खालकरवाडीत वायरमनच्या हलगर्जीपणामुळेच युवकाचा मृत्यू; उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

...वायरमन म्हणतोय लक्षात राहिले नाही

खालकरवाडीत वायरमनच्या हलगर्जीपणामुळेच युवकाचा मृत्यू; उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खालकरवाडी ता. कराड येथे विहिरीवर वीज कनेक्शन घेण्यासाठी  पोल उभे करुन तारा ओढत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला व शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वायरमनवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी सचिन जगदीश महापूरे राहणार वहागाव ता.कराड यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

 

   वायरमन निखील यशवंत शिंदे रा. चरेगाव ता कराड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालकरवाडी २९ जुलै रोजी शाॅक लागून झालेल्या घटनेत  ऋषीकेश प्रकाश कांबळे वय २७ राहणार केसे पाडळी ता.कराड या युवकाचा शाॅक लागून मृत्यू झाला.  तर या घटनेत तिघेजण जखमी झाले होते. घटनेनंतर महावितरणचे अधिकारी व पोलीसांनी  पंचनामा करून तपास सुरू केला. मात्र घटना नेमकी कोणाच्या चुकीमुळे घडली याबाबत चित्र स्पष्ट नव्हते. पंरतु प्रत्यक्षदर्शी या घटनेतील तारा ओढण्याचे काम घेणारे वहागाव येथील सचिन महापूरे यांनी वायरमन विरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

  खालकरवाडी घटनेत ऋषीकेश कांबळे याच्या मृत्यूसह संजय रामचंद्र वीर वय 51,  अमित महादेव कारंडे वय 30  दोन्ही राहणार केसे पाडळी ता. कराड,  तन्मय रविंद्र अडकड वय २४  राहणार आडुळ ता. पाटण हे गंभीर जखमी झाले होते. 

 

    याबाबत पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादी नुसार,  खालकरवाडी ता कराड गावचे हद्दीतील इलेक्ट्रीक पोलचे तारा ओढण्याचे काम अक्षय आप्पासो चव्हाण रा. रायगाव ता. कडेगाव जि. सांगली याच्या मार्फत फिर्यादी सचिन महापूरे यांनी घेतले होते.  दि 29/07/2023 रोजी सकाळी 11.30 वा चे सुमारास खालकरवाडी  गावाचे हद्दीत डोंगराशेजारी इलेक्ट्रीक पोलवरील तारा ओढण्यासाठी ते कामगारांना समवेत गेले होते. सचिन महापूरे यांच्यासोबत कामगार  रोहीत धनाजी मुडेवाल रा. वहागाव ता. कराड, संजय रामचंद्र वीर, अमित महादेव कारंडे, ऋषीकेश प्रकाश कांबळे सर्व रा. केसे पाडळी ता. कराड, तन्मय रविंद्र अडकड रा आडुळ ता. पाटण, अक्षय आप्पासो चव्हाण रा. रायगाव ता. कडेगाव जि. सांगली असे तेथे गेले. तेथे काम सुरु करताना तेथील एम एस ई बी चे वायरमन निखील यशवंत शिंदे रा चरेगाव यांना डी.पी मधुन पोल कडे येणारा सप्लाय बंद करण्यास सांगितला. तसेच काम झाल्यावर तुम्हाला आम्ही डी पी चालु करायला सांगतो तेव्हा तुम्ही डी पी चालु करा असे सांगितले. तसेच  क्रॉन्ट्रक्टर अक्षय चव्हाण यांनी त्याचे फोनवरुन याबाबत सांगितले होते. त्यानंतर वायरमन निखील यशवंत शिंदे यांनी आम्ही काम करित असले पोल कडील इलेक्ट्रीक सप्लाय बंद केला होता.

त्यानंतर आम्ही आमचे इलेक्ट्रीक पोल वरचे तारा ओढण्याचे काम चालु केले. सायंकाळी 6.00 वा चे सु इलेक्ट्रीक पोलवरील तारा ओढण्याचे काम सुरु असताना अचानक लाईन मधील इलेक्ट्रीक सप्लाय चालु झाल्याने त्याचा शाँक फिर्यादी व इतर कामागारांना बसला. यामध्ये ऋषीकेश प्रकाश कांबळे रा केसे पाडळी ता कराड, हा शाँक लागलेने बेशुध्द पडला तेव्हा क्रॉन्ट्रॅक्टर अक्षय चव्हाण यांनी वायरमन निखील शिंदे यास फोन करुन विचारले की तुम्ही काम चालु असताना सप्लाय का चालु केला. तेव्हा त्याने सांगितलेले मला लक्षात राहिले नाही. म्हणुन मी सप्लाय चालु केला. त्यानंतर  संजय रामचंद्र वीर, अमित महादेव कारंडे, ऋषीकेश प्रकाश कांबळे सर्व रा केसे पाडळी ता कराड, तन्मय रविंद्र अडकड रा आडुळ ता पाटण यांना फिर्यादी यांच्या गाडीतुन कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ऋषीकेश प्रकाश कांबळे हा मयत झाल्याचे सांगितले. 

  दरम्यान पोलवरील तारा ओढण्याचे काम करीत असताना एम एस ई बी चे वायरमन निखील यशवंत शिंदे रा. चरेगाव ता कराड यांनी हयगयीचे व निष्काळजीपणाचे व बेदकारपणाचे कृत्य करुन त्यांनी सदर इलेक्ट्रीक पोल वरील अचानक लाईन मधील इलेक्ट्रीक सप्लाय चालु करुन  कामगारांना शॉक बसुन जखमी करुन व ऋषीकेश कांबळे यास शॉक बसल्याने त्याचे मृत्युस कारणीभुत झाल्याने निखील यशवंत शिंदे रा चरेगाव ता कराड  याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.