बहिणीला भावाची साद

पंकजा मुंडेंना शिवसेनेची ऑफर

बहिणीला भावाची साद

बहिणीला भावाची साद

पंकजा मुंडेंना शिवसेनेची ऑफर

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बीड येथे पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय गुडबुक मध्ये असणारे ना.देसाई यांनी हे व्यक्तव्य केले असल्याने महत्त्व प्राप्त झाले आहे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचे व्यक्तिगत संबंध अतिशय घरोब्याचे होते तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीररीत्या पंकजा मुंडे यांना बहिणीच्या अडचणीत भाऊ म्हणून कायमच पाठीशी खंबीर उभा राहीन असा शब्द दिला असल्याने पंकजा मुंडे आता काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागलेल्या आहेत.

भाजप खासदार प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच, आता शिवसेनेच्या एका नेत्याने पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. तसेच पंकजा मुंडे  यांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल, असे वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले आहे.

बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडेंवर बोलताना म्हणाले की, "भाजप नेत्या पंकजा मुंडे या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. त्यांचा योग्य तो मानसन्मान दिला जाईल, पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्यामुळे त्या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. तसेच त्यांचा योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून केला जाईल," असे शंभुराज देसाई  म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात वरळीत झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून भाजपला नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे सूचक इशारा सुद्धा दिला आहे.त्यामुळे त्यांची नाराजी अजूनही कायम असल्याचं बोलले जात आहे.