उंब्रजला उड्डाणपूलासाठी ग्रामस्थ आक्रमक हालचाली गतिमान

केंद्रीय दळणवळणमंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा करुन उड्डाणपूल होण्याच्या दृष्टीने हालचाली करण्यात येणार आहेत. सहापदरीकरणाच्या विस्तारीकरणात उड्डाणपूलासाठी उंब्रजकर तीव्र लढा उभारण्याच्या तयारीत आहेत.

उंब्रजला उड्डाणपूलासाठी ग्रामस्थ आक्रमक हालचाली गतिमान
संग्रहित छायाचित्र

उंब्रजला उड्डाणपूल व्हावा यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.केंद्र व राज्यसरकारकडे यासंदर्भात कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार आहे.खा. श्रीनिवास पाटील यांची भेट घेवून ग्रामस्थ उड्डाणपूलासाठी मागणी करणार आहेत. तसेच केंद्रीय दळणवळणमंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे यासंदर्भात पाठपुरावा करुन उड्डाणपूल होण्याच्या दृष्टीने हालचाली करण्यात येणार आहेत. सहापदरीकरणाच्या विस्तारीकरणात उड्डाणपूलासाठी उंब्रजकर तीव्र लढा उभारण्याच्या तयारीत आहेत.

 

     उंब्रजचा विस्तार झपाट्याने होत असून येथील वाहतूकीची मोठी  गैरसोय सद्यस्थितीत सुरू आहे.  उद्धवस्त झालेली बाजारपेठ पुर्वपदावर येण्याबरोबरच सेवा रस्त्यावरील वाहतूकीची गैरसोय व वाढत्या अपघातांना आळा बसण्यासाठी उंब्रजला उड्डाणपूल व्हावा ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून  उंब्रजसह पंचक्रोशीतील नागरिक करीत आहेत. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणावेळी झालेल्या भरावपुलामुळे उंब्रज आणि परिसरात उद्धवस्त झाला.त्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन विभाग तयार झाले आहेत. त्यामुळे उड्डाणपूल व्हावा यासाठी मागील १६ वर्षापासून ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मागणी करीत आहेत. यापुर्वी  ग्रामपंचायतीने यासंदर्भात केंद्रीय वाहतूक मंत्री  नितीन गडकरी, खा. श्रीनिवास पाटील, सडक परिवहन राज्य मार्ग भारत सरकार, राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. सन २०१७ ला उंब्रज ग्रामपंचायतीने सडक परिवहन राज्यमार्ग भारत सरकार यांच्याकडे पत्रव्यवहार करुन  सन २००३ ला चौपदरीकरण कामात झालेल्या त्रुटींमुळे बाजारपेठेचे पर्यायाने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे उंब्रजला उड्डाणपूल व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या सदर पत्राची दखल घेत सडक परिवहन राज्यमार्ग विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्री सुधीर देऊळगांवकर यांनी प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांना पत्राव्दारे कळविले होते की उंब्रज ग्रामपंचायतीच्या उड्डाणपुल मागणीचा विचार होवून नागरीकांची गैरसोय दुर करण्यासाठी योग्य तो अभ्यास करुन कार्यवाही करावी असे कळविले होते. त्यानंतर पुर्न सर्वेही करण्यात आला पंरतु आज अखेल उड्डाणपूल होवू शकलेला नाही. त्यामुळे उंब्रज ग्रामस्थ या पुढील काळात तीव्र आक्रमक होणार आहेत. यासाठी गावकरी एकत्र येवून उड्डाणपूल कृती समितीची स्थापना करणार  आहेत.

 

मध्यवर्ती ठिकाण

 

राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे गाव म्हणून उंब्रजचा उल्लेख होतो.तसेच परिसरातील सुमारे १५० गावांचा नित्याचा व्यापार उंब्रज बाजारपेठेवर अवलंबून असल्याने वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते,अपुरे सेवा रस्ते यामुळे विविध शिक्षण संस्थेतील चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून दररोज प्रवास करावा लागतो यामुळे प्रशस्त उड्डाणपूल आणि मोकळा श्वास घेणारे सेवा रस्ते काळाची गरज बनले आहेत.

 

    दरम्यान यापुर्वी ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या मागणी संदर्भात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही पत्राव्दारे उंब्रज ता. कराड हे कराड तालुक्यातील सर्वात मोठे गाव असुन सध्या गावची लोकसंख्या ही सुमारे ३० ते ३५ हजाराच्या दरम्यान आहे. शिवाय उंब्रज हे अंदाजे ४५ ते ५० गावांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही होत असते.  मुख्यत: उंब्रज हे पाटण तालुक्याचे प्रवेशद्वारही आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील लोक  उंब्रजमध्ये नोकरी व व्यवसायानिमीत्त स्थायिक आहेत. शिवाय उंब्रज येथून संपूर्ण महाराष्ट्रात वीट- वाळू सप्लायर केली जाते. गणेशमुर्तीच्या व्यवसायासाठी गाव सुप्रसिध्द आहे. तसेच बाजारपेठ असल्याने येथे राहणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. उंब्रज गावचे मध्यवर्ती भागातून पुणे-बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे त्यामुळे येथे नोकरदार,कामगार, शिक्षणासाठी राहणारे विद्यार्थी, शिक्षक, यांची संख्या मोठी आहे. परंतू सन २००३ साली केंद्रशासनाचे धोरणानुसार रस्ता चौपदरीकरणाचे कामावेळी हायवेच्या दोन्ही बाजूस असणारी बाजारपेठ पुर्णपणे उध्दस्त होऊन उंब्रजमध्ये भरावपुलाचे बांधकाम करण्यात आले.यावेळी उंब्रज गावचे व उंब्रजच्या बाजारपेठेचे दोन तुकडे होऊन कधीही भरुन न येणारे आर्थिक नुकसान झाले आहे. परिणामी उंब्रजच्या आर्थिक विकासाला खीळ बसली आहे.तसेच भरावपुलाचे बांधकामावेळी  सेवारस्त्याच्या वाहतूकीच्या सोयीसाठी केलेले भूयारीमार्ग हे कमी उंचीचे व कमी रुंदीचे असल्याने मोठी वाहने ये-जा करताना गैरसोयीचे होत असून भूयारी मार्गालगत काढलेल्या नाल्याचे बांधकामही नियोजनबध्द नसल्याने पावसाळ्यात नाल्यातील पाणी भूयारीमार्गात साचून त्यास तळ्याचे स्वरुप प्राप्त होते. सेवारस्त्यालगतचे नाले  बांधकामापासून ठिकठिकाणी ब्लॉक झालेले आहेत. परिणामी पाणी गटारातून न वाहता बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर वाहत असते. याचा स्थानिकांना त्रास होत आहे.याबाबींचा आपण सखोलपणे विचार करुन सातारा बासपास हायवेला ज्या धर्तीवर उड्डाणपुल झाला आहे, अशा पध्दतीचे उड्डाणपुलाचे बांधकाम उंब्रज याठिकाणी झाला तर उंब्रजची बाजारपेठ पुर्ववत बसण्यास मदत होईल.तसेच स्थानिक

नागरिकांची गैरसोय थांबेल यासाठी उड्डाणपुल व्हावा अशी मागणी मंत्री गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून उड्डाणपूल मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. ग्रामस्थ उड्डाणपूल कृती समितीच्या माध्यमातून पुन्हा खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेवून केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करणार आहे.