'डॉक्टर'आजोबांचा वारसा जपला ,मुंबईत कोरोना महामारीत उंब्रजचा डॉ.शुभम कोरोना 'योद्धा'

'डॉक्टर'आजोबांचा वारसा जपला ,मुंबईत कोरोना महामारीत उंब्रजचा डॉ.शुभम कोरोना 'योद्धा'

अनिल कदम/उंब्रज

उंब्रज परिसरातील पाहिले डॉक्टर दामोदर पलंगे यांनी स्वातंत्र्य उत्तर काळात उंब्रज पंचक्रोशीत दिलेली आरोग्य सेवा सर्वांच्याच स्मरणात आहे.डॉक्टर बिंदूसार पलंगे (दादा) यांचे वैद्यकीय क्षेत्रात असणारे योगदान सध्याच्या काळात उंब्रज व परिसरातील जनतेला बुडत्याला काडीचा आधार या प्रमाणे आहे.आजोबा व चुलते याचा वारसा पुढे चालवत डॉ.शुभम संग्रामसिंह पलंगे यांनी मुंबई येथे सायन हॉस्पिटलमध्ये एम.बी.बी.एस.केले असून,वैद्यकीय सेवेचे "बाळकडू" घरातूनच मिळाल्याने कोरोना महामारीच्या काळात रुग्णसेवा करण्यासाठी स्वतःला झोकून देऊन घरातील रुग्णसेवेचा वसा जपला आहे.

डॉ.शुभम यांचे प्राथमिक शिक्षण उंब्रज येथे झाले असून माध्यमिक शिक्षण फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी होऊन, डॉक्टर होण्यासाठी पुढील शिक्षणासाठी त्यांनी सायन हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला होता.वडील प्रथितयश व्यावसायिक आई समाजसेविका तसेच उंब्रज जिल्हा परिषद सदस्या,आजोबा जुन्या काळातील नामांकित वैद्य, तर चुलते मिरज येथे नामांकित डॉक्टर,अशा समाजसेवेचा वसा घेतलेल्या कुटुंबातील संस्कार आणि आदर्श जपण्याचे कार्य डॉ.शुभम यांनी पुढे चालू ठेवले असून, जीवघेण्या कोरोना महामारीच्या काळात अंगावर पीपीई किट परिधान करून कोरोना महामारीला रोखण्यासाठी गेले पंधरा दिवस झाले कोरोना व्हॅनच्या माध्यमातून    मुंबईच्या विविध भागात रुग्णसेवा करण्याचे योगदान देत आहेत.

शालेय जीवना पासून हुशार आणि होतकरू असणारे डॉ.शुभम एन.टी.एस.परीक्षेत देशातून पहिल्या हजार विद्यार्थ्यांच्यात मेरिट वर आले होते.खेळाची आवड असणारे डॉ शुभम एक उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू असून बालपनापासून अवखळ आणि नटखट असणारे शुभम यांनी कोरोना महामारीत दिलेल्या योगदानाबद्दल उंब्रज पंचक्रोशीतील जनता त्यांचे कौतुक करत आहे.पोलीस, डॉक्टर यासह अनेक कोरोना योद्धे या निसर्गाच्या युद्धात एकवटले असून उंब्रज मधील डॉ शुभम यांनी "जन सेवा हीच ईश्वरसेवा" हे ब्रीद वाक्य खरे केल्याने पलंगे कुटुंबाबद्दल जनतेत असणारी आपुलकी द्विगुणित झाली आहे.