पुन्हा ‘चव्हाण’च !

पुन्हा ‘चव्हाण’च !


कराड / प्रतिनिधी 
          सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असून भाजप – शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले हे निवडणूक रिंगणात उतरण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार कोण असणार याबाबत संपूर्ण जिल्ह्याबरोबरच राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण हेच लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. तर त्याचबरोबर माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. गेल्या २० वर्षांपासून कराड व सातारा लोकसभा मतदारसंघापासून बाजूला असलेले पृथ्वीराज बाबा यांचे नाव चर्चेत आल्याने संपूर्ण राज्यात ते निवडणूक लढविणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. निवडणूक कोणीही लढवली तरी उदयनराजेनी केवळ तीन महिन्यांत लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ही पोटनिवडणूक लादली (लावली) आहे. कारण काहीही असो, पण त्यांनी केवळ तीन महिन्यात राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामागे त्यांचे राजकारण काय असेल, ते त्यानंच माहिती. मात्र हा जिल्हा आजपर्यंत कॉंग्रेस- राष्ट्रवादी विचारांनीच पुढे गेला आहे. याचा इतिहासही मोठा आहे.                                                                                             सातारा लोकसभा मतदारसंघात १९७१ पासून सलग तीनवेळा स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९८४,१९८९ आणि १९९१ असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी प्रतिनिधित्व केले. १९९६ ला शिवसेनेचे हिंदुराव नाईक- निंबाळकर खासदार झाले. १९९८ ला मात्र कॉंग्रेसचे  स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी हा मतदारसंघ काबीज केला. १९९९ ते २०१४ पर्यंत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आला. तेव्हापासून २०१९ अखेर उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीकडून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर १९७१ ला कराड लोकसभा मतदारसंघातून आनंदराव उर्फ दाजीसाहेब चव्हाण हे निवडून आले होते. त्यानंतर १९७७, १९८९ ला श्रीमती प्रेमलाताई चव्हाण यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९९१, १९९६, १९९८ अशा तीन निवडणुकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९७१ ते १९९८ पर्यंत या मतदारसंघावर चव्हाण घराण्याचेच वर्चस्व होते.                                                            १९९९ ला कॉंग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्मिती केली. त्यावेळी कराड मतदारसंघातील शिराळा व कराड दक्षिण वगळता सर्व आमदार हे त्यांच्या बरोबर गेले. १९९९ ला लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रित झाली. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले व या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. श्रीनिवास पाटील यांनी १९९९ आणि २००४ ची लोकसभा निवडणूक लढवली. पण २०१४ मध्ये मतदारसंघाची पुनर्ररचना करण्यात आली आणि १९७१ पासून २०१४ पर्यंत अस्तित्वात असणाऱ्या कराड लोकसभा मतदारसंघाचे नाव संपुष्टात आले व कराड हे सातारा लोकसभा मतदारसंघात गेले. खरे तर माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती कराड लोकसभा मतदारसंघाचे नाव पुसण्यास कारणीभूत ठरली. यामागे कोणी कसे राजकारण केले हे सर्वज्ञात आहे. १९९९ ला पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष अडचणीत असताना, निवडून येण्याची खात्री असताना केवळ पक्षाने दिलेला आदेश शिरसावंन्द्य मानत राष्ट्रवादीने दिलेली ऑफर धुडकावली आणि निवडणूक लढवली. कदाचित ते या ठिकाणी यावेळी निवडून आले असते तर कराड लोकसभा मतदारसंघाचे नाव संपुष्टात आले नसते.                                                              १९९९ ला राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. त्यानंतर पृथ्वीराज बाबा राज्यसभेवर गेले आणि सलग सात वर्षे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. पक्षनिष्ठा आणि पक्षासाठी त्याग ही त्यांची असलेली पावती म्हणूनच त्यांना  २०१० मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आले. त्यांनी २०१४ अखेर राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले व ते पुन्हा जनतेचा कौल आजमावण्यासाठी दक्षिण विधानसभा मतदारसंघात सामोरे गेले. यावेळी विद्यमान आमदार आणि ३५ वर्षे दक्षिण कराडची खिंड अबाधित ठेवलेले विलासराव पाटील –उंडाळकर यांनी बंडखोरी केली. तर अतुल भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला, ते मोदीलाटेवर स्वार झाले. मात्र, पृथ्वीराज बाबांनी सुमारे १६ हजाराच्या मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकली. २०१९ ची निवडणूक सुरु झाली आहे. काळ आणि नीतीचा योगायोग समजा अथवा पर्याय नसल्याचे समजा, ज्या पक्षाने तब्बल २० वर्षांपूर्वी ज्यांचा पराभव केला त्यांच्या दारात पुन्हा तोच पक्ष लोकसभेची निवडणूक लढावा, अशी विनंती करत त्यांच्याकडे आला आहे. त्यामुळे २० वर्षांच्या राजकीय फेऱ्यानंतर पुन्हा एकदा चव्हाण घराणे या निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरले आहे.