तारळी पुलावरुन मिनीबस कोसळली; ५ ठार, ८ गंभीर जखमी

तारळी पुलावरुन मिनीबस कोसळली; ५ ठार, ८ गंभीर जखमी
तारळी पुलावरुन मिनीबस कोसळली; ५ ठार, ८ गंभीर जखमी

तारळी पुलावरुन मिनीबस कोसळली; ५ ठार, ८ गंभीर जखमी

प्रतिनिधी/उंब्रज

पुणे बंगळूर आशियाई महामार्गावर उंब्रज ता.कराड येथील तारळी नदीच्या  पुलावर मुंबईवरुन गोव्याकडे जाणाऱ्या मिनीबस ट्रव्हल्सला भीषण अपघात झाला. चालकाचे नियत्रंण सुटल्याने मिनीबस पुलाच्या कठड्याला धडकून सुमारे ४० ते ५० फुट खोल खाली कोसळली. या अपघातात ५ जन ठार झाले असून ८ जन गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये  ३ वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे.दिवाळी सुट्टीनिमित्ताने गोव्याला फिरायला जाताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

या अपघातात उषा मधुसूदन नायर वय ४०, मधुसूदन गोविंद नायर वय ४२, आदित्य मधुसूदन नायर वय ३०, साजन एस नायर वय ३५, आरव साजन नायर वय  ३  वर्षे सर्वजण राहणार बी २ वाशी नवी मुंबई. मुळ राहणार मल्लपुरम, केरळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच लीला मोहन वय ३५, मोहन वेलायदन वय ५९, सर्व राहणार वाशी नवी मुंबई, सिजिन शिवदासन वय २८, दीप्ती मोहन वय २८ दोन्ही राहणार कोपर खैरणे नवी मुंबई, अर्चना मधुसूदन नायर वय १५, दिपा नायर वय ३२ हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच बसचालक  रिंकू गुप्ता साहू वय ३० हा जखमी झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की उंब्रज येथील तारळी नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडली. मुळचे केरळ येथील एकमेकांचे नातलग असणारे दोन कुटुंबे नवी मुंबई वाशी येथे वास्तव्यास आहेत.  दिवाळी सुट्टीनिमित्ताने गोव्याला फिरायला जाण्यासाठी  शुक्रवारी रात्री मिनी ट्रव्हल्स बस क्रमांक एम एच ०१, सीआर ९५६५ भाड्याने घेवून रात्री ९ वाजता १३ जन गोव्याकडे निघाले होते. रात्री पहाटे ४.३० ते ५ वाजण्याच्या दरम्यान मिनीबस उंब्रज जवळ आली त्यावेळी सदरचा अपघात घडला. तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या कठड्याला मिनीबस आदळून काही करण्यापूर्वीच मधल्या पँसेजमधून सुमारे ४० ते ५० फुट खोल नदीपात्रालगतच्या झाडीत येवून कोसळली. साखरझोपेतच ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य ८ जन गंभीर जखमी झाले आहेत.  अपघात प्रकरणी चालक रिंकु विश्वनाथ साहू राहणार मध्यप्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताची फिर्याद सिजीन शिवदासन यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनास्थळी उंब्रज पोलिसांनी मदतकार्य केले.घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उप अधिक्षक रणजित पाटील यांनी भेट दिली तसेच दुपारी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी भेट देवून अपघाताची माहिती घेतली. घटनास्थळी उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड यांच्यासह पोलीस कर्मचारी, हायवे पोलीस, हायवे हेल्पलाईन, स्थानिक नागरिक यांनी मदतकार्य केले. १०८ रुग्णवाहिके वरील डाँक्टर ऋषीकेश कुलकर्णी तसेच उंब्रज पोलीस व रोटरीचे सदस्य,स्थानिक नागरिक यांनी घटनास्थळी धाव घेवून बसच्या काचा फोडून जखमी व मृतांना बाहेर काढले. घटनास्थळी लहान मुलाच्या आईचा आक्रोश ऱ्हद्य पिळवटून टाकणारा होता.


१३ ते १७ स्पेशल परमिट

गोवा येथे दीपावली सुट्टी निमित्त जाणाऱ्या नायर कुटूंबियांनी ठरवलेली टेम्पो ट्रॅव्हलर ही गाडी २१ सीटर असून गोव्याला जाण्यासाठी स्पेशल परमिट १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई सेंट्रल येथील आर टी ओ कार्यालयाची परवानगी मिळून सदर गाडी मालकाच्या ताब्यात मिळाले होते.यामध्ये मुंबई ते गोवा-साऊथ गोवा-नॉर्थ गोवा-गोवा दर्शन असा मार्ग निश्चित केला होता.सदरचा प्रवास करण्यासाठी १३ ते १७ स्पेशल परमिट तारखे दरम्यान घेतले होते 

यादीत १५ प्रवाशी

आरटीओ विभागाची परवानगी घेताना प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी सादर करावी लागते यामध्ये एकूण ड्रायव्हर वगळता १५ जणांची नांवे देण्यात आली होती.परंतु प्रत्यक्षात १२ जणांनी गोव्याला जायला सहभाग घेतल्याचे दिसत होते.यामुळे दैव बलवत्तर म्हणूनच राहिलेले तीन जण या गंभीर अपघातातून बचावले असल्याची चर्चा होती.

'१००' नंबरमुळे मदत मिळाली

या अपघातात गंभीर जखमी असणाऱ्या व्यक्तींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत १०० नंबर डायल केला व तात्काळ मदत मागवली यामुळे उंब्रज पोलिसांचे एक पथक घटनास्थळी हजर झाले व जखमींना मोलाची मदत झाली.

पुलाचा कट्टा कमकुवत

तारळी पुलावर ज्या ठिकाणी मिनीबस कट्ट्याला धडकली तो सिमेंटचा तुकडा बस बरोबरच नदीपात्राकडेला पडला होता यामध्ये फक्त सिमेंटचा लेप लावला होता जर लोखंडी स्टीलचा वापर केला गेला असता तर कदाचित मिनीबस धडकून रस्त्यावरच थांबली असती किंवा पलटी झाली असती.परंतु गंभीर अपघात वाचला असता अशी उपस्थित नागरिकांच्यात चर्चा होती.

धीरज पाटील ऑन दि स्पॉट हजर

ॲडिशनल एस पी धीरज पाटील हे घटनास्थळी तात्काळ हजर झाले होते आणि सर्व जखमींना बाहेर काढून दवाखान्यात पोहोच करेपर्यंत ठाण मांडून होते तसेच मदत कार्याबाबत सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करत होते दिवाळी पहाटे झालेल्या या घटनेचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होते.

उंब्रज पोलिसांची तत्परता

अपघाताची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.महामार्गावरील पुलावर अपघातग्रस्त वाहन नेमके कुठे आहे याचा ठावठिकाणा लागत नव्हता परंतु पुलाखालून हेल्प असा आवाज आल्यावर उंब्रज पोलिसांची कुमक व स्थानिक नागरिकांनी बचाव कार्याला सुरुवात केली आणि जखमींना रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी दाखल केले.

महामार्ग पोलीस पथक झोपेत

महामार्ग पोलीस पथकाचे कर्मचारी हे घटनास्थळी हजर होते परंतु त्याचे प्रमुख अधिकारी हे अपघातस्थळी उशिरा हजर झाले.गंभीर अपघात असेल अशा वेळी अधिकाऱ्यांनी तात्काळ हजर असणे गरजेचे आहे.कारण महामार्गाची सुरक्षितता सांभाळणे हे महामार्ग पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे.सुमारे तीन तास उशिरा महामार्ग पोलिसांची आलिशान गाडी येत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी चर्चा नागरिकांच्यात होती.

पोलीस 'दादा'गहिवरले

ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी भीषण अपघाताने खाकी सुद्धा गहीवरली होती याबाबत सपोनि अजय गोरड यांनी लहान मूल दगावल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात बोलता बोलता आलेले अश्रू या अपघाताची भीषणता सांगत होती.

मेरा बच्चा देखो

अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला हवालदार जगदने मदत करीत असताना ती महिला मला काही झालं नाही माझ्या लहान मुलाला पहा कुठाय तो अशी आर्त साद देताना खाकी वर्दी सुद्धा निःशब्द झाली होती.एक माऊली गंभीर जखमी असूनसुद्धा आपल्या मुलाच्या चिंतेने व्याकुळ झाली होती परंतु दुर्दैवाने ते लहान बाळ जागीच मयत झाले होते यामुळे तिला काय उत्तर द्यायचे हाच प्रश्न बचावकार्य करणाऱ्या पथकाला पडला होता.

मुंबई-गोवा कोकणा ऐवजी पश्चिम महाराष्ट्रातुन

मुंबई येथून गोव्याला जाणारे वाहन हे मुंबई गोवा मार्गाने कोकणातून जात असते परंतु कोकणात चाललेली महामार्गावरील कामे आणि रस्त्याची अवस्था यामुळे पश्चिम महाराष्ट्रातुन जाणाऱ्या आशियाई मार्गावरून जाण्याचे मिनीबस चालकाने ठरवले असण्याची शक्यता आहे.यामुळे सुसाट असणार महामार्ग पाच जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असून कदाचित कोकणातून गेले असते तर सुखरूप पोचले असते.