कराडकरांना कुणी व्हेंटीलेटर देता का व्हेंटीलेटर?

गेल्या काही दिवसात केवळ व्हेंटिलेटर  उपलब्ध न झाल्याने शहरातील 6 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात आता आणखी एका वयोवृद्ध रुग्णाची भर पडली असून व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यानेच त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरासह  तालुक्यातील परिस्थिती  हाताबाहेर  चालली असताना बाहेरून येणाऱ्या रुग्णांमुळे येथील रुग्णांना  व्हेंटिलेटर  उपलब्ध होत नाहीत. परिणामी, त्यांना हकनाक जीवाला मुकावे लागत असून कुणी व्हेंटीलेटर देता का व्हेंटीलेटर? असे म्हणण्याची वेळ सध्या कराडकरांवरच आली आहे.

कराडकरांना कुणी व्हेंटीलेटर देता का व्हेंटीलेटर?
शहरातील स्थिती : व्हेंटीलेटरअभावी सातव्या रुग्णाचा मृत्यू, बेडसाठी रुग्णांसोबत कुटुंबियांची धावाधाव, नागरिकांमध्ये संताप

राजेंद्र मोहिते

कराड/प्रतिनिधी :

         गेल्या काही दिवसात केवळ व्हेंटिलेटर  उपलब्ध न झाल्याने शहरातील 6 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात आता आणखी एका वयोवृद्ध रुग्णाची भर पडली असून व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यानेच त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरासह  तालुक्यातील परिस्थिती  हाताबाहेर  चालली असताना बाहेरून येणाऱ्या रुग्णांमुळे येथील रुग्णांना  व्हेंटिलेटर  उपलब्ध होत नाहीत. परिणामी, त्यांना हकनाक जीवाला मुकावे लागत असून कुणी व्हेंटीलेटर देता का व्हेंटीलेटर? असे म्हणण्याची वेळ सध्या कराडकरांवरच आली आहे.

         व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने पाच जेष्ठ नागरिकांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात आठवडाभरापूर्वी येथील एका व्यापाऱ्याचाही याच कारणाने मृत्यू झाल्याने नागरिकांचा प्रशासनावरील रोष वाढला होता. तसेच याप्रश्नी शहरातील काही दक्ष नागरिकांनी प्रशासनास धारेवरही धरत तात्काळ शहरातील  व्हेंटिलेटर बेड वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, व्यापाऱ्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री शहरातील एका निवृत्त नायब तहसीलदाराचाही व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत केवळ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्यानेच  शहरातील 7 रुग्णांना मृत्यूला कवटाळावे लागले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून रुग्णांच्या कुटुंबियांसह नागरिकांमध्येही प्रशासनाविरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे.  

         पुण्यानंतर कराड हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तर वैद्यकीय क्षेत्रातही कराडने अशीच ओळख मिळवली आहे. त्यामुळेच सध्य परिस्थितीत कराडला उपचारासाठी परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होत असल्याचे दिसून येते. मात्र, त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात अत्यावश्यक परिस्थिती उद्भवल्यास कराडमध्ये सध्या कराडकरांनाच आवश्यक सुविधा मिळेनास्या झाल्या आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाला घेऊन कुटुंबियांना व्हेंटिलेटर  बेडसाठी धावाधाव करावी लागत आहे. अशा परिस्थितीतही संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून  व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बाहेरून उपचारासाठी कराडात येणाऱ्या रुग्णांमुळे स्थानिक रुग्णांवर एकप्रकारे अन्याय होत असल्याची भावना सध्या कराडकरांमध्ये निर्माण होऊ लागल्याचे दिसून येत आहे.

          दरम्यान, नुकतीच कराड येथे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कोविड 19 रुग्णालयांमधील विविध गैरसोयींबाबत लोकप्रतिनिधींनी आपली कैफियत मांडली होती. याप्रसंगी आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ  यासंदर्भात काही आदेश दिले होते. तसेच कराडमध्ये व्हेंटिलेटर बेड वाढवण्यात येणार असल्याचे सांगत व्हेंटिलेटर, बेडच्या उपलब्धतेसंदर्भतील अपडेट कोविड 19 रुग्णालयांनी बोर्डवर दर्शवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या होत्या. तत्पूर्वी, व्हेंटिलेटरअभावी 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी. तसेच शहरातील कोविड रुग्णालयांमध्ये सध्य परिस्थितीत किती बेड उपलब्ध आहेत? यासंदर्भातील माहिती तात्काळ नागरिकांना, रुग्णांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याची सुविधा प्रशासनाकडून राबवण्यात यावी, अशी मागणीही दक्ष नागरिकांनी केली होती. मात्र, अद्याप यातील कोणत्याच आदेशांची अंमलबजावणी करण्यात आल्याचे दिसत नाही. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधी व संबंधित रुग्णालय प्रशासनासह नगरपालिका,  तालुका व जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेबाबत नागरिकांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला असून वरील सर्व आश्वासने केवळ व्हल्गनाच ठरताहेत की काय? अशी चर्चाही सध्या शहरात जोर धरू लागली आहे. 

 

*श्री’मधील कोविड सेंटर तात्काळ सुरु व्हावे : - 

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गासंदर्भातील आढावा बैठकीत कराड येथील कोविड 19 रुग्णालयात व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले. याप्रसंगी कराड येथे श्री हॉस्पिटलमध्ये 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार असून याठिकाणी व्हेंटिलेटर बेडही वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्यापही हे सेंटर सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे तात्काळ येथील कोविड सेंटर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. 

 

*शहरातील उपलब्ध व्हेंटिलेटरची संख्या : - 

शहरात कृष्णा, सह्याद्री व एरम हॉस्पिटल ही कोविड 19 हॉस्पिटल आहेत. तसेच वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील  कोविड सेंटर हलवण्यात आल्याने येथील  व्हेटिलेटरही सह्याद्री व एरम हॉस्पिटलला देण्यात आली आहेत. यासह शहरातील कोविड 19 सेंटरमध्ये सध्या एकूण 42 व्हेंटिलेटर उपलब्ध  आहेत. मात्र, शहरासह तालुक्यातील बाधितांची वाढती संख्या पाहता, तसेच शहरात बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता याठिकाणच्या कोविड 19 सेंटरमध्ये व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.