कराड महसूल मधील भोंगळ कारभार

साटेलोटे करणारे महसूल कर्मचारी यांची चौकशी कधी ?

कराड महसूल मधील भोंगळ कारभार

कराड महसूल मधील भोंगळ कारभार

साटेलोटे करणारे महसूल कर्मचारी यांची चौकशी कधी ?


'सरकारी काम आणि सहा महिने थांब' अशी एक जुनी म्हण आहे. सरकारी कामे वेळेत तर होत नाहीतच पण आस्थेनेही होत नाहीत यासाठी ही म्हण प्रचलित झालेली आहे.पण हल्ली सरकारी कारभाराला ही म्हण लागू पडत नाही. कारण सध्या अनेकदा  अशाही घटना घडताहेत की, 'आधी कळस मग पाया' म्हणजे अवैध उत्खनन करायचे सर्व यंत्रणा वापरायची परंतु कारवाईत दाखवताना एखादे वाहन दाखवायचे किंवा थाथूरमाथुर कारण सांगून क्लीन चिट देऊन मलिदा लुटायचा.म्हणजे अगोदर चोरून लग्न व नंतर अरेंज मैरेजचा धमाका अगदी तसेच.हे अनेकांना माहितीही असते पण त्याचा गाजावाजा मात्र होत नाही(म्हणजे होवू दिला जात नाही).कारण झाला तर रिसेप्शनला सगळेच मुकणार असतात.विशेषतः ते अशा ठिकाणी राजरोसपणे घडते की जिथे आम जनतेचा काही संबंध नसतो व लोकप्रतिनिधींच्या समोरही त्या गोष्टी येत नाहीत, त्यामुळेच अधिकारी सर्वेसर्वा असतात आणि मॅनेज नांवाचा फॅक्टर काम बोकाळत राहतो. या महाप्रसादाची पंगत खूप मोठी असते. 

पहिल्या पंगतीला असणारांना 'रसगुल्ल्या' पासून सगळे काही मिळते,पण उरलेल्यांच्या वाट्याला अनेकदा 'शिंतोडा भजी' सुद्धा मिळत नाही. मग त्यांना उद्याच्या पंगतीचे आश्वासन देवून त्यांची बोळवण केली जाते. पण उद्याही कालचाच प्रकार होतो आणि हा विकार वाढत जावून असे घडता घडता ते बिचारे कुपोषित करून टाकले तर जातातच पण त्यामुळे काही मोजक्याच लोकांच्या सरबराईसाठी अधिकार आणि कलाकुशलतेचा वापर करताना शासनाचेही गोदाम खाली होवून शासनाचे प्रचंड नुकसान होते.अनेक विभागांत सरळ सरळ असा 'धेडगुजरी' कारभार चाललेला असतो. 

उंदराच्या बिळाला जशी सात तोंडे असतात व त्यात उंदरे दाणे न तयार झालेल्या हिरव्या लोंब्याही घाईघाईत कुरतडून आत नेवून ठेवतात तशीच मानसिकता आणि घिसाडघाई काही सरकारी बाबू करत असतात. त्यामुळे पूर्वीची 'सरकारी काम अन् सहा महिने थांब' ही म्हण एकवेळ परवडली पण आता 'सरकारी काम , फक्त कागदोपत्री छान' आत मात्र 'सारी घाणच घाण' हा प्रकार फार भयानक आहे.सरकारी कार्यालयात कायदे कमी बोलतात पण कागदे जास्त बोलतात आणि म्हणून ती काटेकोर रंगविली जातात. कायद्यातील त्रूटी , पळवाटा शोधून 'मॅनेज' नांवाचा प्रकार साधताना प्रथम ही रंगवारंगवीची पेरणी होते. त्या पेरणीच्या तासात मोड दिसले पाहिजेत याची काळजी घेतली जाते. मग ते मक्याचे असो की शाळवाचे ते कणसं आल्यावर बघू आणि लईच काय झालं तर त्याच कणसांची 'हुरडा पार्टी' करायची हा प्रघात पडलेला आहे. 

हा 'मॅनेज' हा खरंतर निव्वळ मॅनेज नसून तो रूल्स अँड सिस्टिमचा तो 'डॅमेज' असतो. त्यामुळे काही पाठीमागे जावून कसून तपास केला आणि या चित्रकारांनी अचूकपणे रंगवलेले हे कागद अन् कागद आणि कामेही जर तपासली तर या आर्किटेक्टरांची अनेक भुयारं खुली होतील.त्या भानगडबाज छुप्या रूस्तमांचे बुरखे टराटरा फाटतील.तसे झाले तर नियमाच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा कोंडमाराही थांबेल शिवाय शासनाचीही कोट्यावधींची लुटमार थांबेल. 

अन्यथा 'मर्जी तुमची मी सांभाळीन , हृदयी द्या आसरा' असे फर्जी काम करणाऱ्या मर्जीवाहक मोकाटगिरांची ही पोलादी साखळी दिवसेंदिवस कडीकडीने वाढतच जाईल. खंडोबा बिरोबाच्या जत्रेत लंगर तोडण्याचा एक प्रकार असतो. पण जत्राच भरायची बंद झाली तर हा लंगर तोडणार कोण हा प्रश्न तयार होईल.ही साखळी कुणासाठी कशी काम करते व कुणासाठी कसा साखळदंड होते व यातून काय काय आणि कसे घडते हे एकेक अध्याय पुढील भागात वाचा...

उत्तरेत एका 'सर्कल' ने माती खाल्ल्याची चर्चा

रविवारी सुट्टीच्या दिवशी कराड उत्तर मधील एका सर्कलने माती खाल्ल्याच्या चर्चेने गलबला झाला असून जेसीबी,ट्रॅक्टर अशी मोठी जंत्री असणारी यंत्रणा दस्तुरखुद्द त्या सर्कलने पकडली.परंतु कुठे माशी शिंकली देवजाने आणि सारा मामला रफादफा झाल्याची चर्चा असल्याने ही माती नेमकी कुणा कुणाच्या घशात गेली याचीच चर्चा घडत,असून वरकमाईला चटावलेले सरकारी बाबू  आणि डोळ्यात धूळफेक करणारी महसूल यंत्रणा हात साफ करून ढेकर देऊन तृप्त झाल्याची चर्चा आहे.यामुळे कराड प्रांताधिकारी 'त्या'सर्कलची चौकशी करणार की क्लीन चिट देणार याबाबत नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.