तासवडे औद्योगिक वसाहतीतील विहिर चोरीला

प्रशासन बेदखल,चिरीमिरीमुळे साळसूदपणाचा आव

तासवडे औद्योगिक वसाहतीतील विहिर चोरीला

तासवडे औद्योगिक वसाहतीतील विहिर चोरीला

प्रशासन बेदखल,चिरीमिरीमुळे साळसूदपणाचा आव

 

तासवडे ता.कराड गावच्या हद्दीच्या औद्योगिक वसाहतीतील एका प्लॉटमधील विहीर चोरीला गेल्याची धक्कादायक चर्चा परिसरात सुरू आहे.गेली अनेक वर्षे अस्तित्वात असणारी औद्योगिक वसाहतीतील विहीर अचानक लुप्त झाल्याने यामागे नक्की काय गौडबंगाल आहे.याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असून हेतुपूर्वक पाण्याचा स्त्रोत बंद करण्यामागचा नेमका हेतू काय ? एरिया मॅनेजर नक्की काय करतात ? प्लॉट खरेदी विक्री प्रकरणात ऍक्टिव्ह असणाऱ्या मंडळींचा तर हा डाव नाही ना ? किंवा घातक रसायन या विहिरीत सोडल्यामुळे पाणी दूषित झाले आणि हे दुष्कृत्य लपविण्यासाठी तर हा डाव नाही ना ? अशा एक ना अनेक शंका कुशंका औद्योगिक वसाहतीत चर्चिल्या जात असून शासकीय विहीर चोरीला गेलीच कशी याबाबत संताप व्यक्त होत आहे.

अनेक प्रकारचे गैरकारभार बिनबोभाट चालत असल्याने काही मूठभर लोकांच्या मुळे तासवडे औद्योगिक वसाहत बदनाम होत असून उद्योग उभारणीपेक्षा खरेदी विक्रीचे व्यवहार भरभराटीला आल्याची चर्चा आहे.काही हजारात मातीमोल किमतीला शासकीय जमीन खरेदी करून लाखात विक्री करण्याचा सपाटा काही जणांनी लावला असून सातारा,कोल्हापूर येथील औद्योगिक वसाहतीची कार्यालये शोभेची बाहुली बनून राहिली आहेत.ठरलेला हिस्सा मिळाला की डोळेझाक होत असून यामुळे चुकीचे काम करणाऱ्या लोकांचे फावले आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीची यामुळे दुर्दशा झाली असून नामांकित उद्योगांनी पाठ फिरवली आहे.

कृष्णा नदी वगळता पाण्याचा एकमेव स्तोत्र असणारी विहीर चोरीला गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून याबाबत सविस्तर आढावा दै.प्रीतिसंगम विस्तृत स्वरूपात घेणार आहे.काही वर्षांपूर्वी वापरात असणारी विहीर औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी प्रमुख साधन होती.या विहिरीवर औद्योगिक वसाहतीच्या वतीने स्पेशल खर्च करण्यात आल्याची चर्चा असून डागडुजी, पाईपलाईन,मोटर याबाबत सुद्धा खर्च झाला असल्याची माहिती स्थानिक व्यावसायिक देत आहेत. विहीर खोलीकरण तसेच रुंदीकरण याबाबत सखोल माहिती औद्योगिक वसाहतीच्या प्रशासनाकडे उपलब्ध असल्याची चर्चा आहे तसेच या विहिरीची नकाशाला सुद्धा नोंद आहे.अशा परिस्थितीत विहीर चोरीला जातेच कशी याबाबत खसखस पिकली आहे.

यामुळे तासवडे औद्योगिक वसाहतीच्या प्रशासनाने विहीर चोरी प्रकरणाची पोलखोल करणे गरजेचे असून कवडीमोल किमतीला वराडे,तासवडे व तळबीड भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परिसरात उद्योगधंदे येऊन प्रगती व्हावी या उद्गात हेतूने दिल्या आहेत.परंतु शेतकऱ्यांच्या उद्देशाला यामुळे हरताळ फासला जात असून संबंधित विहीर चोरणारावर कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.

 

प्रशासनाचा हलगर्जीपणा

अग्निशमन दलाची कमतरता,रिकामे प्लॉट वर्षानुवर्षे विनावापर पडून,गौण खनिजांची लयलूट असे एक ना अनेक प्रश्न 'आ'वासून उभे आहेत परंतु प्रशासन याबाबत गंभीर नसून काही वर्षांपूर्वी केमिकल प्लॅन्ट मध्ये झालेल्या स्फोटात चौघांना जीव गमवावा लागला होता यामुळे केमिकल निर्मिती सारखे उद्योग असल्याने अग्निशमन दलाची नितांत गरज तासवडे औद्योगिक वसाहतीत आहे.

 

पर्यावरणाची हानी

तासवडे औद्योगिक वसाहतीतील केमिकल प्लॅन्ट मधील केमिकल मिश्रित सांडपाणी सोडण्याची पद्धत अतिशय विचार करायला लावणारी असून यामुळे भविष्यात मोठा धोका संभवत असल्याची चर्चा आहे.तळबीड बाजूला असणाऱ्या ओढ्यात केमिकल  मिश्रित सांडपाणी सोडले असल्या कारणाने आजपर्यंत बऱ्याच वेळेला मृत मासे आढल्याची घटना घडली आहे.परंतु प्रदूषण कंट्रोल विभाग चिरीमिरीच्या रेट्यामुळे नाममात्र कारवाईचा फार्स राबवून मोकळे होत आहे.यामुळे पर्यावरणाची हानी होत असून भविष्यात मोठे संकट निर्माण होऊ शकते