‘मतदार राजा’ कुठं... कुठं शोधू तुला !

सध्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रचारास जोरदार सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी रात्रंदिवस अक्षरशः पायाला भिंगरी बांधून प्रचार करत आहेत. त्यामध्येही गावातील मतदारांसह कामानिमित्त पुण्या, मुंबईसारख्या बाहेरगावी असणाऱ्या मतदारांचाही उमेदवारांनी शोध सुरु केला आहे.

‘मतदार राजा’ कुठं... कुठं शोधू तुला !
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021
‘मतदार राजा’ कुठं... कुठं शोधू तुला !

प्रचाराची धूम : मतदाराला शोधण्यासाठी उमेदवारांची तारांबळ, गटा-तटातील राजकारणाला ऊत

राजेंद्र मोहिते/ कराड :

         तालुक्यातील 104  ग्रामपंचायतींपैकी 17 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जोरदार धुमशान सुरु आहे. या ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होत असून प्रचारास सुरुवात झाल्याने उमेदवारांनी अक्षरशः रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरु केला आहे. त्यामध्येही गावातील मतदारांसह कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या मतदारांचाही उमेदवारांनी शोध सुरु केला असून‘मतदार राजा’ कुठं... कुठं शोधू तुला ! असे म्हणण्याचीच वेळ जणू त्यांच्यावर आल्याचे चित्र दिसून येत आहे.

         ग्रामपंचायतीच्या मतदानाची तारीख जसजसी जवळ येईल, तसतसे गावागावातील राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. परंतु, सध्याच्या वारंवार बदलणाऱ्या वातावरणासारखे आणि अनियमित वादळी परिस्थितीसारखे राजकीय मंडळीही बदलत असल्याचा प्रत्यय अनेकदा लोकांना आला आहे. त्यामुळे प्रचारावेळी मतदानापुरते हात जोडणाऱ्या उमेदवारांना काही लोकांकडून तुम्ही आम्हाला नंतर पाच वर्ष हात जोडायला लावू नका बाबांनो !, असे सरळसरळ तोंडावर सांगतले जात आहे. त्यावेळी उमेदवारांकडून मिस्कील हास्य करीत, तुम्ही फक्त काम सांगा? असे बोलून वेळ मारून नेत मतं मागितली जात आहे. त्यामुळे उमेदवारांकडून ऐन-तेन प्रकारे मतदारांना प्रलोभने दाखवत सध्या ग्रामीण भागात प्रचाराची चांगलीच धूम सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.

         तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये दुरंगी तर काही गावांमध्ये तिरंगी लढतीचे चित्र आहे. त्यामुळे काही गावांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार असल्याने उमेदवारांकडून पॅनेल टू पॅनेल मतदान करण्याचा आग्रह मतदारांकडे केला जात आहे. तसेच आपली गोळाबेरीज करण्यासाठी उमेदवारांना स्थनिक मतदारांच्या घरी दिवसातून किमान दोन-तीनदा घिरट्या घालाव्या लागत आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने आपल्या वार्डात घुसखोरी करून तेथील मतदारांना अनेकविध आमिषे, प्रलोभने दाखवून, प्रसंगी दबावतंत्राचा वापर करून त्यांनी आपली मते फोडू नयेत, यासाठी पाळतही ठेवली जात असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. तर त्यातही निवडणुकीत मोजकी व निर्णायक ठरणाऱ्या बाहेरगावी असलेया मतदारांचा पत्ता, फोन नंबर मिळवून उमेदवार त्यांच्याशी संपर्क करत आहे. तसेच त्यांच्यापर्यंत विविध मार्गाने प्रत्यक्ष पोहचूनही मतं मागितली जात आहेत. यासाठी बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांचा उमेदवारांसह पार्टीच्या नेत्यांकडून शोध सुरु करण्यात आला असून या मतदारांचा शोध घेताना त्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

          तसेच प्रचाराच्या प्रारंभ होऊन ऐन निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्याने गावागावातील गटा-तटांमध्ये आता एकप्रकारची हातघाईची लढाईच सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. आपली शीट लागण्यासाठी काही जणांकडून साम, दाम, दंड, भेद या नीतीचाही वापर केला जात आहे. तसेच काही ठिकाणी विजयासाठी आवश्यक असणाऱ्या आकड्याची गोळाबेरीज घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चाही गावागावातील पारांवर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी मतांसाठी गलिच्छ राजकारण सुरु असून गटा-तटातील राजकारणाला चांगलाच ऊत आल्याचेही दिसून येत आहे.

 

उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात

ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लागल्याने सध्या घरोघरी, दारोदारी मतं मागण्यासाठी येणाऱ्या उमेदावारांकडे मतदार आपली गाऱ्हाणी मांडताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, सांडपाणी, कॉक्रीटीकरण, पिण्याचे पाणी, वीज, पथदिवे, सौरदिवे, वेळोवेळी साथीच्या रोगांबाबत प्रतिबंधात्मक फवारणी आदी. दरवर्षीचेच प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मतदारांकडून केली जात आहे. त्यावरउमेदवारांकडून मात्र केवळ वेळ मारून नेण्यापुरती आश्वासनांची खैरात केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना त्यांच्या हक्काच्या सोयी, सुविधा नक्की मिळणार तरी कधी? असाही प्रश्न काही सुज्ञ नागरिकांकडून उमेदवारांना केला जात असल्याचेही चित्र दिसून येत आहे.

 

युवकांचे मतदान निर्णायक

लोकसभा, विधानसभा व नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत युवक, तरुण मतदारांचा कौल निर्णायक ठरल्याचे दिसून आले आहे. आता ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने स्थानिक नेते, उमेदवारांकडून युवक, तरुणांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या जात आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्थांकडून पारंपारिक उमेदवारांनाच वारंवार मतदान होत असल्याचे वास्तव आहे. मात्र, आता गावागावात युवक, तरुण मतदारांची संख्याही वाढली असून हीच मते निर्णायक ठरणार असल्याची  परिस्थिती लक्षात आल्याने त्यांची मते आपल्या पदरात पाडण्यासाठी स्थानिक नेते, उमेदवारांची धडपड सुरु असल्याचे दिसून येत आहे.