चिकनगुणिया सद्रुश साथीच्या आजाराने उंब्रजकर भयभीत

कृत्रिम समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याने कोरोनाची तीव्र स्वरूपाची भीती या परिसरात आहे त्यातच इतर साथीच्या आजारांनी याकाळात थैमान घातल्याने नागरिकांची गाळण उडाल्याचे चित्र आहे.

चिकनगुणिया सद्रुश साथीच्या आजाराने उंब्रजकर भयभीत

चिकनगुणिया सदृश्य साथीच्या आजाराने उंब्रजकर भयभीत

प्रतिनिधी/उंब्रज

    उंब्रज ता.कराड येथे मागील महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने नागरिकांना दिलासा आहे मात्र चिकनगुणिया सदृश्य साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिन्याभरात ५० ते ६० हुन अधिक ग्रामस्थांना या आजाराचा सामना करावा लागला आहे.  अद्याप आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीचे मात्र या साथीकडे गांभीर्याने लक्ष नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

      कोरोनानंतर सर्वच ठिकाणी आरोग्याच्या प्रश्नांवर काम सुरू आहे. पंरतु उंब्रजमध्ये याउलट सध्याची परिस्थिती असून मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य, दुषीत पाणीपुरवठा तसेच अस्वच्छतेमुळे विविध आजारांचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून दवाखाने व औषधालये फुल्ल आहेत. कोरोनाची भीती  त्यात चिकनगुणिया सदृश्य आजार, ताप,खोकला,सर्दीच्या साथीने ग्रामस्थ त्रस्त आहेत. 


मागील महिन्यापासून सांधे दुखणे,ताप कणकण अशा लक्षणांनी उंब्रजकर हैराण असून बहुतांश रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. याबाबत उंब्रज येथील एका खासगी डाँक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी चिकनगुणिया सदृश्य आजाराच्या साथीला दुजोरा दिला असून त्यांना स्वतास चिकनगुणिया झाल्याने यावर त्यांनी उपचार घेतले आहेत. तसेच त्यांच्या दवाखान्यामध्ये महिन्याभरात जवळपास ५० हुन अधिक ग्रामस्थांनी उपचार घेतले आहेत. 

    उंब्रज येथील नदीकाठच्या परिसरात राहणारे नागरिक तसेच सांडपाणी साचत असलेल्या लोकवस्तीतील ग्रामस्थ या आजाराने त्रस्त आहेत. तसेच उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा शेजारच्या लक्ष्मी नगर परिसरातील पाच रहिवाशांना चिकनगुणिया सदृश आजार झाल्याचे वृत्त असल्याने खळबळ उडाली आहे. ताप सांधेदुखी बरोबर कणकणी, खोकला या सारख्या आजारांनी डोके वर काढल्याने ग्रामस्थ भयभीत आहेत. याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

   कोरोना नंतर उंब्रज येथील आरोग्य यंत्रणा विस्कळीत आली आहे. उंब्रज शहरात आँक्टोंबर मध्ये कोरोना रुग्णांनी शंभरी पार केली तसेच अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. अजूनही कृत्रिम समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याने कोरोनाची तीव्र स्वरूपाची भीती या परिसरात आहे त्यातच इतर साथीच्या आजारांनी याकाळात थैमान घातल्याने नागरिकांची गाळण उडाल्याचे चित्र आहे.