तासवडेत गॅस गळतीने दोन कामगार अत्यवस्थ - एमआयडीसीतील राॅयल फुडमधील घटना

तासवडेत गॅस गळतीने दोन कामगार अत्यवस्थ -  एमआयडीसीतील राॅयल फुडमधील घटना

कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील एका फुड कंपनीत  खळबळजनक घटना घडली आहे. पाईप लिकेजमुळे गॅस गळती होऊन सहा जणांना त्रास झाला. दरम्यान दोन कामगारांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना उंब्रजच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कराडला हलविण्यात आले आहे. यातील दोन्ही कामगार हे परप्रांतिय असल्याचे समजते. रॉयल फूडस् प्रा. लि. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडलीय घटनेला तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरूटे यांनी दुजोरा दिला आहे. तसेच तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रॉयल फूड या कंपनीत सदरची घटना घडली असून याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे या घटनेत दोघेजण जखमी असून त्यांना उंब्रज येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी हलवले आहे दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

 

राहुल वरोटे

सपोनि तळबीड पोलीस स्टेशन

   याबाबत अधिक माहिती अशी की, तासवडे एमआयडीसीतील रॉयल फूडस् प्रा. लि. ही ज्युस कंपनी आहे. या कंपनीत फळ प्रक्रियेद्वारे अनेक उत्पादने तयार केली जातात. या कंपनीतील कर्मचार्‍यांची संख्याही शेकडोंच्या घरात आहे. शुक्रवारी सायंकाळी कंपनीत पाईप लिकेजमुळे अमोनिया गॅसची गळती झाल्याने दोन परप्रांतिय कामगारांना श्वसनासह उलट्या, खोकल्याचा त्रास होऊन लागला. त्यामुळे प्राथमिक उपचारासाठी त्यांना उंब्रजमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

येथे अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे कामगारांना श्वसनाचा त्रास झाल्याने एमआयडीसीत एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी बोडके हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर केला आहे. तसेच तळबीड पोलीस ठाण्यातही घटनेची माहिती दिली. त्यानंतर तळबीड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. मंडल अधिकारी बोडके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गॅस गळती झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला. तसेच यासंदर्भातील अहवाल पाठविला असल्याचे सांगितले.

 

महसूल विभाग घटनास्थळी

 

दि. ८ सप्टेंबर  रोजी संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान तासवडे एमआयडीसीतील तळबीड गावच्या हद्दीत प्लॉट क्रमांक डी १३ मध्ये असणारे प्लांट नंबर दोन मध्ये रॉयल फूड स्टब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत अमोनिया गॅसची गळती होऊन दोन कर्मचाऱ्यांना सौम्य त्रास होऊ लागला नंतर सदर कर्मचाऱ्यांना उपचारासाठी उंब्रज येथील शारदा क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते थोड्या वेळानंतर क्लिनिक मधून डिस्चार्ज देण्यात आले तसेच गॅस गळती कंपनी प्रशासनाने दुरुस्त करून गॅसची हवेतील तीव्रता सव्वासात साडेसातचे दरम्यान कमी होऊ लागली असलेचे दिसून आले.सदर गॅस पासून जीवितास धोका नसल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक साळुंखे मंडल अधिकारी जे बी बोडके तलाठी धालाईत यांनी पहाणी पंचनामा केला.

दरम्यान, तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरूटे यांच्याशी संपर्क साधला असता, रॉयल कंपनीत अमोनिया गॅस गळती झाल्याची माहिती दिली. तसेच श्वसनाचा त्रास झालेल्या दोन्ही कामगारांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. याप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी आज सकाळी कंपनीत येऊन घटनेची माहिती घेतली आहे. तक्रार दाखल होताच याप्रकरणी गुन्हा नोंद करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरूटे यांनी सांगितले.