दै. प्रीतीसंगमच्या दणक्याने अखेर पोलिसांना वाई नगरपरिषदेकडून मास्क व सँनिटायझर देण्याचे आदेश

वृत्त प्रसिद्ध होताच नगरपरिषदेच्या प्रशासनाला जाग

दै. प्रीतीसंगमच्या दणक्याने अखेर पोलिसांना वाई नगरपरिषदेकडून मास्क व सँनिटायझर देण्याचे आदेश

दै. प्रीतीसंगमच्या दणक्याने अखेर पोलिसांना वाई नगरपरिषदेकडून मास्क व सँनिटायझर देण्याचे आदेश 


वृत्त प्रसिद्ध होताच नगरपरिषदेच्या प्रशासनाला जाग


वाई :/ दौलतराव पिसाळ


कोरोनो महामारीमुळे मार्च २०२० पासून वाई तालुक्यात आजअखेर अधूनमधून लाँकडाऊन सुरु आहे . या रोगाने शहरासह तालुक्यातील गावागावांमध्ये घातलेले थैमान थोपविण्यासाठी वाई पोलीस स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून अधिकारी, महिला व पोलीस कर्मचारी प्राणाची बाजी लावून भर उन्हात रस्त्यावर उतरून नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाईसह वहाने जप्त करण्याचे नियमित काम करीत आहेत. यातून आज अखेर १३ लाख रुपयांची जमा झालेली रक्कम नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्यात आली होती. या जमा झालेल्या रकमेतून पोलिसांच्या संरक्षणासाठी ५०० मास्क आणि ५० लिटर सँनिटायझर देण्यात यावे अशी मागणी नगरपालिकेकडे वाई पोलिसांच्याकडून लेखी पत्राद्वारे करण्यात आली होती. पण या मागणीच्या पत्राला मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ आणि त्यांचे सहकारी अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली होती. ज्यांनी लाखो रुपये जमा करून दिले त्यांना थोडी फार स्वसंरक्षार्थ वस्तूरुपी अल्प मदत व्हावी या भावनेपोटी दै. प्रीतीसंगम ने वृत्त प्रसिद्ध केल्याचा दणका वाई नगरपरिषदेला दिल्याने मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी त्याची गंभीर दखल घेत अखेर आज सभागृहाची मान्यता घेवून वाई पोलिसांना  एन ९५ दर्जाचे ५०० मास्क आणि ५० लिटर सँनिटायझर देण्याचे जाहीर केले व तातडीने दोन दिवसात पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


 कोरोनो महामारीचे हे जागतिक संकट असून भल्याभल्या देशांच्या तज्ञांना काय करावे हे सुचेनासे झाले आहे. याची जाणीव वाईच्या महसूल, आरोग्य, पोलीस या प्रशासनातील सर्वच अधिका-यांना झाल्याने या प्रत्येक विभागाने आपापल्या परीने वाई तालुक्यावर कोसळलेले कोरोनोचे संकट थोपविण्यासाठी विविध उपाययोजनांचा सपाटा सुरु केला असताना देखील तो आटोक्यात येत नाही . सध्या याचा शिरकाव तालुक्यातील छोट्या छोट्या गावांत होऊन त्या ठिकाणी हॉटस्पॉट बनत आहेत. नागरिकांमध्ये या रोगाविषयी कसलेच गांभीर्य नसल्याने बाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे देखील घराबाहेर पडून सर्वत्र फिरत असल्याने याचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. हि वाढती रुग्णसंख्या  रोखण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे डॉक्टर यांना सक्त आदेश काढून विलागिकरण कक्ष असावेत असे आदेश दिले आहेत. यावर अंतिम उपाय म्हणून वाई पोलिसांना कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याने ते आज रस्त्यावर उतरून अनावश्यक फिरणा-या नागरिकांची धरपकड करून  दंडात्मक कारवाई करीत आहेत. यातून लाखो रुपये जमा करून तो निधी वाई नगरपरिषदेकडे सुपूर्त केला आहे पण पोलिसांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने त्यांनी वाई नगरपरिषदेकडे ५०० मास्क आणि ५० लिटर सँनिटायझर ची मागणी केली होती. महिना होऊन सुद्धा याची पूर्तता वाई नगरपरिषदेने न केल्याने दै . प्रीतीसंगमने यावर आवाज उठवून पोलिसांच्या मागणीला वाचा फोडल्यानेच नगरपरिषद प्रशासन शुद्धीवर येऊन हे वृत्त प्रसिध्द होताच तत्काळ दिनांक २८ में रोजीच्या बैठकीत या मागणीलामान्यता देऊन तत्काळ दोन दिवसात पूर्तता करण्याचे आदेश दिल्याने दै. प्रीतीसंगम चे पोलीस अधिकारी व कर्मचा—यांनी अभिनंदन केले आहे