मी उंब्रजचा भराव पूल....माझं काहीतरी करा...!

मी उंब्रजचा,उंब्रजकर माझे ,आता नाहीतर कधीच नाही

मी उंब्रजचा भराव पूल....माझं काहीतरी करा...!

तत्कालीन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि जिल्ह्यासह स्थानिक प्रशासनाचे  अत्यंत दुःखी मनाने मी आभार मानतो की २००२ साली माझी निर्मिती होत असताना माझ्या मूळ रचनेत अनेक बदल केले,मला जनतेच्या सेवेसाठी अनेक तडजोडी करत शेकडो प्रवाशांसह उंब्रजकारांची सेवा करण्याचे भाग्य अर्पण केले. मला भराव पूल होण्यापेक्षा उड्डाण पूल (पारदर्शक) होण्यात जास्त आनंद आला असता, परंतु 'नाईलाज को क्या इलाज' अशी परिस्थिती माझी झाली होती आणि आहे.हतबल होऊन उभे राहण्यापेक्षा मी वेगळं काही करू शकत नव्हतो आणि माझ्या इच्छा आकांक्षेला काहीही महत्त्व नव्हते यामुळे माझे मनोगत मी आपणापुढे व्यक्त करीत आहे.

 

मुळात माझी रचनाच एखाद्या कुपोषित बालकासारखी झाली आहे.तारळी नदीपात्रापासून सुरू होणारी माझी सुरुवात वरदराज मंगल कार्यालयाच्या समोर संपणार होती. पण कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी पहिला वार माझ्या लांबीवर करण्यात आला.याचाच अर्थ सर्वच बाजूने माझी काटछाट सुरू झाली,मग अंतर्गत वाहतुकीसाठी असणारे बोगदे लांबी आणि रुंदीने कमी करण्यात आले.याचा परिणाम अवजड वाहने अडकणे,वाहतुकीची कोंडीवर झाला माझ्या पुलाखाली असणारे बोगदे सुद्धा जागा बदलून मागे पुढे सरकवून बनवण्यात आले.तर काही बोगद्यांचे आकारमानच बदलले,तारळी पुलापुढील उंब्रज बाजूचा बोगदा तर निव्वल शोभेची बाहुली होऊन प्रातर्विधीचा अड्डडा झाला आहे.माझ्या अस्ताव्यस्त अंगावर अनमोल जीव जात होते.मात्र बोगदा घाणीने डबडबला होता माणसे,जनावरे मात्र जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करीत आहेत.

 

माझी वाटसरूना एकच विनंती आहे,महामार्ग ओलांडून कसरत करू नका. भरधाव वेगात वाहन चालवू नका.जिवन अनमोल आहे,पुनर्जन्म कोणीही पहिला नाही तसेच उंब्रजकराना माझे आग्रहाचे सांगणे आहे,आता नाही तर कधीच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. सहपदरीकरण करताना जर माझा विस्तार झाला तरच काहीतरी होईल अन्यथा ‘ये रे मागल्या’ ही परिस्थिती अशीच सुरू राहणार आहे. आणि ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ मी सहन करीत राहणार कारण मी तर निर्जीव आहे.यामुळे व्यक्त व्हायला मर्यादा आहेत परंतु तुम्ही तर.........उंब्रजच्या विकासासाठी आवाज उठवू शकता ना .!!

 

 

पोलीस ठाण्याच्या जवळील बोगदा तर पावसाळ्यात तलावाच बनून जातो परंतु माझी देखभाल दुरुस्ती करणारी पथके ही मला मलमपट्टी करण्यातच धन्यता मानत आहेत पण कोणीही माझ्यावर कायमस्वरूपी उपचार केले नाहीत चोरे फाट्यावरील बोगदा तर विस्तीर्ण असा होता असे मी ऐकून आहे याची रचनाच मुळात बस येण्याजाण्या सारखी होती पण कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक आणि बट्ट्याबोळ झाला यामुळे अनेक पादचाऱ्यांना पुलावर जीव सोडताना मी पाहिलेलं आहे यामध्ये तरुण होते तसेच वयस्कर ही होते काही वेळेला तर कोणाला कोणी उडवले याचा थांगपत्ता ही पोलिसांना लागला नाही तर कोणाच्या अंगावरून वाहन गेल्याने ओळख सुद्धा पुसली गेली होती खरे तर वाटसरुणा चांगली सेवा देणे हे माझे प्रथम कर्तव्य पण काय करणार लालची व मतलबी निर्माण कर्त्यांनी माझी वाट लावली त्याबरोबरच उंब्रजकर जनतेची ससेहोलपट झाली मी क्षमा मागू शकत नाही कारण मी परावलंबी आहे पण आपण ग्रामस्थ सुज्ञान आणि सुजाण आहात मी बोलू शकत नाही पण तुम्ही बोलू शकता आता तरी एल्गार करा आणि माझे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढे या !!!

 

माझी निर्मिती करण्यासाठी महामार्गालगतची शेकडो दुकाने बळाचा वापर करून हटवण्यात आली होती परंतु बाबांनो त्यावेळेस तुम्ही जरा चौकस राहिला असता तर नंतरची तोडफोड वाचली असती कारण लांबलचक उड्डाणपूल आणि पुलाखालील मोकळी जागा पार्कींगसह छोट्या व्यापारी यांना मुबलक प्रमाणात वापरता आली असती तसेच सेवा रस्ते वाढले असते तर जे काही तुटायचे ते एकदाच तुटले असते पण आता दर चार पाच वर्षांनी तोडफोड म्हणजे व्यवसाय बांधवांनी नक्की करायचे काय याचा प्रश्न समोर उभा ठाकत आहे.दगड मागे आहे पण माझं काही गेलं नाही असे म्हणत हसणारे बरेच जण आहेत पण आज तुम्ही सुपात आहात उद्या जात्यात जाणार आहात याबद्दल विचार करा जमिनिवरील मालकी ही तीन फुटा पर्यतच आहे त्याच्या खाली शासनाचा अधिकार असतो त्यामुळे माझं माझं म्हणत आभासी दुनियेत जगण्यापेक्षा वास्तव स्वीकारून त्याच्याशी दोन हात केले पाहिजेत आज पुलावरून उंब्रज स्थानकात बस घेताना चालक दहावेळा विचार करत असतात कारण वाहतूक कोंडी आणि चिंचोळा सेवा रस्ता यामुळे प्रवाशी महामार्गावरच उभे राहतात अथवा ओलांडतात यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊन गंभीर घटनेचा मी साक्षीदार आहे अनेक बोगद्याखाली वाहने अडकल्याची मी पाहिले आहे आसपासचे नाले प्लॅस्टिक बंदीच्या काळातसुद्धा तुंबलेले दिसत आहेत व्यापारी कचरा नाल्यातच टाकत आहेत