'मला काय होतंय' मुळे तीन महिन्यांची तपश्चर्या 'पाण्यात'

समूह संसर्गाच्या भीतीने नागरिक भयभीत

'मला काय होतंय' मुळे तीन महिन्यांची तपश्चर्या 'पाण्यात'
'मला काय होतंय' मुळे तीन महिन्यांची तपश्चर्या 'पाण्यात'

अनिल कदम/उंब्रज

'मला काय होतंय' या एकाच भूमिकेमुळे तीन महिने पाळलेला कडक लॉकडाउन 'पाण्यात' जाण्याची भीती निर्माण झाली आहे.गत १० दिवसात जाहीर होणारे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे आकडे सर्वसामान्य जनतेच्या काळजात धडकी भरवणारे आहेत.काही ठिकाणी पोलीस, शासकीय कर्मचारी तर काही ठिकाणी आरोग्य कर्मचारी बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे.जनतेची सेवा करताना शासकीय कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

कडक लॉकडाउन नंतर सरकारने बाजारपेठ व उदयोग धंदे चालू करण्याच्या दृष्टीने हालचाल चालू करत थोडीफार शिथिलता द्यायला सुरुवात केली होती.परंतु याचा गैरअर्थ घेत जनतेने जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावात आपले दैनंदिन व्यवहार चालू केले.यामुळे कोरोना महामारीचे येऊ घातलेले संकट नजरेआड करण्यात आले.याचा परिणाम समूह संसर्ग वाढण्याकडे होऊन आजची परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा शून्यापासून सुरुवात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मानवी गरजा मर्यादित आहेत परंतु व्यक्तीनुसार गरज बदलत जाते अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असताना समाजतील उच्च विध्याभूषित वर्ग आभासी दुनियेत जीवन जगण्यात धन्यता मानत आहेत.साध्या साध्या वस्तूंच्या खरेदीसाठी जनता बाजारात गर्दी करत असून स्वतःसह इतरांचे आयुष्य धोक्यात घालत आहे. भाकरी महत्वाची की मोबाईल रिचार्ज यातील फरक काही महाभागांना समजेनासा झाल्याने दुर्देवाने अतिशय भयानक वेळ समाजावर निर्माण झाली आहे. गोरगरीब जनता जिवाच्या आकांताने घराचा उंबरा ओलांडताना दहा वेळा विचार करीत आहे.पण मध्यमवर्गीय व उच्च वर्गीय 'मला काय होतंय'अशा खोट्या अविर्भावात बाहेर पडत आहे.

पोलीस,शासकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी जीवावर उदार होऊन जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत.अशिक्षित अथवा गोरगरीब जनता प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत आहे.मात्र सुशिक्षित आणि सोशल मीडिया बहाद्दर अपुऱ्या ज्ञानाचा भडिमार विविध पोस्टच्या माध्यमातून व्हायरल करून क्षुल्लक कारणासाठी रस्त्यावर येत असल्याने प्रशासन हैराण झाले आहे.

तर भयानक परिणामांना सामोरे जावे लागेल.

कोरोना बाधित रुग्ण निदर्शनास आल्यानंतर सध्या प्रशासन शक्य आहे ती सर्व उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहे.परंतु अशीच परिस्थिती राहिली आणि रुग्ण संख्या वाढतच राहिली तर प्रशासनात काम करणारे कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत जिवाच्या भीतीने त्यांनी हात आखडता घेतला तर भयानक परिणामांना सामोरे जावे लागेल यामुळे जनतेने घरीच राहून अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे.अन्यथा घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.