामीण भागातील खेळाडूंची प्रतिभा आणि गुणवत्ता यावर भरभरून लिहिले होते तसेच ग्रामीण भागातील खेळाडू रणजी सामन्यात संधी मिळण्यापासून वंचित राहतात याबाबत रोखठोक लिखाण केले होते.

त्याचवर्षी कराडला होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यासाठी नरेन्द्र पंडित आणि सुधाकर शानभाग हे महाराष्ट्र रणजी संघात होते.परंतु अंतिम ११ जणांच्या खेळाडू मध्ये सहभाग नसल्याने सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनने 'नो' पंडित 'नो' शानभाग 'नो' मॅच असा पवित्रा घेतला होता.मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही.त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने नरेंद्र पंडित यांना महाराष्ट्र ऐवजी मुंबई कडून खेळण्याचा उपरोधिक सल्ला दिला होता.एकदा २२ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली परंतु खेळण्याची संधी काही मिळाली नाही.यानंतर बबलू समजून गेला की त्याला रणजी संघाचे दरवाजे कायमचे बंद झाले आहे कारण १९८३ ते १९८७ असे सलग पाच वर्षे रणजी ट्रॉफी नेट साठी बबलूची निवड होत होती.परंतु संघात घेताना मात्र टाळाटाळ केली जात असत आणि कहर म्हणजे १९८७ च्या सिझन मध्ये जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या बबलूने आंतरजिल्हा आणि जसदनवाला रुंगठा स्पर्धेत खोऱ्याने धावा काढून सुद्धा निवड समितीने पाठ दाखवली होती यामुळे "पुणेरी"राजकारणाला कंटाळून शेवटी १९८७ मध्ये बबलू व्यावसायिक क्रिकेट पासून फारकत घेतली.

आंतरजिल्हा स्पर्धा तसेच रुंगठा स्पर्धा यामध्ये खरोखर नरेंद्र पंडित यांना काही जिवाभावाचे मित्र भेटले यामध्ये राहुल देसाई,राजेश केळवकर,सचिन उपाध्ये,अतुल गायकवाड, रमेश हजारे,ध्रुव केळवकर, मिलिंद कुलकर्णी,राजेश पास्ते, उमेश गोटखिंडीकर,फझल पठाण,सुनील गाडेकर,केतन दोशी,महेश कारंजकर जे बबलू ला कुटुंबा इतकेच आजही प्रिय आहेत आणि मैत्रीचे बंधही कायम आहेत.

१९९० मध्ये नरेंद्र पंडित यांची कस्टम आणि सेंट्रल एक्साइज मध्ये खेळाडू कोठ्यातून निवड झाली हाच काय तो खेळण्याचा मोठा फायदा झाला.यानंतर १९९७ पर्यत खात्या अंतर्गत होणाऱ्या सर्वच स्पर्धात बबलूने भाग घेतला सचिन उपाध्ये,अतुल गायकवाड,मंदार शालू,यांच्या बरोबर कायम संघाला अंतिम फेरी पर्यत घेऊन जाऊ लागले. परंतु १९९७ मध्ये कोलकाता येथे सेमी फायनल सामना खेळताना बबलुची दोन हाडे फ्रॅक्टर झाल्याने  क्रिकेट खेळाला कायमचा रामराम करावा लागला.

यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने २००५ मध्ये सुधारणा समितीमध्ये निवड केली, तर सुधाकर शानभाग यांना सचिव म्हणून निवड जाहीर केली होती. आणि अजय शिर्के हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशन ला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मतदानात सहभाग मिळवून देण्यासाठी  रियाज बागवान,राहुल देसाई, धनपाल शहा यांच्या सोबत यशस्वी लढा दिला होता,आणि याच वेळेस महाराष्ट्रातील इतर खेळाडूंना रणजी संघासाठी दारे उघडली होती.२००५ ते २००९ सुधारणा समिती मध्ये  असताना सुरेंद्र भावेंच्या बरोबर परदेशी कोच डेरेन होल्डर आणि व्यावसायिक कोच चंद्रकांत पंडित यांच्या बरोबर महाराष्ट्रातील मैदाने आणि महाराष्ट्र संघ यांच्या सुधारणे विषयी महत्वपूर्ण धोरणे अंगिकारली परंतु २००९ मध्ये कामाच्या वाढत्या व्यापामुळे या पदाचा राजीनामा दिला सध्या सरकारी खात्यात ३० वर्षे सेवा बजावल्या बाबत बबलू चा भारत सरकारने यथोचित सन्मान केला आहे आणि चांगले काम केले यासाठी दोन वेळा सन्मान अवार्ड सुद्धा मिळाला आहे
--------------------------
माझे स्नेही डॉ.शिरीष नांगरे,सुधाकर शानभाग,रमेश शानभाग,अफझल पठाण,सुनील गाडेकर आणि सहकारी मित्र राहुल देसाई,रियाज बागवान,राजेश केळवकर, सचिन उपाध्ये,महेश कारंजकर,आणि अर्थातच माझे आवडते खेळाडू केतन दोशी आणि राजू जाधव हे माझ्या काळातील उत्कृष्ट खेळाडू आणि सहकारी ज्यांच्याकडे एक वेगळीच क्वालिटी होती जी मी शब्दात वर्णन करू शकत नाही.राजू जाधव हे साक्षीदार आहेत सातारा जिल्हा क्रिकेटला नावारूपाला आणण्यासाठी जिल्हा संघाचा कर्णधार म्हणून किती अडचणी आल्या.आणि आम्ही सर्वानी मिळून त्यांचा कसा सामना केला हे राजू जाधव यांच्या पेक्षा दुसरं कोणीही सांगू शकणार नाही.शेवटी प्रत्येक खेळाडूला एक उपजत गुण असतो आणि एक वेगळेपण असते परंतु त्याचे कायम गुणगान होईल याची खात्री नसते.

जिगरी यार

प्रदीप मोरे,काशीनाथ राव,दीपक पाटील,धनंजय कान्हेरे,मिलिंद तळवलकर, पांडुरंग बाबर,अरविंद पटेल,दुर्वास कांबळे, हे सर्व सातारा जिमखाण्याचे  सवंगडी कायमच मनाच्या एका कप्प्यात राहिले होते

नरेंद्र पंडित

माजी प्रतिनिधी, सुधारणा समिती
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
-------------------------------