विद्यानगर येथे धूमस्टाईलने शिक्षिकेच्या गळ्यातील दागिने लंपास

विद्यानगर येथे   धूमस्टाईलने   शिक्षिकेच्या गळ्यातील  दागिने लंपास

कराड / प्रतिनिधी
विद्यानगर येथील कॉलनी मध्ये धूम स्टाईल चोरांनी शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन धूम ठोकली. ही घटना आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. सौ.आशाराणी तानाजी पाटील (रा. ओम कॉलनी ,विद्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की ,सौ.आशाराणी पाटील या ओम कॉलनी येथे राहावयास असून, त्या जिल्हा परिषद शाळा सैदापूर येथे शिक्षिका म्हणून काम करतात. त्या रोज सकाळी दहाला शाळेत जातात, व सायंकाळी पाचच्या सुमारास  घरी जातात. आज नेहमीप्रमाणे त्या शाळेत गेल्या होत्या. शाळा सुटल्यानंतर त्या रिक्षाने फार्मसी कॉलेज पर्यंत आल्या. तेथून त्यांचे घर जवळ असल्याने  त्या  घराकडे  पायी चालत निघाल्या. यावेळी समोरून दुचाकीवरून काळे कोट घातलेले व  तोंडाला रुमाल बांधलेले दोन जन आले. त्यांनी सौ. पाटील यांच्या गळ्यात असलेले गंठण व मिनी गंठण हिसकावण्याचा प्रयत्न केला.मात्र सौ. पाटील यांनी  गळ्यातील दागिने घट्ट आवळून धरले ,त्यामुळे गंठण तुटून त्यातील 75 हजार रुपये किमतीचे तुटलेले गंठण चोरट्यांनी हिसकावून धूम ठोकली. याप्रकरणी आशाराणी पाटील यांनी कराड शहर पोलिसात अज्ञात चोरट्याचा विरोधात फिर्याद दिली आहे.