अबब.... खराडे येथील टेकडी उद्धवस्त...?

कराड तालुक्यातील बेकायदेशीर मुरूम उपशामुळे परिसरात खसखस

अबब.... खराडे येथील टेकडी उद्धवस्त...?
अबब.... खराडे येथील टेकडी उद्धवस्त...?

अबब.... खराडे येथील टेकडी उद्धवस्त

 

बेकायदेशीर मुरूम उपशामुळे परिसरात खसखस

 

अनिल कदम / उंब्रज

 

खराडे ता.कराड गावच्या हद्दीतील साईबाबा मंदिर चौकातील डोंगरवजा टेकडी मुरूम उपशामुळे जवळपास भुईसपाट झाली आहे.यामध्ये महसूल विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे नाममात्र चलन आणि बेफाम मुरूम उपसा झाला असल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.चिरीमिरीच्या सुळसुळाटाने ठेकेदार शिरजोर तर महसूल कर्मचारी कमजोर झाल्याची चर्चा पसरली आहे.रस्त्याच्या कामासाठी मुरुमाची गरज असल्याची मागणी करून सदरचा मुरूम अन्यत्र वापरल्याने 'त्या'ठेकेदाराने शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याची चर्चा आहे.

 

याबाबत महसूल विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार एका ठेकेदाराने खराडे हद्दीतील गट नंबर ३१५ मधील मुरूम उपसा करण्या संदर्भात महसूल विभाग कराड यांचे कडून परवानगी घेतली होती.सदरची रॉयल्टी भरलेल्या पावतीनुसार १०० ब्रास मुरूम उपसा करण्यासाठी २७ जुलै २०२० ते १५ ऑगस्ट २०२० अशी गौण खनिज उपसा व वाहतूक परवानगी दिली तर दुसरे १०० ब्रास मुरूम उत्खनन चलन भरले असता ८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर असे उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाने गौण खनिज परवाना क्र. गौख/ता.प./एसआर-१५/२० हा दिला यानंतर संबंधित तत्कालीन मंडल अधिकारी व गावकामगर तलाठी यांनी होणारे उत्खनन बरोबर आहे की प्रमाणापेक्षा जास्त आहे याची खातरजमा करून घेणे गरजेचे असताना दि २७ जुलै ते २४ ऑगस्ट २०२० पर्यत बेफाम मुरूम उपसा होत असताना बघ्याची भूमीका घेतल्याची लोकांच्यात चर्चा आहे.

 

सदर उत्खनन केलेला मुरूम हा दुर्गळवाडी ता.कोरेगाव व पेरले ता.कराड येथील रस्त्याच्या कामासाठी वापरावयाचा असल्याची लेखी मागणी ठेकेदार यांनी शासन दप्तरी केली आहे परंतु प्रत्यक्षात सदर ठिकाणचा मुरूम हा दररोज पोकलँडच्या साहाय्याने उपसा करून मोठ्या डंपर मधून अन्यत्र वाहतूक केल्याची माहिती स्थानिक ठिकानांवरून मिळत असून याबाबतचे उपलब्ध छायाचित्रे व व्हिडिओ शूटिंग यांच्या माहितीवरून मुरुम उपशाचे मोठे गौडबंगाल या ठिकाणी घडले असून याबाबत रावसाहेब यांनी केलेला कानाडोळा यामुळे जनतेत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

 

याबाबत खराडे येथील एका शेतकऱ्याने सदर ठेकेदाराला दिलेल्या नोटरीनुसार सदरची पडीक जमीनीचे क्षेत्र ३१ गुंठे असून सदर जमीन व्यवस्थित करण्यासाठी गट न.३१५ मधील मुरूम 'त्या'ठेकेदाराला रस्त्याच्या कामासाठी देत आहे असे नोटरी करून दिले आहे.यामुळे शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतातील ३१ गुंठे क्षेत्रातील २०० ब्रास मुरूम काढण्यासाठी केलेली नोटरी कोणाच्या अंगलट येणार हे पाहणे महत्वाचे असून ठेकेदाराने हात वर केल्यास सदरचा शेतकरी नाहक अडचणीत येणार आहे.यामुळे महसूल विभाग नक्की काय भूमिका घेणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.का नेहमीप्रमाणे ऑल इज वेल म्हणत सर्वानाच क्लीन चिट देणार हे पाहावे लागणार आहे.तसेच तहसिलदार कराड यांनी सदर बाबीची सखोल चौकशी करून शासनाचा महसूल गंगाजळी जाणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे.व दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करून तालुक्यात एक आदर्श घालून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

 

मोक्याच्या जागेमुळे खटपट

 

तारगाव फाटा हा खराडे,वाठार,मसूर आणि खराडे कालगाव यांना जोडणारा चौक असल्याने कायमच नागरिकांची वर्दळ याठिकाणी असते तसेच याठिकाणी हॉटेल,दुकाने,याची वाढती संख्या यामुळे सदर जागामालक शेतकऱ्याने डोंगर टेकडी फोडून त्याठिकाणी दुकानगाळे व इतर व्यासायिक कारणासाठी वापर करण्याचा हेतून सदरची जागा लेवल करण्यासाठी मुरूम उपसा करण्यास सांगितले असल्याची चर्चा आहे.परंतु परवाना २०० ब्रासचा आणि उपसा वारेमाप यामुळे त्या शेतकऱ्याच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहिला असल्याची चर्चा खराडे परिसरात आहे.

 

 

उत्खनन सुरू करण्यापूर्वी अटी आणि शर्तीचे काय ?

 

महसूल विभाग उत्खनन परवानगी देताना या शासकीय परवानगीच्या पाठीमागे २५ अटी आणि शर्ती घालून देत असते परंतु यातील किती बाबींचे पालन केले जाते किंवा या अटी आणि शर्ती काय आहेत याची कल्पना मंडल अधिकारी आणि गावकामगर तलाठी यांना तरी आहेत का हा संशोधनाचा विषय आहे.तसेच याची पूर्तता केल्याची कोणतीही नोंद माहिती मिळालेल्या कागदपत्रात नसून सर्वत्र सावळागोंधळ असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर शासन महसुलाची चोरी झाली असल्याची चर्चा असून याबाबत पंचनामा झाल्यावरच खरी बाब निदर्शनास येणार आहे.