कराडच्या युवकांची हटके कोविड जनजागृती 

कराडमधील निखिल खोत आणि अभिषेक माने या दोन युवकांनी हटके कोविड जनजागृती करण्यासाठी लाईटबग्ज या ऍडव्हरटाईज कंपनीच्या माध्यमातून अनोखे कॅंपेन बनवले आहे. या कॅंपेनची सध्या शहरात चांगलीच चर्चा असून नगरपालिकेही सदर कॅंपेनचे बॅनर करून शहरातील महत्वाच्या ठिकाणी लावले आहेत.

कराडच्या युवकांची हटके कोविड जनजागृती 
कराड : निखिल आणि अभिषेक यांनी बनवलेले कोविड-19 जनजागृती बॅनर. हे बॅनर प्रीतीसंगम बाग व बसस्थानकासह शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. 

कराडच्या युवकांची हटके कोविड जनजागृती 

निखिल खोत व अभिषेक माने यांची कल्पना : लाईटबग्ज ऍडव्हरटाईज कंपनीद्वारे निर्मिती, नगरपालिकेला कॅम्पेन भेट 

कराड/प्रतिनिधी :

          कोविड जनजागृतीसाठी शासनासह विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापरही करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कराडमधील दोन युवकांनी हटके कोविड जनजागृती करण्यासाठी लाईटबग्ज या ऍडव्हरटाईज कंपनीच्या माध्यमातून अनोखे कॅंपेन बनवले आहे. या कॅंपेनची सध्या शहरात चांगलीच चर्चा असून नगरपालिकेही सदर कॅंपेनचे बॅनर करून शहरातील महत्वाच्या ठिकाणी लावले आहेत. यामुळे कोविड-१९ बाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास चांगलीच मदत होणार आहे.

           कराडचे रहिवासी आणि लाईटबग्ज आर्ट कंपनीचे संस्थापक व कार्यवाहक निखिल खोत हा मलकापूर ता. कराड येथील यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून त्याचा मित्र अभिषेक माने याने अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली आहे. या दोघांच्या सहकार्यातून ही सर्व संकल्पना राबवण्यात आली असून त्यांच्या लाईटबग्ज या ऍडव्हरटाईज कंपनीद्वारे तयार करण्यात आलेले कॅंपेन एक सामाजिक बांधिलकी म्हणून कराड नगरपालिकेस भेट स्वरुपात देण्यात आले आहे. 

           मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आरोग्य विभागामार्फत या कॅंपेनचे बॅनर करून शहरातील महत्वाच्या ठिकाणी लावले आहेत. हे जनजागृती बॅनर सध्या जाणा-येणाऱ्यांचे लक्ष वेधत असून याद्वारे कोविड-१९ बाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होत आहे.

          एक उत्कृष्ट छायाचित्र समाजामध्ये कोणती जागृती निर्माण करू शकते, याचे  एक उदाहरण म्हणजे आफ्रिकेमधील एक छायाचित्र. ज्यात एक बालक भेगाळलेल्या जमिनीवर मरणासन्न अवस्थेत बसले आहे. ती मरणपंथाला लागलेली आकृती आपण पाहतो. त्यामध्ये मागच्या बाजूला बसलेले एक गिधाड दिसते आणि आपण नखशिखांत हादरून जातो. आफ्रिकेमधील वास्तव फक्त एक छायायचित्र सांगून जाते. याच सत्य घटनेवरून निखिल खोत व अभिषेक माने या दोन युवकांनी प्रेरणा घेऊन एक प्रभावशाली आणि वेगळ्या कल्पनेतून कोविड जनजागृती मोहीम हाती घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी सदरचे जनजागृती कॅंपेन बनवले आहे. 

                  तो आहे, दोन वर्षापूर्वी तो आला आणि अजूनही तो आहे.

                           तो म्हणजे कोविड ! 

           कोरोनाबद्दल असंख्य गोष्टी सांगण्यात आल्या. तसेच त्याचा संसर्ग रोखण्यासाठी शासन स्तरावर मोठमोठ्या मोहिमा व योजनाही राबवण्यात आल्या. पण, तो अजूनही आहे, गेलाला नाही. त्यानंतर लॉकडाऊन, सोशल डिस्टनसिंग सारखे उपायही अवलंबण्यात आले. पण तो गेला नाही. बरेच उपक्रम राबवून सूचनात्मक वाक्यांचा जास्त प्रमाणात वापर करण्यात आला. परंतु, लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय, शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे लोकांना बराच मोकळा वेळ मिळाला. त्याच दरम्यान सोशल मिडिया जास्त वापरात आल्याने लोकांना मनोरंजनासाठी भरपूर वेळही मिळाला. नंतर त्या गोष्टीची सवय लागून लोकांना त्याची आवड निर्माण झाली. म्हणूनच समाजातील झालेल्या बदलांचा विचार लक्षात घेऊन मनोरंजनात्मक आणि विनोदी भावना असलेल्या वाक्यांचा वापर करून या युवकांनी हे जनजागृती कॅंपेन बनवले आहे. 

           त्यामध्ये वाक्यांवरोबर छायाचित्रेही वापरण्यात आली आहेत. ती ज्या ठिकाणी काढली गेली आहेत, त्याच ठिकाणी ते फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे तो आपल्या आसपास असल्याची जाणीव निर्माण करून सतर्क राहण्यास भाग पाडतो. याचबरोबर सावधानतेसाठी ज्या चिन्हांचा वापर केला जातो, तीच चिन्हे डिझाईन्समध्ये वापरण्यात आल्याने या फलकांकडे लोकांचे सहजरीत्या लक्ष्य वेधले जाते. कोणतीही सूचनात्मक भावना न देता फक्त डिझाईन्स व चिन्हांद्वारे सतर्क राहण्याची भावना निर्माण करणे, हे या फलकांचे उद्दिष्ट असल्याचे मत निखिल व अभिषेकने व्यक्त केले आहे. 

          जनजागृतीच्या हा हटके कल्पनेतून या युवकांनी मनोरंजनात्मक पद्धतीने केलेली वाक्ये, त्या ठिकाणची छायाचित्रे, त्याला योग्य त्या डिझाईनची जोड याचा सुरेख त्रिवेणी संगम साधून समाजाशी संवाद साधला आहे. या सर्वाचा एक रास्त परिणाम पाहण्याऱ्याचा मनात नकळत होत जातो आणि पाहणारा सावध होतो. एकंदरीत समाजमनाच्या लक्षात राहील व कोणत्याही सूचना न देता पाहणाऱ्याच्या मनात सतर्कतेची भावना जागृत होऊन ते सावध होतील, हे कार्य या मोहिमेमधून सिद्ध होते. 

          सध्या शहरातील विविध महत्वाच्या ठिकाणी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आरोग्य विभागामार्फत या कॅंपेनचे बॅनर करून लावले आहेत. हे बॅनर रस्त्यांवरून जाणा-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून याद्वारे कोविड-१९ बाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे.