कराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल भोसले

कराड दक्षिणेत भाजपमध्ये येणाऱ्यांची मोठी लाट - डॉ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी : 

                       राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्यांची अक्षरशः त्सुनामीच आली आहे. तीच परिस्थिती जिल्ह्यातही असून खा. उदयनराजे भोसले भाजपात येणार ही काळया दगडावरची पांढरी रेष आहे. त्याचबरोबर उत्तरेसह कराड दक्षिण मतदार संघातही या दोन पक्षांमधून भाजपात येणार्‍यांची मोठी लाट निर्माण झाली असून  लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व इच्छुकांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती भाजपा नेते व पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी दिली. 

                        येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी 15 रोजी जिल्ह्यात येणाऱ्या भाजपच्या महाजनादेश यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते शुक्रवारी 13 रोजी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

                       डॉ. भोसले म्हणाले, कराडला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा मोठा वसा आणि वारसा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडला सर्व बाबतीत नेहमीच झुकते माप दिले. त्यामुळे येथे भाजपला मोठी ताकद मिळाली असून कराडमध्ये होणारी ही महाजनादेश यात्रा पक्षाच्या भविष्यातील वाटचालीची मुहूर्तमेढ रोवणारी ठरणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

                      दरम्यान, जिल्ह्यातील महाजनादेश यात्रेची रूपरेषा सांगताना पावसकर म्हणाले, शिरवळ येथे रविवारी 15 रोजी दुपारी 1 वाजता महाजनादेश यात्रेचे स्वागत होणार आहे. त्यानंतर वाई येथे 2 वाजता, सातारा येथे 3.30 वाजता स्वागत सभा होणार आहे. त्यानंतर ही यात्रा कराड उत्तरमध्ये प्रवेश करणार असून नागठाणे, उंब्रज, मसूरला स्वागत, कराड येथील कृष्णा कॅनॉल येथे भाजपाच्या सर्व नेते, पदाधिकाऱ्यांकडून या यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. 

                   त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर भव्य सभा होणार आहे. या सभेस सुमारे 30 हजार पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असणार असून ही सभा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी सभा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कराड उत्तर, दक्षिण मतदारसंघातून पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांना मुंबई येथे पक्ष प्रवेशासाठी घेऊन जाण्यास किमान चार ते पाच ट्रॅव्हल्स लागतील, एवढी त्यांची संख्या असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. याला डॉ. अतुल भोसले यांनीही दुजोरा दिला.