मुंबईहून आला पण घरीच नाही आला,वर्णेकरांनी टाकला सुटकेचा निःश्वास

मुंबईहून आला पण घरीच नाही आला,वर्णेकरांनी टाकला सुटकेचा निःश्वास

उंब्रज/प्रतिनिधी

जानाईनगर,वर्णे (ता.सातारा) येथे मुंबई येथून आलेल्या एकाचा मंगळवार (ता.१९) रोजी कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यामुळे वर्णे व परिसरात एकच खळबळ उडाली होती. परंतु सदर व्यक्ती हा याठिकाणी आलाच नसल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती खारघर (मुंबई) येथून खाजगी वाहनाने जानाईनगर, वर्णे येथे येण्यासाठी आपल्या कुटुंबासह निघाला होता. पण वर्णे येथे न येता ते सर्व जकातवाडी येथील आपल्या बहिणीच्या घरी रविवार (ता.१७) रोजी पोहोचला. तेथेच त्यांला त्रास होवू लागल्याने स्वत: होवूनच सातारा येथील जिल्हा रूग्णालयात दाखल झाला. 

तेथे त्याच्या घशातील स्त्रावाची तपासणी केल्यानंतर त्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याठिकाणी त्याच्या नावाची व गाव म्हणून वर्णे-आबापूरीची नोंद करण्यात आली. याची माहिती रूग्णालयाने जिल्हा प्रशासनास दिली. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तालुका आरोग्य विभागाला पुढील कारवाईची सूचना केली. परंतु रात्री उशीरापर्यंत शोध घेवून सुध्दा रूग्णालयाने दिलेल्या नावाचा व्यक्ती गावात नसल्याचे निदर्शनास आले. परंतु बुधवारी सकाळी सखोल माहिती घेतल्यानंतर ही व्यक्ती येथीलच असून ती गेले वर्षभरापासून आजअखेरपर्यंत गावातच आली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वर्णे व परिसरातील इतर गावातील ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु सत्य कळल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. तरीसुध्दा खबरदारी म्हणून गावात त्यांचे घरातील इतर व्यक्ती यांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. नांदगाव आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी एम पी रायबोले, बोरगाव पोलिस ठाण्याचे स. पो. नि. डाँ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरिक्षिका वर्षा डाळिंबकर तसेच सरपंच रसिका काळंगे, उपसरपंच अशोक भोसले, ग्रामसेवक देवानंद निकम, आरोग्य कर्मचारी बोधे यांनी भेट देवून प्राप्त परिस्थितीचा आढावा घेतला. 

त्याचप्रमाणे गावात मागील चार ते पाच दिवसांपासून मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून आलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबीयांचे त्यांचे वैयक्तिक घरातच विलगीकरण करून त्यांना शासकीय सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सांगण्यात आले आहे.