क्रिकेटचा 'कोहिनूर'

सातारा जिल्हा क्रिकेट विश्वातील 'बाप' माणूस,सुनील गाडेकर

क्रिकेटचा 'कोहिनूर'

अनिल कदम/उंब्रज

'गुगली'चा बादशाह आणि गोलंदाजांचा घाम गाळणारा सातारा जिल्ह्यातील क्रिकेटचा बादशाह म्हणजे सुनील गाडेकर

देवदत्त देणगीला जेव्हा जिद्द,चिकाटी मेहनत परिश्रम शिस्त आणि कलात्मकतेची जोड मिळते त्या सुंदर समीकरणाचे नाव असत 'सुनील गाडेकर'सुनील व क्रिकेटचे नाते किती दृढ आहे हे पाहण्यासाठी दुसरीकडे जाण्याची मुळीच गरज नाही.कारण एक सुनील आपण क्रिकेट जगतातील विश्वाला दिलाय.दुसरा सुनील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई या पवित्र तीर्थक्षेत्री आपल्याला गवसलाय. दोन्ही सुनीलची तुलना करण्याचा मोह आवरताना सुनील गाडेकर यांच्यामध्ये सुनील गावसकर यांच्यापेक्षा दि ग्रेट गुंडाप्पा विश्वनाथ यांचाच भास होतो.

जवळजवळ तीन तपे सुनील गाडेकर यांना आम्ही पाहत आलोय.प्रत्यक्ष मैदानावर खेळताना पाहणारी क्रिकेट प्रेमींची पिढी जेवढी सुदैवी,तेवढीच त्यांना खेळताना न पाहणारी पिढी खरी कमनशिबी.

सुनील यांचा मैदानावरचा वावर नेहमी दौलदार राजहंसासारखा विलक्षण शांत भासणाऱ्या या गुणी,दर्जेदार,क्रिकेटरकडे किती रत्ने होती,त्याची त्याने क्रिकेटच्या मैदानावर मुक्त उधळण केली हातचं काही राखून ठेवणाऱ्या कर्ण असल्यासारखा तो उदार हस्ते सारे धन उधळून टाकायचा.त्यांची फलंदाजी म्हणजे खूप सुंदर स्वप्न होतं.

त्यामध्ये तंत्र शुद्धता होतीच,पण त्यातही नजाकत अधिक.फलंदाजीच एवढं मोठं वैभव असलेला शैलीदार फलंदाज आम्ही तरी सातारा जिल्हयात अपवादाने पाहिलाय.भक्कम बचावाला लाभलेली फटाक्यांची सोनेरी किनार एखादा सुंदर मनमोहक इंद्रधनुष्य असल्या सारखी भासायची. इंद्रधनुष्य कस सार आकाश व्यापून टाकत सुंदर कमान करते,तशी सुनील गाडेकर यांची फलंदाजी होती.ड्राइव्ह,कट,पूल,हुकसह क्रिकेट मधील सारे फटके त्याच्या भात्यात होते.त्याचे दर्शन त्यांनी अनेकदा केले.जलद मारा असो की फिरकी त्याला सुनील यांनी योग्य तो आदर दाखवत सन्मानानेच वागणूक दिली.त्यांची विकेट घेणे म्हणजे गोलंदाजाला मिळालेलं 'सरप्राईज'असे

सुनील यांच्याशी चर्चा करताना सहज  विचारले की तुमची शतके किती ? आठवताहेत का ? त्यावर त्यांचे उत्तर आले ५०/६० नक्कीच असतील.अर्धशतके त्या पटीत मोजली तर १०० च्या पुढे.कुबेरासारखा शतकांचा हिशोब ठेवायला इथे कोणाला वेळ आहे ? कारण आकडेवारीत मोजून त्याचे मोल जपायची त्याला तरी काहीच गरज नव्हती.सुनील यांची लेग स्पिन,गुगलीही तेवढीच प्रभावी त्यांनी फलंदाजाला 'मामा'बनवून घेतलेल्या विकेट्सचाही हिशोब त्यांच्याकडे नाही.कारण कितीतरी सामन्यात त्यांनी ५ पेक्षा अधिक बळी घेतलेत.त्यांचे क्षेत्ररक्षणही लाजवाब .त्यांनी टिपलेले झेल,बंदुकीच्या गोळी प्रमाणे थ्रो सध्याच्या काळातील विनिद वांद्रे यांनी अनुभवले आहेत.

सुनील गाडेकर यांचा सर्वात मोठा गुण त्यांचा प्रामाणिकपणा.फलंदाजीला आल्यावर २/४ चेंडू बॅटला लागेपर्यंत ते काहीसे अस्वस्थ वाटत,पण सेट झाल्यावर ते 'दादा'वाटायचे,त्यांचे १०० हुन अधिक सामने शरद महाजनी(आण्णा)यांनी पंचांच्या नजरेतून पाहिलेत.यामुळे आण्णा एक अंदरकी बात सांगतात फलंदाजीला आल्यानंतर तो मला विचारायचा खेळतोय ना.लाईनमध्ये लाईन मध्ये ? असे खुद्द पंचाना विचारणारा तो एकमेव क्रिकेटर असावा मी पाहिलेला.अर्थातच पंच म्हणून काम करताना त्यांच्या प्रश्नांना उत्तरे  देताना 'हा' किंवा मान हलवून 'ओके' एवढच उत्तर त्यावेळी आण्णा देत असत.

सुनील गाडेकर यांच्या कारकिर्दीकडे नजर टाकली तर असे दिसते १९७२ साली कल्याणी शिल्ड क्रिकेट स्पर्धेत ते वाईच्या सोशल क्लबकडून खेळले.त्या कामगिरीच्या जोरावर त्यांची सातारा जिल्हा संघात  निवड झाली.आणि जिल्हा संघाचे कर्णधार पदही त्यांनी खूप वर्षे भूषवले.जिल्हा संघा कडून खेळताना त्यांनी केलेली कामगिरी दैदीप्यमान होती.भारतीय संघाचे तत्कालीन कोच कर्नल हेमू अधिकारी यांच्या पुण्यातील कॅम्पसाठी त्यांची निवड झाली होती.शिवाजी विद्यापीठ संघात त्यांची निवड झाली इंदोर येथे मुंबई विद्यापीठ संघविरुद्ध खेळताना त्यांनी शतक आणि ४ विकेट अशी कामगिरी केली .त्यामुळे त्यांची वीझी ट्रॉफी साठी निवड झाली. विद्यापीठातर्फे त्यांनी चमकदार कामगिरी केली 

१९७४ साली महाराष्ट्राच्या २२ वर्षाखालील संघातही त्यांची निवड झाली.पुण्यात विलासक्लब कडून खेळताना त्यांना अनेक रणजीपटू बरोबर खेळण्याची  संधी मिळाली. सिंगापूर, श्रीलंका, हॉंगकॉंग मधील स्पर्धेतही ते पुणे संघाकडून खेळले,रुंगठा ट्रॉफी,विझी ट्रॉफी,तसेच पश्चिम विभागातर्फे ते खेळले.रणजी चाचणी स्पर्धेसाठी ते दक्षिण महाराष्ट्राचा कर्णधार ते होते.

कसोटीपटू रवी शास्त्री,अष्टपैलू एकनाथ सोलकर,  जयंतीलाल यांच्या समवेत सुनील गाडेकर अनेक सामने खेळले,मुंबईच्या 'षटकार'करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा मान आणि १ हजार रुपये शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली.

साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर पाहिले शतक करण्याचा मान त्यांनी मिळवला सुधाकर शानभाग,काशीनाथ राव,धनंजय कान्हेरे,संजय आठले, दीपक पाटील,अरविंद पटेल,दुर्वास कांबळे,अफजल पठाण,राजू भोसले,आयुब बागवान,अनिल फणसे,मिलिंद तळवलकर, महेश कारंजकर, नरेंद्र पंडित,डॉ शिरीष नांगरे,डॉ फिरोज सातारवाला,नंदकुमार घोरपडे या सातारा जिल्ह्यातील खेळाडू बरोबरच मिलिंद गुंजाळसह अनेक रणजीपटूचा उल्लेख सुनील गाडेकर यांनी आवर्जून केला.

सुमारे तीन तपांची दैदिप्यमान कारकीर्द,पण तिलाही शाप लागला तो कमनशिबी म्हणून.एवढी अफाट गुणवता असून महाराष्ट्र्राच्या रणजी संघाचे दार त्यांच्यासाठी बंदच राहिले.शिवाय 'तुम्ही कशाला खेळता आता ,नोकरी धंद्याचे बघा.तुमचे सिलेक्शन होणार नाही' असे अपमानास्पद शब्दही एमसीए काही पदाधिकाऱ्यांनी ऐकवल्याची कटू आठवण ही सुनील गाडेकर आवर्जून सांगतात.

क्रिकेटसाठी एवढी वर्षे देऊनही आज आयुष्याच्या संध्याकाळी,६३ वर्षाचा असणारा हा महान योद्धा अपेक्षा भंगाच दुःख उरात घेऊन जगतोय.क्रिकेट मध्ये 'गॉडफादर' नाही अशी खंतही ते बोलून दाखवतात.आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेटपेक्षा करिअर करा असा सल्ला देत त्यांनी दोन्ही मुलांना इंजिनिअर केले आहे.आता जमलं तर कोच म्हणून काम करायची तयारी त्यांनी दर्शविली आहे.पण आता क्रिकेट साठी मैदाने नसल्याची खंतही ते बोलून दाखवतात.

एका राजहंसाची ही कहाणी शब्दबद्ध करताना आमच्याही उरात वेदना आहेत.जो 'कोहिनुर' हिरा दिमाखात चमकताना दिसायला हवा होता ते पाहण्याचं भाग्य आपल्या कोणाच्याच नशिबी नाही. पण,तरीही एकच भावना सर्वांच्या मनात आहे.

'सुनील गाडेकर यु आर ग्रेट'

(शरद महाजनी (आण्णा)यांच्या लेखणीच्या नजरेतून)