समाज व उपेक्षित घटकांसाठी काम करणार एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आलेल्या प्रसाद चौगुलेचा दै. प्रीतिसंगमच्या वतीने गौरव

समाज व उपेक्षित घटकांसाठी काम करणार एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आलेल्या प्रसाद चौगुलेचा दै. प्रीतिसंगमच्या वतीने गौरव

कराड/प्रतिनिधीः-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा अंतिम परीक्षेत सर्वसाधारण गटात बनवडी (ता. कराड ) येथील प्रसाद चौगुले हा राज्यात पहिला आला आहे. त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पूर्वी महाराष्ट्रात पहिला येण्याचा विक्रम केला होता, त्यानंतर प्रसाद चौगुले हा सातारा जिल्ह्यातील दुसरा आहे. मी समाजासाठी, उपेक्षित घटकांसाठी काम करणार असल्याचा मनोदय प्रसादने यावेळी व्यक्त केला. प्रसादने दैनिक प्रीतिसंगम कार्यालयास भेट दिली त्यावेळी त्याने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संपादक शशिकांत पाटील यांनी शाल व दै. प्रीतिसंगमचा दिवाळी अंक देऊन प्रसादचे स्वागत केले. यावेळी दै. प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील, सहसंपादक अशोक सुतार, बनवडीचे माजी सरपंच शंकर बापू खापे, प्रसादचे वडील बसवेश्वर चौगुले, अनिल देसाई आदी उपस्थित होते.
दैनिक प्रीतिसंगमला राज्य सेवा अंतिम परीक्षेत सर्वसाधारण गटात राज्यात पहिला आलेल्या प्रसाद चौगुले यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी प्रसाद चौगुले याने आपला शैक्षणिक प्रवास कथन केला. प्रसादाचे प्राथमिक शिक्षण उंब्रज (ता. कराड ) येथे झाले असून जवाहरलाल नेहरू इद्यालय, सातारा येथे त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कराड येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात 12 वी पर्यंत शिक्षण घेतले. बारावीत ए ग्रुप घेऊन त्याने विशेष गुणवत्ता मिळवली. त्यानंतर प्रसादने गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. नंतर पुणे येथे फियाट कंपनीत निवड झाली. काही दिवस तिथे काम केले. परंतु प्रसादने स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. त्यानंतर नोकरी सोडून प्रसादने अभ्यास सुरु केला. पुण्यात एक महिनाभर युनिक क्लासमध्ये मार्गदर्शन घेतले. त्यानंतर कोणताही क्लास न लावता प्रसादने दिवसरात्र अभ्यास करण्यास सुरुवात केली. प्रसादने या कालावधीत पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. जिद्द, चिकाटी, मेहनत यांमुळेच मी हे यश गाठू शकलो, अशी प्रतिक्रिया प्रसादने दिली.
मी स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आलो, याचे समाधान आहे. मी केलेल्या श्रमाची मला पोच पावती मिळाली. मला लोकांमध्ये राहून लोकांची सेवा करायची आहे, त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. समाजासाठी मी काही देणे लागतो, त्यामुळे मी लोकसेवा आयोगाची पुढील परीक्षा देण्याचे ठरवले आहे. प्रसादच्या डोळ्यांत एक चमक होती, त्याने सांगितले, मी ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा सरावसुद्धा सुरु केला आहे. यावेळी प्रसादने नवीन विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास समजावून घेणे, आतापर्यंत आलेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. विषयनिहाय वेळ ठरवणे, जास्त गुण मिळणार्‍या विषयांचा अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे. मिनिस्टर वेबसाईटवरील प्रमाणित साहित्य, एअर इंडिया बुकचा अभ्यास, शिवाय अभ्यासक्रमातील सर्व मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास करणे, नितानितके नियोजन आणि दररोज अभ्यास मुलांनी केला पाहिजे. राज्य सेवा अंतिम परीक्षेत प्रसादाला एकूण 588 गुण मिळाले आणि तो राज्यात अव्वल आला.
प्रसाद चौगुले यांची परिस्थिती जेमतेम असताना बुद्धी कौशल्याने त्याने हे यश मिळवले आहे. त्याचे वडील बसवेश्वर चौगुले यांनी आयटीआय केले असून ते शहापूर एमआयडीसी येथे वीज कंपनीत ऑपरेटर आहेत. आई सर्वसामान्य गृहिणी आहे. प्रसादला दोन विवाहित बहिणी आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून जिद्दीने राज्य सेवा परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आलेल्या प्रसादवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.