गुंड पवन सोळवंडे याची गोळीबार करून हत्या

गुंड पवन सोळवंडे याची गोळीबार करून हत्या
पवन सोळवंडे

 

अज्ञातांकडून कृत्य, 5-6 गोळ्यांच्या झाडल्या फैरी, पोलिसांकडून तपासाला गती 

कराड/प्रतिनिधी : 

                        येथील गुंड पवन दिपक सोळवंडे यांच्या बुधवार पेठ परिसरातील राहत्या घरात घुसून अज्ञातांनी गोळीबार करून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. चार अज्ञात हल्लेखोरांनी पवन याच्यावर 5 ते 6 गोळ्यांच्या फैरी झाडून बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर कराड शहरसह परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. 
                 सोमवार दि. 19 रोजी रात्री येथील बांधकाम व्यावसायिक निहाल पठाण याला खंडणी मागून ती न दिल्यामुळे नंग्या तलवारी नाचवून दहशत माजवल्या प्रकरणी मंगळवारी 20 रोजी शहर पोलीस ठाण्यात पवनसह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर घडलेल्या या प्रकारामुळे या हल्ल्यातील हल्लेखोर स्थानिकच असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्यादृष्टीने पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. 
                 दरम्यान, सोमवारी  रात्री खंडणी न दिल्याने नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवल्याच्या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर याप्रकरणी शहर पोलिसात पाच जणांवर गुन्हा नोंद झाल्यानंतर यातील संशयितांची नावे समोर आली. त्यानंतर या चर्चेने आणखीनच जोर धरला होता. त्यातच मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात मोठे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या घटनेवरून संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.