पाचवड फाट्यावर जखमी बिबट्याची क्षणभर विश्रांती

पाचवड फाटा ते नांदलापूरच्या दरम्यान मंगळवारी रात्री महामार्ग ओलांडताना बिबट्या अज्ञात वाहनाला धडकला. या अपघातात बिबट्या जखमी झाल्याने काही काळ महामार्गावरच स्तब्ध बसून राहिला. दरम्यान, बघ्यांची गर्दी, वाहनांची लाईट, रहदारी व गोंगाटामुळे संधी मिळताच बिबट्याने महामार्ग ओलांडून जवळच्या ऊसाच्या शेतात धूम ठोकली. दरम्यान, बुधवारी सकाळपासून वनविभागाकडून शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.

पाचवड फाट्यावर जखमी बिबट्याची क्षणभर विश्रांती

 

बिबट्याची ऊसाच्या शेतात धूम : 15-20 मिनिटे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने वनविभागाकडून शोध मोहिमेस प्रारंभ

कराड/प्रतिनिधी :

          कराडनजीक पाचवड फाटा ते नांदलापूरच्या दरम्यान पुणे-बेंगलोर महामार्गावर महामार्ग ओलांडताना बिबट्या अज्ञात वाहनाला धडकल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात बिबट्या जखमी झाला. यामुळे त्याला महामार्ग ओलांडता न आल्याने तो सुमारे 15-20 मिनिटे महामार्गावरच स्तब्ध बसून राहिला होता. बिबट्याला अचानक वाहनासमोर पाहिल्यावर वाहनधारकांची काही काळ भंबेरीही उडाली. दरम्यान, महामार्गावर बसलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी वाहनधारकांसह स्तानिक नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर वाहनांची लाईट, रहदारीसह लोकांच्या गोंगाटामुळे संधी मिळताच त्याने जवळच्या शेतात धूम ठोकली. दरम्यान, काहींनी महामार्गावर बसलेल्या बिबट्याचे केलेले चित्रीकरण सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. वनविभागाकडून आज बुधवारी सकाळपासून शोध मोहिम सुरु केली आहे.

           याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा येथील उड्डाणपूलापासून काही अंतरावर कराडकडे जाणाऱ्या लेंनवर मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेला बिबट्या अज्ञात वाहनाला थडकला. या अपघातात बिबट्या जखमी झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहनांच्या रहदारीतून त्याला त्वरित महामार्ग ओलांडता न आल्याने तो महामार्गावरच स्तब्ध बसून राहिला. यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 15-20 मिनिटे धीम्या गतीने सुरु होती. बिबट्याला अचानक वाहनासमोर पाहिल्यावर वाहनधारकांचीही काही काळ भंबेरीही उडाली. दरम्यान, महामार्गावर बसलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती.

             यावेळी जखिणवाडी येथील आगाशिव लेण्यांच्या येथे कार्यरत असलेले वनविभागाचे कर्मचारी घरी जात असताना त्यांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची कल्पना वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा व वनरक्षक रमेश जाधवर घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत बिबट्याला संधी मिळताच त्याने महामार्ग ओलांडून लगतच्या ऊसाच्या शेतात धूम ठोकली होती. काही वेळात वनरक्षक पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना घटनास्थळी जखमी बिबट्याचे रक्त पडल्याचे दिसून आले. त्यानंतर वनविभागाने महामार्गालगत पाहणी केली. परंतु, रात्रीची वेळी ऊसाच्या शेतात शोध मोहीम राबविणे कठीण असल्याने बुधवारी पहाटेपासून शोधमोहीम सुरु करण्याचे वनाधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार ठरवण्यात आले.

          आज बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून वनविभागाने जखमी बिबट्याच्या शोधमोहीमेस सुरुवात केली आहे. यामध्ये सहायक वनसंरक्षक किरण कांबळे यांच्यासोबत वनपाल सवाखंडे,  वनरक्षक रमेश जाधवर,प्रशांत मोहिते, उत्तम पांढरे, मंगेश वंजारे, सचिन खंडागळे, मा. वन्यजीव रक्षक रोहन भाटे, पोलीस पाटील शिर्के व वनमजुर यांचा सहभाग आहे. वनविभागाकडून स्थानिक नागरिकांचीही या शोध मोहिमेत मदत घेण्यात येत आहे.