राजीनामा सत्र थांबणार का ? 

 राजीनामा सत्र थांबणार का ? 

 


         अनेक दिवसांपासून कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे.काँग्रेस अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयावर आपले मत ठाम असल्याचे पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विनंती करुनही राहुल यांनी अध्यक्षपदावरून माघार घेण्यास नकार दिला आहे. सध्या कॉंग्रेसची परिस्थिती बिकट आहे. देशातील १७ राज्यांत कॉंग्रेसचा एकही खासदार निवडून आलेला नाही, हे वास्तव आहे. या वास्तवाचे भान कॉंग्रेसच्या नेतृत्वाला आले असावे. या गोष्टीचे मोठे दडपण त्यांच्यावर असल्याचे दिसत आहे. परंतु खचून न जाता जो परिस्थितीला सामोरे जातो, त्याचे भवितव्य उज्वल असते, असे म्हणतात. परंतु वास्तवाकडे पाठ करून यश मिळत नाही, हेही तितकेच खरे आहे. राहुल गांधी यांची भवितव्यात नेमकी राजकीय भूमिका काय असणार, याबद्दल निश्चित समजत नाही. कॉंग्रेस पक्षाने देश स्वातंत्र्यानंतर निवडणुकीत अनेकवेळा यश मिळवले आहे. त्यामुळे पाच वर्ष सत्ता मिळाली नाही म्हणून नाराज होण्याचे कारण नाही. राजकारणात यश- अपयश हे राजकारण्यांना नवीन नाही. त्यासाठी खंबीर मनाचे नेतृत्व असावे लागते. हळवे होऊन किंवा भावनाविवश होऊन चालत नाही. राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. गुजरात विधानसभा निवडणुक राहुल यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. त्या निवडणुकीत कॉंग्रेसने भारतीय जनता पार्टीची दमछाक केली होती. भाजपवालेही हे मान्य करतील. त्यानंतर राहुल यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकाची विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी जनता दलाशी संधान बांधत भाजपला मात दिली आणि कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार स्थापन केले. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वप्रेमाने भारावलेल्या काही प्रादेशिक, घटक पक्षांनी कॉंग्रेसचा इशारा गांभीर्याने घेतला नाही. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाला स्वतंत्र लढायचे होते. नेमका याच परिस्थितीचा राजकीय फायदा भाजप नेतृत्वाने घेतला आणि देशात पुन्हा भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. असो. लोकसभेची लढाई संपली आहे. त्यात कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. परंतु कॉंग्रेसचा पराभव झाला म्हणून अध्यक्षपदाचा राजीनामा देणे म्हणजे पक्षाला संकटाच्या खाईत सोडण्यासारखे आहे. राजकारणात कोणतीही परिस्थिती सारखी राहत नाही. राजकारण सातत्याने बदलत असते. राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुमारे १०० जणांहून अधिक कार्यकर्ते व नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. कॉंग्रेसमधील राजीनामा सत्र थांबणार काय, असा प्रश्न सर्वत्र चर्चेत आहे.                                                                                                 राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे कॉंग्रेसमधील नेते व कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येणे साहजिकच आहे. त्याचा मोठा फटका कॉंग्रेसला आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षात राजीनाम्याचे सत्र सुरु झाले आहे. याच पार्श्वभुमीवर कॉंग्रेसची बैठक होणार आहे. कॉंग्रेसच्या बैठकीत राजीनामा सत्रावर विशेष उपाय योजण्याबद्दलही चर्चा होईलही परंतु राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने पक्षसुधारणा करण्यास अथवा पक्षातील मरगळ झटकण्यास तयार नसतील तर ते हट्टी आहेत, ते ठाम नाहीत असा चुकीचा संदेश सर्वत्र जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पक्षातील कार्यकर्त्यांवर होणार आहे हे नक्की. माजी खासदार नाना पटोले यांनी अ. भा. काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल यांच्या समर्थनार्थ आपण राजीनामा देत आहोत आणि या संघटनेची कार्यकारिणी बरखास्त करत असल्याचे पटोले यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसमध्ये अशा प्रकारे  सध्या राजीनामासत्र सुरू आहे. काँग्रेसच्या वेगवेगळ्या राज्य कार्यकारिणीतील आतापर्यंत सुमारे शंभरहून अधिक जणांनी राजीनामे दिले आहेत. यात राज्यसभा खासदार विवेक तनखा हे आहेत. तनखा हे कॉंग्रेसचे कायदा आणि मानवाधिकार सेलचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीदेखील राजीनामा देण्याचे वक्तव्य केले होते. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. राजीनामा देणाऱ्यांमध्ये दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष राजेश लिलौठिया आणि तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्षा पूनम प्रभाकर यांचाही समावेश आहे. तर उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देऊ केला होता. मात्र, तो स्वीकारण्यात आलेला नाही. काँग्रेस नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेतल्याचे म्हटले आहे, परंतु त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठाम म्हटले आहे. विशेष म्हणजे  राज्य कार्यकारिणीत कुणीही पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिलेला नाही. राहुल यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर राजीनामासत्र सुरू झाले आहे. देशात अनेकवेळा सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस पक्षात लोकसभेच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर अनेकजण राजीनाम्याचीच भाषा करत आहेत, हे दुर्दैवी आहे. कॉंग्रेसला अजूनही स्पष्ट दिशा मिळालेली नाही. सध्या कॉंग्रेसमध्ये राजीनामा देण्याची जी लाट आली आहे, ती थांबली नाहीतर पक्षाचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे.                                                                                                           २०१४ साली कॉंग्रेसच्या पराभवानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीदेखील पक्षामधल्या आपापल्या पदांचा राजीनामा देऊ केला होता. मात्र, ते मान्य करण्यात आले नव्हते. त्यापूर्वी शरद पवार यांनी कॉंग्रेस पक्ष सोडल्यानंतर सोनिया गांधींनी राजीनामा देऊ केला होता. मात्र, तोही स्वीकारण्यात आला नव्हता. गांधी कुटुंब असल्याशिवाय पक्ष मजबूत राहणार नाही, अशी पक्षातल्या नेत्यांची धारणा आहे. हीच काँग्रेससमोरील मोठी समस्या असल्याचे वाटते. राहुल गांधी पक्षाध्यक्ष पदासाठी तयार नसतील तर पक्षाने त्या पदावर जनतेचा पाठिंबा असणाऱ्या नव्या नेत्यांना संधी दिली पाहिजे. पक्षात सदस्य नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी लागेल. पक्षाला जनतेशी निगडीत मुद्द्यांवर रचनात्मक काम करावे लागेल. भावनिक होऊन सर्व प्रश्न सुटत नाहीत, त्यासाठी जनतेत जाऊन पक्षाने सुसंवाद साधण्याची गरज आहे. तरच राजीनामा देण्याचे प्रमाण कमी होऊन कॉंग्रेसला मार्ग सापडेल.