उंब्रज ग्रामसभेत उड्डाणपूल मागणीचा ठराव

अनुपस्थित शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईचा ठराव,विविध विषयांवर खेळीमेळीत चर्चा

उंब्रज ग्रामसभेत उड्डाणपूल मागणीचा ठराव

उंब्रज ता. कराड येथील ग्रामसभा सोमवार दि.०४ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास संपन्न झाली.  या ग्रामसभेत महामार्गावर उड्डाणपुल यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तसेच उंब्रज गावातील विविध प्रश्नांवर या ग्रामसभेत चर्चा झाली.सरपंच योगराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला उपसरपंच सुनंदा जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उंब्रज येथे पारदर्शक उड्डाणपूल व्हावा अशी समस्त ग्रामस्थांची मागणी आहे. या अनुषंगाने ग्रामसभेत चर्चा करण्यात आली.यापुर्वी झालेल्या भराव पुलामुळे उंब्रजचे अतोनात नुकसान झाले आहे.  ही झीज भरून काढण्यासाठी सहा पदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामात उंब्रज येथे उड्डाणपूल व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा केली. सर्वानुमते उंब्रजला उड्डाणपूल व्हावा असा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच मराठा आरक्षणावर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत ते पुर्वररत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

ग्रामसभेत उंब्रज येथे पारदर्शक पुलासाठी कृती समिती स्थापन करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. तसेच आजच्या ग्रामसभेला अनुपस्थित असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा ठराव घेण्यात आला. सातारा जिल्ह्यासह उंब्रजला सोमवारी कडकडीत बंद आहे. या विषयावर ग्रामस्थांनी ग्रामसभेचे लक्ष वळवून मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याबाबत निषेध ठराव केला. उड्डाणपूल समस्या बाबत आवाज उठविल्याबद्दल उंब्रजच्या सर्व  पत्रकार बांधवांचे अभिनंदन करण्यात आले. उड्डाणपुलासाठी पंचक्रोशीतील दहा ते बारा गावांचे ठराव घेतले गेले आहेत. कचऱ्याच्या प्रश्नांवरही ग्रामसभेत चर्चा झाली. गावात प्रवेश करतेवेळी कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत ते पुर्ववत सुरू करावेत, पंरतु पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना साक्षीदार म्हणून गुंतवत असल्याची माहिती सरपंच योगराज जाधव यांनी दिली हा नाहक त्रास नसावा यावर चर्चा झाली तर सीसीटीव्हीचा एक्सेस पोलीस ठाण्यात द्यायला ग्रामपंचायत तयार असल्याची माहिती दिली.

  दरम्यान उंब्रज चोरे रोडला भरधाव वेगाने वाहने जातात त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून या रोडवर स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत. कॉलेज रोडला शाळा व कॉलेज सुटल्यावर रस्ता वाहतूकीसाठी ब्लॉक होतो त्यामुळे येथे वाहतूकीस शिस्त लावण्याची मागणी करण्यात आली.कराड येथे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी उंब्रज - मसूर मार्गे कराड बस सुरू व्हावी. ही बस सुरू झाल्यास उंब्रज पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांना थेट विद्यानगर, शैक्षणिक कॅम्पसमध्ये जाता येणार आहे. शिवाय लांब पल्ल्याच्या बसेस उंब्रजला थांबत नाहीत, उंब्रज स्थानकात या बसेस येत नाहीत यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.