अंगावर आजार काढणे मृत्यूला आमंत्रण - आ. पृथ्वीराज चव्हाण

अंगावर आजार काढणे मृत्यूला आमंत्रण - आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड: कराड हॉस्पिटलला देण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटर मशीनचे लोकार्पण करताना आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : 
          कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोनावर कधी लस येईल, याबाबत संभ्रम आहे. बहुदा पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत लस उपलब्ध होईल. परंतु, ती अप्लावधीत जगात सर्वांपर्यंत पोहोचणे अवघड असून 2024 पर्यंत सर्वांना लस उपलब्ध होईल, असा जागतिक अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी तज्ञांच्या सल्ल्यानुसार मार्गक्रमण करणे आवश्यक असून हा आजार अंगावर काढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे मत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 
          येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी 15 रोजी सायंकाळी सरकारच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ करत कराड हॉस्पिटलला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर मशीनचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते यावेळी संपन्न झाले. 
          आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोरोना महामारी रोखण्यासाठी राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 11 सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरनुसार जनतेच्या सहभागातून ही मोहीम राबवण्यात येणार असून त्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरापर्यंत सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामध्ये घरभेट महत्त्वाचा कार्यक्रम असून यावेळी कुटुंबातील प्रत्यक्ष सदस्याची माहिती ॲपद्वारे घेतली जाणार आहे. सरकारच्या विविध उपक्रम, अभियानांना सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असून प्रत्येक कुटुंबाने आपापली जबाबदारी निभावल्यास या संकटावर मात करणे सोपे होईल, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

* सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम*