कराडकरांनो सावधान...कोरोना वेशीवर घोंगावतोय..! तालुक्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढल्याने चिंताःशहराच्या भोवताली कोरोनाग्रस्त रूग्ण

कराडकरांनो सावधान...कोरोना वेशीवर घोंगावतोय..! तालुक्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढल्याने चिंताःशहराच्या भोवताली कोरोनाग्रस्त रूग्ण

कराड/प्रतिनिधीः-

कोरोना महावैश्विक महामारीमुळे अख्खे जग थांबले आहे. या महामारीत हजारो लोकांचे बळी जात आहेत. याला आपले राज्यही मागे नाही. ज्या ठिकाणी पहिले आठ दिवस एकही रूग्ण नव्हता, त्या मुंबई आज अडीच हजारांच्यावर संख्या गेली आहे. कोरोनाची साखळी तोडणे हाच एकमेव उपाय आहे. म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे आपले कराडही स्तब्ध आहे. या आजारावर मात करण्यासाठी पोलिस, आरोग्य कर्मचारी व पालिका कर्मचारी अहोरात्र कष्ट करत आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबियांची काळजी नाही. मात्र ते तुमची काळजी करत आहेत. आणि काही लोक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बिनधास्त फिरत आहेत. घरी रहा आणि सुरक्षित रहा. एवढाच मुलमंत्र या आजारावर मात करू शकतो. असे असतानाही लोक विनाकारण आपल्या जीवनाशी खेळत आहेत. प्रशासनाने केलेल्या आव्हानाला साथ करणे आपले कर्तव्य आहे. कारण कोरोना कराडच्या वेशीजवळ येवून घोंगावत आहे. तालुक्यात संख्याही वाढत आहे. यामुळे चिंता मात्र नक्कीच वाढली आहे. कराड पालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी आतोनात प्रयत्न केलेले आहेत. त्यांना आजअखेर यशही आले आहे. पालिका कर्मचार्‍यांनी कशाचाही विचार न करता शहर या आजारापासून मुक्त रहावे, असा जो प्रयत्न केलेला आहे तो निश्चितच कराडकरांची मान उंचवणारा आहे.
कराड जवळील ओगलेवाडी, बाबरमाची,आगशिवनगर,वनवासमाची याठिकाणी कोरोना बाधित रूग्ण सापडलेले आहेत. ज्यांचा कराडशी दररोजचा संपर्क येतो तर तालुक्यात म्हारुगडेवाडी आणि चरेगांव व तांबवे याठिकाणचे रूग्ण सापडले आहेत. यामुळे तालुक्याची संख्या वाढत आहे. अशातच परवा तांबव्याचा एक रूग्ण कोरोनामुक्त झाला. त्याला टाळ्यांच्या गजरात घरपोच केले आणि तालुक्यातील जनतेने निःश्वास सोडला. हे घडते ना घडते तोपर्यंत तालुक्यात दोन रूग्ण सापडले. त्यातील एक रूग्ण शहरापासून केवळ पाच कि.मी.च्या अंतरावर सापडला तर दुसरा रूग्ण उंब्रज येथील चरेगांव येथे सापडला. पाटण तालुक्यातील 10 महिन्याचे बाळ कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मिळाला. ते जरी पाटण तालुक्यातील डेरवण येथील असले तरी त्याचे कुटुंबिय मुंबईहून कराड तालुक्यातील एका वाडीमध्ये काही दिवस वास्तव्यास होते. हे प्रशासनाच्या समोर आले आहे. ते बाळ आजारी असताना त्याला कराडातील एका रूग्णालयात उपचारासाठी आणल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे शहराच्या हद्दीवर हा कोरोना घोंगावत आहे. पालिका प्रशासन व आरोग्य कर्मचारी आणि पोलिस यासाठी अहोरात्र आपली काळजी घेत आहेत. पालिकेतील कर्मचार्‍यांनी तर न भुतो न भविष्यतो असे काम केले आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे हे प्रशासनाला पर्यायाने कर्मचार्‍यांना सातत्याने मार्गदर्शन करत प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यांनी कर्मचार्‍यांना लागेच ती मदत देण्याची तयारी ठेवली आहे. त्याचबरोबर शहरामध्ये कोणताही माणूस उपाशीपोटी झोपणार नाही याची काळजीही ते घेत आहेत. ज्या ज्या लोकांना अडचणी येत आहेत. ते लोक त्यांच्याशी थेट संपर्क साधत आहेत. त्यांनी या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांची पेटनिहाय यादी तयार केली आहे. मजूरापासून बाहेरगावच्या अडकलेल्या सर्व नागरिकांना सकाळ, संध्याकाळचे जेवण नाष्टा कसा मिळेल. यासाठीही ते प्रयत्न करत असतात. लोकांना जेवण मिळालेच पाहिजे. हे शासनाचे धोरण आहे. मात्र, मुक्या प्राण्यांनाही खाद्य मिळाले पाहिजे याची काळजी घेत आहेत. शहरातील भटकी कुत्र्यांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या पोटांचेही हाल होवू नयेत याकरिता त्यांनी सोशल मिडियावरून आव्हान केले आणि त्याला कराडकरांनी साथ दिली. अनेकांनी चपात्या देण्याचे काम सुरू ठेवले आहे. तर अनेक कराडकर स्वतःहून या कुत्र्यांना खाऊ घालत आहेत.
शहरातील सर्व भागात सॅनिटायझरने ही फवारणी केली आहे. या फवारणीमुळे कराडात चांगलेच राजकारण घडले. जाऊद्या, राजकारणापेक्षा कराडकरांची काळजी महत्वाची असे समजून काहीजण पुढे आले आणि कराड शहरात सॅनिटायझरचे टँकर, ट्रॅक्टरद्वारे फवारणी करून शहर स्वच्छ करण्यात आले. पालिकेतील आरोग्य कर्मचारी तर सर्वच पातळीवर वाखणण्याजोगे काम करत आहेत. शहराची स्वच्छता ही आजही स्वच्छता मोहिमेसारखीच सुरू आहे. सकाळी कराड शहर नेहमीसारखे स्वच्छ केले जाते. त्याचबरोबर घंटागाडीद्वारे कचरा संकलन करताना मास्क वापरा अशा सुचनाही कर्मचारी देताना दिसत आहेत. शहराची काळजी करणारे प्रशासन हे वाखणण्याजोगे आहे. पोलिस रात्रंदिवस आपल्या ड्युट्या करून लोकांना सुचना देत आहेत. काहीजण ऐकत आहेत तर काही जणांच्यावर कारवाईही केल्या जात आहेत. अनेक गाड्या पोलिसांनी जप्तही केल्या आहेत. व दंडही आकारलेला आहे आणि दंडुकेही दिलेले आहेत. प्रशासन आपली काळजी करत आहे, आपणही त्यांना साथ करणे हे आपले कर्तव्य आहे. जेवढा काळ तुम्ही घरात थांबाल तेवढेच तुम्ही सुरक्षित रहाल. हा संदेश नागरिकांनी पाळला पाहिजे.