कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाल यात्रा रद्द : जिल्हा प्रशासनाचा निर्णय

वऱ्हाडी,मानकरी व मिरवणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी : देवराज पाटील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाल यात्रा रद्द : जिल्हा प्रशासनाचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाल यात्रा रद्द : जिल्हा प्रशासनाचा निर्णय

वऱ्हाडी,मानकरी व मिरवणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी : देवराज पाटील

उंब्रज /प्रतिनिधी

   लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल ता.कराड येथील श्री.खंडोबा देवाची २५ जानेवारी रोजी होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेश व निर्देशानुसार श्री.खंडोबा देवाच्या यात्रेतील धार्मिक विधी, पूजा अर्चा, रूढी, परंपरेनुसार  स्थानिक पातळीवर करण्यात येईल अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.दरम्यान खंडोबा म्हाळसा यांच्या लग्न  सोहळ्यासाठी येणारी वर्‍हाडी मंडळी व मानकरी तसेच लग्नसोहळ्यासाठी निघणारी मिरवणूक यांना जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी यावेळी केली 

     २५ जानेवारी रोजी पाल ता.कराड येथील श्री.खंडोबा देवाची यात्रा संपन्न होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी राज्यातील बहुतांशी यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने पाल येथे यात्रा पूर्व नियोजन बैठक घेऊन सदर चा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील होते तर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, अप्पर तहसीलदार जनार्दन कासार, आपत्ती व्यवस्थापनाचे तामाने, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती

         कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असून जिल्हाधिकारी यांच्या आदेश व निर्देशानुसार यावर्षी पाल यात्रा रद्द करण्यात येत आहे मात्र यात्रेतील पारंपरिक रूढी व परंपरा विधिवत होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपाधीक्षक रणजित पाटील यांनी यावेळी सांगितले तसेच यात्रा उत्सव कमीत कमी भाविकांच्या उपस्थितीत साजरी करावी. यात्रा कमिटी, मानकरी यांनी भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कोणताही अट्टाहास करू नये अशी विनंती यावेळी डॉ रणजित पाटील यांनी केली.

      तर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर पाल यात्रेबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे मात्र खंडोबा देवाच्या लग्न सोहळ्यासाठी येणारी वर्‍हाडी व मानकरी मंडळी व ट्रॅक्‍टरच्या साह्याने लग्न सोहळ्यासाठी निघणारी मिरवणूक ही काही मोजक्या मानकरी यांच्या उपस्थितीत काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी मानकरी, ग्रामस्थ, यात्रा कमिटी यांच्यावतीने देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी यावेळी केली. तथापि या निर्णयावर जिल्हाधिकारी यापुढील आढावा बैठकीत निर्णय देतील अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी यावेळी दिली तर पोलिस उपअधीक्षक डॉ.रणजीत पाटील यांनी श्री खंडोबा देवाचे भाविकांना ऑनलाईन दर्शन व्हावे यादृष्टीने इंदोली फाटा, काशिळ  येथे यात्रा कमिटी यांनी मोठी स्क्रिन बसवून ऑनलाईन दर्शनाची सोय करावी अशी सूचना केली. तसेच यात्रेसाठी दरवर्षी येणारे व्यावसायिक, दुकानदार हे यावर्षी येणार नाहीत यादृष्टीने यात्रा कमिटी यांनी दक्षता घ्यावी  अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

       तसेच यात्रे पूर्वी व यात्रेनंतर  जिल्हा व पर जिल्ह्यातून पाल येथे भाविक येऊ नये यासाठी सुमारे आठ ते दहा किलोमीटर च्या सर्कल मधील परिसरात सील करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले यावेळी विविध विभागाच्या वतीने यात्रेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत माहिती संबंधित विभागाने दिली बैठकीस देवस्थानचे संचालक संजयकाका काळभोर, बाबासाहेब शेळके, मंगेश कुंभार, संजय गोरे, सचिन लवंदे,   यात्रा कमिटीचे पदाधिकारी यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीचे प्रास्ताविक प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी केले तर आभार सह्याद्री चे संचालक सर्जेराव खंडाईत यांनी मानले
     

 

लग्न सोहळ्यासाठी मानकरी व वऱ्हाडी मंडळींना प्रवेश मिळावा

श्री.खंडोबा देवाचा विवाह सोहळा हा यात्रेचा प्रमुख सोहळा आहे.यावेळी खंडोबा देवाच्या मूर्ती या पूर्वी हत्तीवरून लग्न सोहळ्याच्या ठिकाणी आणण्याची प्रथा होती.परंतु कालांतराने या मूर्ती रथातून आणण्याची प्रथा सुरू झाली.यामुळे लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळी,प्रमुख मानकरी तसेच मानाचे गाडे यांची उपस्थिती महत्वाची असून प्रातिनिधिक स्वरूपात किमान  प्रत्येकी पाच लोकांना तरी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली पाहिजे.

देवराजदादा पाटील
प्रमुख मानकरी,पाल

१०किलोमीटरचा परिसर सील करणार

पाल यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला असून यात्रा कमिटी व प्रमुख मानकरी यांची जिल्हाधिकारी यांचे सोबत लवकरच एक बैठक होणार असून यावेळी वऱ्हाडी मंडळी,मानाचा गाडा,प्रमुख मानकरी तसेच रथातून लग्न सोहळ्यासाठी श्री खंडोबा देवाची होणारे प्रस्थान याबाबतचा निर्णय होणार आहे.यात्रा काळात मंदिराच्या पासून १० किलोमीटर वर्तुळातील परिसर सील करण्यात येणार आहे.सालाबादप्रमाणे येणारी दुकाने,खेळणी तसेच इतर मनोरंजन कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.याची काटेकोर अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

उत्तम दिघे
प्रांताधिकारी, कराड

 

ऑनलाईन दर्शनासाठी प्रयत्न करा

पाल यात्रा कालावधीसाठी शासनाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तींची काटेकोर अंमलबजावणी पोलीस प्रशासनाच्या वतीने होणार आहे.ऑनलाइन दर्शनासाठी तसेच काशीळ व अतीत येथे तात्पुरत्या स्वरूपात मोठ्या स्क्रिन लावून भाविकांना दर्शनासाठी सोय उपलब्ध करण्यासाठी यात्रा कमिटीने प्रयत्न करावेत जेणेकरून भाविकांची गैरसोय होणार नाही व श्री खंडोबा देवाचे दर्शन मिळेल

डॉ.रणजित पाटील
उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड