दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे आत्मबल वाढवावे - आ. पृथ्वीराज चव्हाण

दिव्यांग व्यक्तींना दुर्लक्षित न करता समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. तसेच त्यांचे आत्मबल वाढवावे.

दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे आत्मबल वाढवावे - आ. पृथ्वीराज चव्हाण

दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे आत्मबल वाढवावे

आ. पृथ्वीराज चव्हाण : कराडात दिव्यांग शिबिर उत्साहात : सुमारे 3 हजार दिव्यागांची साहित्यासाठी नोंदणी

कराड/प्रतिनिधी : 

            दिव्यांग व्यक्तींना दुर्लक्षित न करता समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. तसेच त्यांचे आत्मबल वाढवावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

      येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, सातारा यांच्या संयुक्त प्रयत्नातून जेष्ठ नागरिकांना व दिव्यांग बंधू-भगिनींना राष्ट्रीय वयोश्री RVY व ADIP योजनेतंर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांच्या मोफत साहित्य वाटपासाठी पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. श्रीनिवास पाटील होते.

     यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती संगीता चौगुले, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा परिषदेचे सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादीच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशअध्यक्ष सारंग पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, माजी सभापती फरीदा इनामदार, तहसीलदार विजय पवार, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, मर्ढेकर, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

     आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, समाजात दुर्लक्षित राहत असलेल्या दिव्यांग व्यक्तीचे सामाजिक समावेशन होण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवून यांना आत्मविश्वासपूर्वक समाजाच्या मुख्य प्रवाहात उभे करणे काळाची गरज आहे. समाजातील अनेक दिव्यांग व्यक्तींनी उच्च पदावर स्थान मिळवून स्वतःबरोबर समाजाच्या प्रगतीसाठी योगदान दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

     खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, दिव्यांग व्यक्ती पूर्वी अपंग संबोधले जात होते. अलीकडे त्यांना दिव्यांग हा शब्द वापरला जातो. याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी सामान्य सामर्थ्य आहे, असे म्हणजे दिव्यांग. यांच्या सुप्त गुणांना ओळखून त्याला चालना दिल्यास समाजउपयोगी कार्य उभे राहील, असे मत त्यांनी यावेई व्यक्त केले.

     दरम्यान, या शिबिरात पहिल्या कराड तालुक्यातील 3 हजार दिव्यांग नागरिकांनी तपासणी करून वेगवेगळ्या प्रकारच्या सहाय्यता मिळविण्यासाठी नोंदणी केली. कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व दिव्यांग व्यक्तींना संयोजकांच्या वतीने अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन भरत कदम यांनी केले. सहाय्यक गट विकास अधिकारी भोपाल कांबळे यांनी आभार मानले.