मटक्याचा बाजार अवैध दारूचा थयथयाट

शिरवडे येथील कारवाईने परिसरात खळबळ

मटक्याचा बाजार अवैध दारूचा थयथयाट

मटक्याचा बाजार अवैध दारूचा थयथयाट

शिरवडे येथील कारवाईने परिसरात खळबळ

उंब्रज / प्रतिनिधी

मटका आणि दारू यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले तर खाकी,बुकी आणि दारू व्यावसायिकांचे संसार फुलवले आहेत.तालुक्यातील अनेक ठिकाणी कडक लॉक डाऊन मध्ये सुद्धा धडधडीत खुलेआम अवैध दारू आणि मटका सुरू असताना सर्वसामान्य जनतेला दंडुका तर अवैध व्यावसायिकांना गूळ खोबरे मिळत असल्याने नागरिकांच्यात उलटसुलट चर्चा सुरू असून नाममात्र कारवाई करून पाच दहा बाटल्या जप्त करणारी यंत्रणा स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे. शिरवडे येथील ७०० देशी दारूच्या बाटल्या जप्त करून दारूबंदी विभागाने तळबीड पोलिसांचे पितळ उघडे पाडले आहे.

दिखाव्याची कारवाई करण्यासाठी दारू विक्री प्रकरणी हॉटेल मधील कामगारांच्यावर गुन्हे नोंद करणारी पोलीस यंत्रणा मूळ मालकाला मोकाट सोडत असल्याने अवैध दारू विक्रीची पाळेमुळे खोलवर रुजली जात असून कायद्याचा बडगा दाखवून हप्तेखोरी बोकाळली असल्याची चर्चा जनसामान्य नागरिकांच्यात जोर धरू लागली आहे.मटका बुकींनी तर तालुक्याची अलिखित वाटणीच केली आहे आणि आपल्या हद्दी ठरवून घेतल्या असल्याची चर्चा आहे.ऑनलाइनच्या जमान्यात आधुनिकता जोपासली गेली असल्याने हायटेक यंत्रणा वापरली जात असून पेमेंट साठी गुगल पे,फोन पे अशा अत्याधुनिक साधनांचा वापर केला आहे.यामुळे देणारेही आणि घेणारेही समाधानी असून 'मंथली'वेळेवर गेली की काहीच अडचण नसल्याची चर्चा अवैध व्यवसायिकांच्यात आहे.सातारा,कराड,आणि स्थानिक ठिकाणच्या यंत्रणेला खुष ठेवले असता 'घाबरायचं नाय'अशीच साद दिली जात आहे.

कराड तालुक्याला आशियाई महामार्गाचा बराचसा भाग येत असल्याने महामार्गाच्या कडेला अनेक व्यावसायिकांनी आपले हॉटेल व्यवसाय उभारले आहेत काहीजण अतिशय प्रामाणिकपणे आपला व्यवसाय इमानेइतबारे करीत आहेत.परंतु काही व्यावसायिक अवैध मार्गाचा अवलंब करीत गैरमार्गाने आपले खिसे भरत आहेत लॉकडाऊन काळात दारूविक्रीला बंदी असताना अव्वाच्या सव्वा किंमतीला दारू बाटल्यांची विक्री करून शासन आदेशाला कोलदांडा दिला असल्याची चर्चा महामार्गालगतच्या अनेक गावात आहे.

अवैध धंदे करणारा एकदा जाळ्यात सापडला की कायमचा बकरा मिळाला अशा अविर्भावात यंत्रणा काम करीत आहे.मांडवाखाली आल्यानंतर सर्वच सोपस्कार पार पडावे लागत असल्याने अवैध व्यवसाय करणारे निर्भीड होत असून 'दाम करी काम' या सूत्राचा वापर करत असल्याने वरकमाई करण्यासाठी चालना मिळत आहे.यामुळे ज्या बिट मध्ये अवैध व्यवसाय चालत आहे त्याच कारभाऱ्यावर कारवाईचा दंडुका उगारला पाहिजे तसेच गोपनीय,क्राईम आणि दप्तरी विभागातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले तरच अवैध व्यावसायिकांशी गुप्त खलबते,अनोळखी ठिकाणी भेटीगाठी कमी होतील आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहील अन्यथा कुपणाने शेत खाल्ले तर जाब कोणाला विचारायचा असा प्रश्न नेहमीच उपस्थित होत राहील यामुळे कोरोना काळात धावपळ करणारी यंत्रणा वगळता कार्यालयात बसून अवैध धंदे वाल्यांशी संधान साधणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल नक्कीच घेतील याबाबत नागरिक निश्चिंत आहेत.