उमेदवारी मागे घेण्यासाठी नेत्यांकडून इच्छुकांची मनधरणी

आज सोमवारी 4 जानेवारी रोजी दुपारी  3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. यामध्ये अर्ज बाकी राहिलेल्यांची उमेदवारी निश्चित होणार असून याच दिवशी त्यांना चिन्ह वाटपही केले जाणार आहे. त्यामुळे अर्ज माघारी घेण्यासाठी स्थानिक नेत्यांना अनेकांची मनधरणी करावी लागत आहे.  

उमेदवारी मागे घेण्यासाठी नेत्यांकडून इच्छुकांची मनधरणी

उमेदवारी मागे घेण्यासाठी नेत्यांकडून इच्छुकांची मनधरणी 

कोरोनाचा निवडणुकीवरही प्रभाव : स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीला अंतिम रूप, अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र होणार स्पष्ट

राजेंद्र मोहिते/कराड :
         तालुक्यातील 104  ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होत आहे. यासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर गुरुवारी 31 डिसेंबर रोजी झालेल्या अर्ज छाननीत 30 अर्ज अवैध ठरविण्यात आले. आज सोमवारी 4 जानेवारी रोजी दुपारी  3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. यामध्ये अर्ज बाकी राहिलेल्यांची उमेदवारी निश्चित होणार असून याच दिवशी त्यांना चिन्ह वाटपही केले जाणार आहे. त्यामुळे अर्ज माघारी घेण्यासाठी स्थानिक नेत्यांना अनेकांची मनधरणी करावी लागत आहे.  
          ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2021 मध्ये तालुक्यातील 104  ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामध्ये उंब्रज, सैदापूर, पार्ले, कोपर्डे हवेली,  इंदोली, जिंती, कार्वे,काले, मुंढे, रिसवड, शेणोली, उंडाळे, वडगाव (उंब्रज), वाठार, विंग, बेलवडे बुद्रुक, बेलवडे हवेली,  कोळे, ओंड, पाडळी (केसे), पाल, पेरले,  शिरवडे, टाळगाव, वारुंजी, येरवळे,चचेगाव,कालवडे, केसे, खोडशी, खुबी, कोडोली,  म्हासोली, नांदगाव, साळशिरंबे, शहापूर,  येणके, जखिणवाडी, शिरगाव,तांबवे या मोठ्या गावांचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी आपला गट शाबूत राखण्यासाठी तालुक्यातील कराड दक्षिणसह कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
         कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे कट्टर विरोधक माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या गटात मनोमिलन झाले आहे. त्यामुळे दक्षिणेतील राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ झाल्याने येथील बहुतांशी राजकीय गणितेही बदलली आहेत. यामुळे भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्या गटासमोर काका-बाबा गटाचा एकत्रित सामना रंगण्याची चिन्हे आहेत. तर काहीठिकाणी मात्र, काका-बाबा गटामध्येही फुटाफुट झाली असून त्यातील काहींनी भोसले गटाशी संधान बांधल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे सोमवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत असल्याने या दिवशी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने बहुतांशी लढती स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे काही इच्छुकांनी वेळीच आपले उमेदवारी माघारी घ्यावेत, यासाठी त्यांची मनधरणी करताना स्थानिक नेत्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहेत.
          तर दुसरीकडे कराड उत्तरमध्येही काहीशी हीच परिस्थिती असून याठिकाणी सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या गटाविरोधात भाजपचे मनोज घोरपडे व शिवसेनेचे धैर्यशील कदम यांच्या गटाचे आव्हान असणार आहे. त्यामुळे सोमवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर उत्तरेतील ठिकठिकाणच्या लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे येथेही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घ्यावेत, यासाठी त्यांची मनधरणी करताना स्थानिक नेत्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे.
         दरम्यान, ग्रामपंचायत स्तरावरही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना होणार असल्याने कराड दक्षिण व कराड उत्तरमध्ये अशाच लढती होणार, की महाविकास आघाडी व भाजपमध्येही फुटाफुट होऊन ते सत्तेसाठी एकमेकांशी हातमिळवणी करणार, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. परंतु, या निवडणुकीत जर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा लढती झाल्या. तर मात्र मतांच्या एकीकरणामुळे ग्रामपंचायतीला नक्कीच महाविकास आघाडीचे पारडे जड असणार आहे. परंतु, दोन्हीकडे फुटाफुट झाली. अथवा, महाविकास आघाडी व भाजपमध्येही अंतर्गत कुरघोड्यांचे राजकारण उफाळून आले. तर मात्र  ग्रामपंचायत निवडणुकीत खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या स्थानिक गटांची भूमिका निर्णायक राहणार आहे. तर भाजपमध्येही काहीशी अशीच परिस्थिती असून कराड दक्षिणसह उत्तरेतही स्थानिक कुरघोड्यांचा फटका भाजपलाही बसू शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

*बिनविरोधसाठी स्थानिक नेत्यांकडून गळ*

सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक यात्रा, उत्सव, सण, समारंभ रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, गाव पातळीवर आपली प्रतिष्ठा कायम राहावी, म्हणून  उमेदवारांकडून विजय मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नितीनचा अवलंब होत असल्याचे दिसून येते. त्यासाठी उमेदवारांकडून हातही सैल केले जातात. मात्र, या पंचवार्षिक निवडणुकीत आर्थिक चणचण भासत असल्याने आपापली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून इच्छुकांना गळ घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आता याला किती यश येते, हे सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.

 

*मोठ्या ग्रामपंचायतींसाठी प्रतिष्ठा पणाला*

 तालुक्यात कराड दक्षिणसह कराड उत्तरमध्ये अनेक मोठ्या ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उंब्रज, पार्ले, इंदोली, जिंती, कार्वे, काले, शेणोली, उंडाळे,वाठार, विंग, बेलवडे बुद्रुक,  कोळे, ओंड, पाल, पेरले, वारुंजी, येरवळे,  चचेगाव, कालवडे, खुबी, कोडोली, म्हासोली, नांदगाव, साळशिरंबे, येणके, जखिणवाडी, तांबवे आदी. गावांचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी आपली सत्ता कायम राखण्यासाठी तर काही ठिकाणी सत्तांतर करून आपला वरचष्मा निर्माण करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी मोर्चेंबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी स्थानिक नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येत आहे.