काकांचे विचार जोपासण्याचे काम उदयदादांकडून

तब्बल 30 वर्षानंतर दोन गट एकत्रःउंडाळकर गट सक्रियःबाबा गटात घालमेल

काकांचे विचार जोपासण्याचे काम उदयदादांकडून

काकांचे विचार जोपासण्याचे काम उदयदादांकडून


तब्बल 30 वर्षानंतर दोन गट एकत्रःउंडाळकर गट सक्रियःबाबा गटात घालमेल


कराड/प्रतिनिधीः-


सातारा जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस अंतर्गत गेली 30 वर्षे उंडाळकर-बाबा गटात संघर्ष होता. याचा फायदा इतर पक्षांनी उठवला.
राष्ट्रवादीने पाया भक्कम केला. हे घडले केवळ या दोन गटातील संघर्षामुळे.आता उशिरा का होईना हे दोन गट एकत्रित येत आहेत. येत्या शुक्रवारी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपूत्र व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड.उदयसिंह पाटील यांच्या राजकारणाची एंन्ट्री होत आहे. या दोन गटाचा एकत्रित संयुक्त मेळावा पार पडत असून या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि जेष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर हे एकाच व्यासपिठावर येत आहेत. यामुळे जिल्ह्याची राजकारणाची अनेक समीकरणे बदलली जाणार आहेत. हे दोन गट एकत्रित येत असले तरी कराड दक्षिण मतदार संघात कार्यकर्त्यांच्यात मात्र घालमेल आहे. उंडाळकर गटाने कार्यकर्त्यांना विनाअट कोणतेही पद न मागता आपण काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत रूजवायचे आहेत, असा आदेश पारित केला आहे. तर पृथ्वीराज बाबांच्या गटाचा मात्र अद्याप कार्यकर्त्यांशी संवाद झालेला नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. 1991 च्या लोकसभा निवडणुकीपासून या दोन गटात दरी निर्माण झाली. तब्बल 30 वर्षांचा कालखंड उलटला. दोन्हीही नेते काँग्रेसमध्येच सक्रिय राहिले. पण आपआपला गट घेवून. जिल्हा परिषद असो अथवा जिल्हा काँग्रेस कमिटी असो याठिकाणी या दोन गटात सातत्याने संघर्ष झाला. मग कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी असो अथवा स्वतःच्या उमेदवारीसाठी असो. हे घडत होते. उंडाळकर गटाच्या ताब्यात असलेली जिल्हा काँग्रेस कमिटी वर्चस्व निर्माण करत बाबा गटाने काबिज केली आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद माजी आमदार आनंदराव पाटील यांना दिले. तेंव्हापासून हा संघर्ष वाढतच गेला. काकांचे वर्चस्व दक्षिण मतदार संघात एकहाती होते. त्यामुळे काका अथवा त्यांचे समर्थक इतर मतदार संघात पक्ष विरोधी उमेदवाराला मदत करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून
होत होता. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसची निर्मिती झाली होती आणि राष्ट्रवादी काँगे्रसकडूणन विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळाली. तर काँग्रेसकडून पृथ्वीराजबाबा रणांगणात होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाणांना कराड दक्षिणमधून मताधिक्क्य देण्याचे काम विलासराव पाटील उंडाळकर यांनी केले. पण इतर मतदार संघात त्यांना मते मिळाली नाहीत आणि याठिकाणी श्रीनिवास पाटील विजयी झाले. तेथून हा संघर्ष आणखीणच बळावला. हा संघर्ष टोकापर्यंत गेला असताना विलासराव पाटील उंडाळकर यांनी पुन्हा दोन वेळा विधानसभेची उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात काँग्रेसचा एकमेव आमदार म्हणून नोंद झाली. एकीकडे हा संघर्ष सुरू असताना 2010 ला अचानक मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण हे राज्यात आले. तेंव्हा विधानपरिषदेचे सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांनी विलासकाकांच्याकडे प्रस्ताव दिला आणि दक्षिणची जागा मुख्यमंत्र्यांसाठी सोडा असे सांगितले. मात्र, काकांनी हा प्रस्ताव स्विकारला नाही व पृथ्वीराजबाबा विधानपरिषदेवर सदस्य झाले. त्यानंतर मात्र, 2014 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विधानसभेची निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिणमधून उमेदवारी स्विकारली. याचठिकाणी उंडाळकर यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनीही बंडखोरी केली. टोकाचा संघर्ष झाला पण तिरंगी लढतीत पृथ्वीराजबाबा विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत पृथ्वीराज बाबांनी पुन्हा एकदा तिरंगी सामना केला. यावेळी मात्र विलासकाका रणांगणात उमेदवार नव्हते. तर राज्यात असलेले भाजपच्या सरकारने ताकद लावून डॉ. अतुल भोसलेंना विजयी करण्याचा चंग बांधला.
कोणत्याही परिस्थितीत माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करायचा अशी रणनिती रचली. पण याठिकाणी भाजपला अपयश आले. यावेळी अपक्ष म्हणून रणांगणात असलेले अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी आपली उमेदवारी केली. ती कशासाठी अशी चर्चारंगली होती.


मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनीपृथ्वीराजबाबांच्या नेतृत्वाला साथ दिली होती आणि याठिकाणी आघाडी केली होती. तेंव्हापासूनच हे दोन गट एकत्रित येणार अशी चर्चा होती. निमित्त जरी मलकापूरचे असले तरी आतून राजकीय डावपेच सुरू होते. त्याचा मुहूर्त सापडला व युवानेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून काम करण्याचा निर्णय घेतला. याची बैठक मुंबईत पार पडली. तेंव्हापासून हा पक्षप्रवेश कधी? आणि हे दोन गट एकत्रित येणार कधी? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचा निर्णय झाला. शुक्रवारी मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या दोन गटाचे मनोमिलन होणार आहे. नेत्यांची मनोमिलन निश्चित झाले. एकत्रित येण्याचा निर्णय झाला, मात्र कार्यकर्त्यांच्यात घालमेल आहे. सत्ता असूनसुद्धा पृथ्वीराजबाबा सत्तेपासून दूर आहेत. सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे तीन नेते होते. यामुळेच महाविकास आघाडी झाली. या महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसकडून पृथ्वीराजबाबा आणि शिवसेनेकडून संजय राऊत यांनी ज्या भुमिका बजावल्या. त्यामुळेच हे सरकार स्थापन झाले. हा इतिहास आहे. पण सत्तेपासून बाजूला राहून पक्षासाठी काम करण्याचा निर्णय पृथ्वीराजबाबांनी घेतला होता. असे असताना उदयसिंह पाटील यांनी पद अथवा कोणती मागणी न ठेवला. काँग्रेस बरोबर जायचा निर्णय घेतला. यालाही विचारधाराच कारणीभूत आहे. ज्या नेत्याने 35 वर्षे विधानसभेचे सदस्य, जिल्ह्याच्या राजकारणावर पुर्णपणे कमांड ठेवण्याचे काम केले. राजकारणाचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. अशा नेत्याचे सुपूत्र म्हणून उदयसिंह पाटील यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या विचाराशी सहमतच असल्याचे दिसून येत आहे.खरेतर पदासाठी या पक्षातून त्या पक्षात जाणारे अनेकजण पाहिले आहेत. भाजप सरकारमध्ये जाण्यासाठी आघाडीतील नेत्यांची रस्सीखेच होती, असे असताना उदयसिंह पाटील यांनी कसलेही अमिष न ठेवला हा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीने 2014 च्या निवडणुकीवेळी भाजपाचे नेते विलासकाकांच्या घरी आमची उमेदवारी घ्या म्हणून उंबरा झिजवत होते. तरीही काकांनी अपक्ष लढू पण आपले विचार सोडणार नाही, अशी भुमिका घेतली. बंडखोरी केली असली तर जातीवादी पक्षाच्या विरोधात माझा संघर्ष सुरूच राहिल. असे वारंवार कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले. तोच विचार आज त्यांच्या सुपूत्राने रूजवला आहे.


नेत्यांचे ठरले, कार्यकर्त्यांचे काय?


तब्बल 30 वर्षानंतर हे दोन गट एकत्रित येत आहेत. त्यांचा संयुक्तमेळावाही होत आहे. मात्र, या नेत्यांचे ठरले असले तरी कार्यकर्त्यांच्यात
घालमेल आहे. होवू घातलेल्या ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकापर्यंत आणि इतर निवडणुकांबाबत या दोन गटाच्या कार्यकर्त्यांचे
एकत्रिकरण होणे गरजेचे आहे. उंडाळकर गटाने आपल्या रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांना विचारात घेवून चर्चा केली आहे. पण पृथ्वीराज बाबांच्या
गटाच्या कार्यकर्त्यांना बाबांनी अद्याप विचारात घेतले नसल्याची चर्चा दबक्या आवाजत ऐकावयास मिळत आहे.