कराड तालुका महसुलची उत्तरेत चंगळ तर दक्षिणेत टंगळमंगळ

अण्णासाहेब,रावसाहेब जोमात प्रशासन कोमात

कराड तालुका महसुलची उत्तरेत चंगळ तर दक्षिणेत टंगळमंगळ
कराड तालुका महसुलची उत्तरेत चंगळ तर दक्षिणेत टंगळमंगळ

महसुलची उत्तरेत चंगळ तर दक्षिणेत टंगळमंगळ

 

अण्णासाहेब,रावसाहेब जोमात प्रशासन कोमात

 

अनिल कदम / उंब्रज

 

कराड तालुका म्हणजे क्रीम पोस्टिंग याची जाण अगदी महसूल प्रशासनातील अण्णासाहेब ते रावसाहेब या सर्वानाच आहे.यामुळे कृष्णाकाठ,तारळी काठ, कोयना काठ,मांड नदीकाठ अशी अलिखित वर्गवारीची प्रथा महसूलमध्ये रूढ झाली आहे तलाठी व सर्कल यांनी आपली जहागिरी असल्यासारखी काही भागांवर कब्जा केला असून रावसाहेबांना त्यांचा 'हिसाब'पोहोच झाला की काम फत्ते झाले अशी धारणा बहुतांश अण्णासाहेब यांची झाली असल्याने शासन घाटयात तर कर्मचारी तोऱ्यात वावरू लागले आहेत.

 

नाममात्र गौणखनिज उपशाची रीतसर परवानगी घेऊन,रॉयल्टी चलन भरून वारेमाप मुरूम व गौण खनिज उपसा करण्याची सवय महसूल मधील कर्मचाऱ्यांनीच ठेकेदारांना लावली असल्याची चर्चा आहे वास्तवित पाहता गौण खनिज उपशाची कोणतेही सोपस्कार व नियमावलीची पडताळणी महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी करीत नाहीत.चिरीमिरी उकळण्यासाठी कारवाईचा बागुलबुवा तयार करून आपले खिसे भरण्याचे काम स्थानिक महसूल कर्मचारी करत असून यामुळे शासनाला महसुलाला मुकावे लागत असल्याचे चर्चा आहे.

 

कराड उत्तर मध्ये बऱ्याच ठिकाणी कोणतीही रॉयल्टी न भरता अमर्याद मुरूम उपसा सुरू असून काही ठिकाणी अत्यल्प रॉयल्टी भरून हजारो ब्रास मुरूम उपसा बेकायदेशीर पणे केला असल्याची चर्चा आहे यामध्ये मसूर परिसरातील खराडे,रिसवड व अंतवडी येथील मुरूम उपशाची चर्चा जोरात असून याबाबतची सविस्तर बातमी दै.प्रीतिसंगांच्या माध्यमातून याच लेखमालेत विस्तृत स्वरूपात प्रसिद्ध करणार आहोत.यामध्ये महसूल विभागाचे जाणूनबुजून झालेले दुर्लक्ष ठेकेदारांच्या पथ्यावर पडले असून चिरीमिरीसाठी डोंगराच्या टेकड्या भुईसपाट करण्याची सुपारी काही जणांनी घेतली असून गौण खनिजांची अमर्याद लूट करून मालामाल झाल्याचा पर्दाफाश होणार आहे.

 

कराड दक्षिण मतदार संघात उंडाळे, कासारशिरंबे,संजयनगर शेरे,तांबवे,शेणोली भागातून अमर्याद गौणखनिज उपसा झाला असून नावापुरते चलन शासन दप्तरी दाखल केले आहे.वाळूपेक्षा मोठा घोळ या मुरूम उत्खननात झाला असून महसूल विभागाने चिरीमिरी साठी आपले लक्ष इतर गौण खनिजाकडे केंद्रित केल्याने कराड तालुक्यातील मुरूम उत्खननांची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढणार असून बराच काळ दुर्लक्षित राहिलेला मुरूम,दगड,व माती घोटाळ्याकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः जातीने लक्ष दिले तर अनेक बड्या धेंडांसह महसूल कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा बुरखा फाटणार असून यामुळे शासनाला महसूल स्वरूपात मोठी रक्कम मिळेल

 

यामुळे कराड तालुक्यातील गौण खनिज उपशाकडे जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी स्वतः लक्ष देऊन महसूल मधील झारीतील शुक्राचार्य शोधून त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला पाहिजे तरच बोकाळलेले महसूल प्रशासन ताळ्यावर येईल अन्यथा निसर्गाचे लचके ठेकेदार तोडतच राहणार आणि त्यातीलच काही तुकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येणार ही परंपरा अशीच चालू राहणार.

 

कराड उत्तरमध्ये मुरूम उपसा अमर्याद रॉयल्टी नाममात्र

 

कराड महसूल विभागातून मिळालेल्या माहिती नुसार गत चार महिन्यात कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील ११ गावांमधून ९०० ब्रास मुरूम व दगड या गौनखनिजाचा उपसा करून सुमारे ४ लाखांच्या आसपास रॉयल्टी भरून घेतली असून वास्तवात अतिशय अमर्याद गौणखनिज उपसा कराड उत्तर मध्ये झाले असून दिलेले परवाने आणि झालेले उत्खनन यांचा ताळमेळ कुठेच बसत नसून याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता महसूलचा सावळागोंधळ बघताक्षणी नजरेत भरण्यासारखा प्रकार असून आंधळं दळतंय.... अशी अवस्था होऊन गेली असल्याची चर्चा आहे.

 

कराड दक्षिण मध्ये मुरुमाचा हाहाकार

 

कराड तहसील मधून मिळालेल्या माहितीनुसार गत चार महिन्यात कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात २६ गावांमधून ३६०० ब्रास मुरूम व दगड गौनखनिजाचा उपसा होऊन सुमारे २३ लाखांच्या आसपास रॉयल्टी शासन दप्तरी जमा झाली आहे.परंतु उपसा अमर्याद व रॉयल्टी नाममात्र अशी परिस्थिती सर्वच ठिकाणी आहे. प्रत्येक ठिकाणचे महसूल कर्मचारी आणि ठेकेदार यांचे साठेलोठे शासकीय महसुलाला मारक ठरत असून अण्णासाहेब व रावसाहेब मालामाल होत असून शासनाच्या महसुलाला मुकावे लागत आहे सर्वच ठिकाणी खाबूगिरी बोकाळली असून महसूल प्रशासनाचा कोणताही  वचक ठेकेदारांवर राहिला नसल्याने पैसे फेको तमाशा देखो अशी बोंब ठेकेदारांनी उठवली असून यामुळे प्रशासनाची नाहक बदनामी होत आहे.