शेणोली येथील तीन युवक कंटेनरच्या धडकेत ठार

शेणोली येथील तीन युवक कंटेनरच्या धडकेत ठार

कराड/प्रतिनिधी : 

                          शेणोली ता. कराड येथे व्यायामाला गेलेल्या तीन युवकांना कंटेनरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास कराड-तासगाव रस्त्यावर शेणोली-भवानीनगर दरम्यान घडलेल्या या घटनेत तीन युवक जागीच ठार झाले. तर रस्त्यालगत व्यायाम करत असलेला एकजण या घटनेत सुदैवाने बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थ, प्रवाश्यांनी मोठी गर्दी केली होती.  

                          या घटनेत विशाल धोंडीराम गायकवाड, प्रवीण हिंदुराव गायकवाड व दीप ज्ञानू गायकवाड अशी घटनेत जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. तर रोहित आनंदराव गायकवाड (सर्व रा. सम्राटनगर, शेणोली) हा या घटनेत बचावला आहे. 

                         याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड-तासगाव रस्त्यावर शेणोली-भवानीनगर दरम्यान पहाटेच्या सुमारास विशाल, प्रवीण, दीप व रोहित हे युवक नेहमीप्रमाणे व्यायामासाठी केले होते. सोमवारी 23 रोजी शेणोली गावानजीक रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव कंटेनरने यातील विशाल गायकवाड, प्रवीण गायकवाड व दीप गायकवाड या तिघांना चिरडले. त्यामध्ये ते जागीच ठार झाले. तर याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला व्यायाम करत असलेला रोहित गायकवाड हा या घटनेत सुदैवाने बचावला आहे. 

                         दरम्यान, घटनास्थळानजीक असलेल्या वस्तीतील लोकांनी या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. मात्र, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे शेणोली गावासह परिसर व तालुक्यावर शोककळा पसरली आहे. तसेच या तीनही युवकांच्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.