सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी पालिकेची निविदा टेंडर भरावीत

शहरातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांनी नगरपालिकेच्या निविदा टेंडर भराव्यात. त्यामुळे विकासकामांचा दर्जाही सुधारेल आणि तरुणांना कामही मिळेल.

सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी पालिकेची निविदा टेंडर भरावीत

सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी पालिकेची निविदा टेंडर भरावीत

सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांचे आवाहन : निकृष्ठ कामांचा दर्जा सुधारण्यासाठी व तरुणांना रोजगार मिळण्यासाठी युक्ती

कराड/प्रतिनिधी :
           कराड नगरपालिकेचे निविदा टेंडर वेळोवेळी सोशल मीडियावर पोस्ट केली जातील. त्याचा शहरातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांनी व्यवसायिक दृष्टिकोनातून विचार करून ही कामे दर्जात्मक होण्यासाठी या निविदा भराव्यात. त्यासाठी कोणालाही घाबरण्याची गरज नसून निविदा भरताना अथवा विकासकामे करताना तांत्रिक अडचणी सोडून इतर कसलीही अडचण आल्यास दक्ष कराडकर’शी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व दक्ष कराडकर व्हॉस्टअप ग्रुपचे समूहचालक प्रमोद पाटील यांनी ग्रुपच्या माध्यमातून केले आहे.
           येथील नगरपालिकेच्या बहुतांशी कामांमध्ये दर्जाहीनता दिसून येते. याबाबत अनेकदा आरोप-प्रत्यारोप होऊनही त्यात सुधारणा होत नाही. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असून नागरिकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शहरातील अनेक विकासकामांचा दर्जा निकृष्ठ असून याबाबत पालिकेच्या सभाग्रहातही अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये अनेकांचे लागेबांधे असल्याने त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई न करता पालिका पदाधिकारी आणि शहरसेवकांकडून दिखाऊ व सोयीस्कर भूमीला घेतली जाते. त्यामुळे बडे मासे तळाला अन् छोटे मासे गळाला याप्रमाणे मोठ्या ठेकेदारांचा बचाव करून छोट्या ठेकेदारांचाच बळी दिल्याचेही अनेकदा दिसून आले आहे.
          ही परिस्थिती बदलण्यासाठी व शहरातील विकासकामे दर्जात्मक होण्यासाठी तरुणांनी पालिकेच्या निविदा भराव्यात. यामुळे शहरातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांना रोजगारही मिळेल, हीही एक उद्देश यामागे असल्याची माहिती  सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी दैनिक प्रीतिसंगमशी बोलताना दिली. तसेच निविदा भरणाऱ्या तरुणांना कोणत्याही अडचणी आल्यास दक्ष कराडकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असेही आश्वासनही पाटील यांनी दिले आहे.  


शहरातील अनेक कामांचा दर्जा निकृष्ठ आहे. त्याला बहुतांशी ठेकेदार जबाबदार आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी बेरोजगार तरुणांनी पालिकेच्या निविदा भरून कामे करावीत. त्यामुळे निदान कामाचा दर्जा सुधारेल व तरुणांना कामही मिळेल. त्यासाठी तरुणांना दक्ष कराडकर'च्या माध्यमातून सहकार्य करू.

- प्रमोद पाटील (सामाजिक कार्यकर्ते, कराड)